वैभववाडी
भारतीय ग्राहक चळवळीचे प्रणेते ग्राहकतीर्थ बिंदुमाधव जोशी स्थापित ‘ग्राहक पंचायत महाराष्ट्र’ संस्थेचा राज्य अभ्यासवर्ग-२०२३ जळगांव येथे आयोजित करण्यात आला आहे. संस्थेच्यावतीने प्रत्येक वर्षी एका जिल्ह्याच्या ठिकाणी राज्य अभ्यासवर्गाचे आयोजन करण्यात येते. मागील वर्षी नाशिक येथे अभ्यासवर्ग संपन्न झाला होता. यावर्षी जळगांव जिल्ह्याला हा बहुमान मिळाला आहे.
ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्था आणि जळगांव जिल्हा शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थेचा ‘राज्यस्तरीय अभ्यासवर्ग -२०२३’ यावर्षी दिनांक ५ आणि ६ ऑगस्ट,२०२३ रोजी जळगांव येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष डॉ.विजय लाड, सचिव श्री.अरुण वाघमारे व संघटक श्री.सर्जेराव जाधव यांनी दिली आहे. ग्राहक केंद्रबिंदू मानून ग्राहकांचे संघटन, ग्राहकांचे प्रबोधन व ग्राहकाला योग्य मार्गदर्शन करण्याचे काम संस्था करीत आहे. संस्थेच्या कार्यकर्त्याला संस्था, संस्थेची तत्वे, संस्थेची कार्यपद्धती, ग्राहक संबंधित कायदे, ग्राहकांचे हक्क, अधिकार आणि कर्तव्ये यांची माहिती होण्यासाठी या अभ्यासवर्गाचे आयोजन करण्यात येते.
संस्थेच्या विभाग, जिल्हा व तालुका शाखेचे पदाधिकारी, सदस्य व कार्यकर्ते यांनी या अभ्यास वर्गाला उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहनही संस्थेच्यावतीने करण्यात आले आहे.
ऑगस्टमध्ये आयोजित केलेल्या या अभ्यासवर्गाला महाराष्ट्रातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून चांगल्याप्रकारे यशस्वी करावे असे आवाहन जळगांव जिल्हा शाखेने केले आहे.
यावेळी प्रबोधनात्मक विषय,
संघटनात्मक विषय,
प्रशासनासह कार्यपद्धती,
अर्थव्यवस्थेचे पंचप्राण सत्कार
याशिवाय विभागवार उत्कृष्ठ कार्यकर्ता पुरस्कार देण्यात येणार आहेत.
सर्व विभागांनी जिल्हा कार्यकारिणीची, जिल्हा कार्यकारिणीने तालुका पदाधिकारी व कार्यकर्ते यांची बैठक घेऊन सर्वांना माहिती द्यावी. कोकण विभागातील सर्व जिल्ह्यांतील कार्यकर्त्यांनी या अभ्यास वर्गामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन संस्थेचे राज्य अध्यक्ष डॉ.विजय लाड, सचिव श्री.अरुण वाघमारे व राज्य सदस्य तथा कोकण विभाग प्रभारी अध्यक्ष प्रा.श्री. एस.एन.पाटील यांनी केले आहे.