You are currently viewing दीपक केसरकर यांच्या पत्रकार परिषदा मधून फक्त गजाली

दीपक केसरकर यांच्या पत्रकार परिषदा मधून फक्त गजाली

रुपेश राऊळ यांची टीका

सावंतवाडी

सावंतवाडी, वेंगुर्ले व दोडामार्ग तालुक्यातील जनतेने तीन वेळा आमदार म्हणून निवडून दिलेले शालेय शिक्षण मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर आता भा‌षा मंत्री असल्याने फक्त पत्रकार परिषदेतून “गजाली” सांगून निघून जातात. त्यामुळे ते आता पाहुणे बनले असल्याने जनतेची घोर फसवणूक झाली असल्याचा टोला ठाकरे शिवसेना तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांनी हाणला.
कोल्हापूर जिल्ह्यात जाण्यासाठी विमानाने गोवा येथे येऊन खोके ओके आहेत का बघितले. तेथून सावंतवाडी मध्ये पत्रकार परिषद घेऊन जुनाट प्रश्नांचे पुन्हा गाजर दाखवून निघून गेले. ते मतदार संघातील नागरिकांना भेटत नाहीत. तसेच भेटायला गेल्यावर मला वेळ नाही असे सांगून लोकांची हेटाळणी करतात, हे दुर्दैव आहे असे राऊळ यांनी म्हटले आहे.
आंबोली,गेळे व चौकुळ कबुलायतदार गावकर प्रश्नावर केसरकर लोकांची आणखी किती काळ फसवणूक करणार आहेत. या जमीन वाटप प्रश्नावर केसरकर यांनी भूलभुलैया करत तीन वेळा आमदार म्हणून मते घेतली. जवळपास ते चाळीस वर्षे हा प्रश्न हाताळत आहेत. तरीही तो सुटत नाही. कालच्या पत्रकार परिषदेत त्यांनी पुन्हा एकदा घोषणा करण्यापलीकडे काही केलं नाही. एका पिढीला फसविणारे केसरकर फक्त पत्रकार परिषद मध्ये महाराष्ट्राचा भाषा मंत्री असल्याच्या गजाली मारण्यासाठी सावंतवाडी मध्ये येतात असे राऊळ यांनी सांगितले.
सावंतवाडी शहरातील मल्टिस्पेशालीटी हाॅस्पीटल जमीन प्रश्न सुटणार आहे असे सांगणाऱ्या केसरकर यांनी उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टर नसल्याने रुग्णांचे हाल होत आहेत ते प्रथम सोडविण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. उपजिल्हा रुग्णालयाकडे ढुंकूनही पाहत नाहीत, त्यामुळे मल्टिस्पेशालीटी हाॅस्पीटल गाजर अजून किती काळ देणार आहेत असे राऊळ म्हणाले.
सावंतवाडी शहरात दोन दवाखान्याचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले. ते प्रथम उघडून लोकांना आरोग्य सेवा द्या नंतर मोठ मोठ्या हॉस्पिटलच्या गदाली सांगा असे राऊळ यांनी आवाहन केले. हे दवाखाने उद्घाटन झाल्यापासून बंदच आहेत. त्यामुळे केसरकर यांच्या बोलाचीच कडी आणि बोलाचाच भात अशी अवस्था बनली आहे. सावंतवाडी मध्ये तासाभरासाठी येतात आणि अस्तित्व दाखविण्यासाठी पत्रकार परिषद घेऊन गजाली चा फड मांडतात असे ते म्हणाले.
सावंतवाडी मोती तलावातील गाळ पावसाच्या तोंडावर काढण्यासाठी दिखाऊपणा त्यांनी दाखवून दिल्याची चर्चा जनतेत आहे. ते गाळ उपसा करण्याच्या मुद्यावर तोंडघशी पडले आहेत, असा टोला राऊळ यांनी हाणला. वन्य प्राणी शेती बागायती नुकसान करत आहेत पण या प्रश्नावर केसरकर कधी बोलले नाहीत, असे राऊळ यांनी सांगितले. केसरकर जनतेसमोर फसवेगिरी करत आहेत. त्यांना मंत्री पद सांभाळता येत नसल्याने शिक्षण व मराठी भाषा मंत्री म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्याला काहीच लाभ मिळला नाही असे त्यांनी सांगितले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १२८ शून्य शिक्षकी बनल्या आहेत. शिक्षकांच्या ११३० जागा रिकाम्या आहेत. तरीही ४०० शिक्षक तात्काळ हवे होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे त्याला जबाबदार कोण असा प्रश्न राऊळ यांनी उपस्थित केला. ते म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील डीएड व बीएड बेरोजगारांना रिक्त जाग्यावर नेमणूक दिली पाहिजे. कोकणात परजिल्ह्यातील शिक्षकांना संधी नको असा निर्णय घेतला पाहिजे. कोकणातील शिक्षण मंत्री असूनही तसा निर्णय केसरकर घेऊ शकत नाहीत हे मोठे दुर्दैव आहे असे राऊळ यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा