*आयडियाफोर्ज टेक्नॉलॉजीच्या ‘आयपीओ’ला चांगला प्रतिसाद*
*गुरुवारपर्यंत गुंतवणुकीची संधी*
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :
ड्रोन निर्मिती क्षेत्रातील देशातील सर्वात मोठी कंपनी आयडियाफोर्ज टेक्नॉलॉजी लिमिटेडची प्रारंभिक समभाग विक्री (आयपीओ) सोमवारपासून खुली झाली आणि पहिल्या तासाभरात विक्रीसाठी उपलब्ध समभागांना संपूर्ण मागणी येणारे अर्ज दाखल झाले. पहिल्या दिवसअखेर ३.६९ पटीने अधिक भरणा पूर्ण केल्याचे उपलब्ध आकडेवारी दर्शवते.
सामान्य तसेच संस्थात्मक दोन्ही प्रकारच्या गुंतवणूकदारांकडून चांगला प्रतिसाद मिळवत असलेल्या या भागविक्रीत गुंतवणूकदारांना गुरुवार, २९ जूनपर्यंत सहभागी होता होईल. कंपनीने प्रति समभाग ६३८ ते ६७२ रुपये किंमतपट्टा निश्चित केला असून, कंपनी या माध्यमातून ५६७.२४ कोटी रुपयांचा निधी उभारू पाहत आहे.
मुंबईत मुख्यालय असलेल्या आयडियाफोर्जच्या या समभागांसाठी छोट्या वैयक्तिक गुंतवणूकदारांच्या वर्गवारीत पहिल्या दिवशी साडेबारा पटीने अधिक मागणी आली, तर बिगर संस्थात्मक बड्या गुंतवणूकदारांच्या गटातून ५.१३ पट अधिक मागणी करणारे अर्ज दाखल झाले. पात्र संस्थात्मक गुंतवणूकदार गटातून जवळपास १०० टक्के अर्ज भरणा झाला आहे.
आयपीओतून उभारण्यात येणाऱ्या निधीपैकी ५० कोटी रुपये कर्जफेडीसाठी वापरले जातील, खेळत्या भांडवलासाठी १३५ कोटी रुपये आणि उत्पादन विकासासाठी ४० कोटी रुपयांचा वापर केला जाईल, असे आयडियाफोर्जचे मुख्याधिकारी अंकित मेहता यांनी सांगितले.