वाढीव मानधन कागदावरच
आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक यांनी कोरोना या महामारीच्या संकट काळात जीवाची बाजी लावून सर्व्हेचे काम केले. त्यात काही आशा कोरोनाबाधित झाल्या. अशा संकट काळात त्यांनी केलेल्या कामाची दखल घेऊन शासनाने आशांना दोन हजार, तर गटप्रवर्तकांना तीन हजार रुपये वाढीव मानधन देण्याची घोषणा केली. त्यासाठी शासनाने 57 कोटींची तरतूद केली हाती. दिवाळीपूर्वी वाढीव मानधन मिळून आशांची दिवाळी गोड होईल, अशी आशा होती. मात्र, तीन महिन्यानंतरही वाढीव मानधन कागदावर राहिल्याने त्यांची दिवाळी यंदा कोरडीच राहिली आहे.
आशा स्वयंसेविका या कामावर आधारित मोबदल्यावर काम करत असतात. त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि रिपोर्टिंगसाठी गटप्रवर्तकांची नेमणूक करण्यात आली आहे.
आशांना 72 प्रकारची आरोग्यविषयक विविध कामे करावी लागतात. जिल्ह्यात ग्रामीण भागात दोन हजार 650 आणि शहरी भागात 100 अशा दोन हजार 750 आशा, तर 135 गट प्रवर्तक कार्यरत आहेत. मार्चमध्ये कोरोनाचे संकट आले. त्या संकट काळात आशा स्वयंसेविकांनी घरोघरी सर्व्हे करून कोणी आजारी आहे का? त्यांना काही लक्षणे आहेत का? घरातील प्रत्येकाच्या शरीराचे तापमान किती आहे? ऑक्सिजनचे प्रमाण किती आहे? या ना अशा अनेक बाबींची माहिती घेण्याचे मोठे काम केले. त्याबरोबर त्यांच्यावर नियंत्रण ठेऊन सर्व्हेसंदर्भात आशांना गावोगावी भेटी देऊन, त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी रिपोर्टिंग करण्याचे काम गटप्रवर्तकांनी केले. यात काही आशा, गटप्रवर्तक या कोरोनाबाधित झाल्या. त्यांनी एवढ्या संकटकाळात स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करूनही अनेकांना हॉस्पिटलमध्ये बेडही उपलब्ध झाले नाहीत. त्यांच्यामुळे त्यांचे नातेवाइक बाधित झाले. त्यांनाही बेड मिळाले नाहीत. त्यामुळे त्यांच्या नातेवाइकांना जीवास मुकावे लागल्याच्याही घटना घडल्या आहेत. महामारीच्या संकटकाळात आशा आणि गटप्रवर्तकांनी केलेल्या चांगल्या कामाची दखल घेऊन शासनाने आशांना दोन हजार, तर गटप्रवर्तकांना तीन हजार रुपये वाढीव मानधन जुलै महिन्यापासून देण्याची घोषणा केली. त्यासाठी शासनाने 57 कोटींची तरतूदही केली. त्यामुळे दिवाळीपूर्वी वाढीव मानधन मिळून आशा व गटप्रवर्तकांची दिवाळी गोड होईल अशी आशा त्यांना होती. मात्र, ते मानधन देण्यासाठी केवळ कागदोपत्री कार्यवाहीच सुरू आहे. त्यामुळे तीन महिन्यांनंतरही वाढीव मानधन कागदावर राहिल्याने त्यांची दिवाळी यंदा कोरडीच राहिली आहे.
मानधन देण्यासाठी अटींच अटी!
आशांना मानधन देण्यासाठी केंद्र शासनाने गेल्या चार महिन्यांत रेकॉर्ड किपिंग, व्हीएचएनडी, व्हीएचएनएससी आणि मासिक बैठकी यासाठी जेवढा मोबादला देण्यात आला आहे, तेवढाच मोबदला राज्य शासनाकडून दोन हजारांपर्यंत देण्यात येणार आहे. त्याचबरोबर गट प्रवर्तकांना 25 भेटी देणे गरेजेचे असते. त्यांना राज्य शासनाकडून भेटीसाठी जेवढा मोबदला देण्यात आला आहे, तेवढाच मोबदला तीन हजारांपर्यंत देण्यात येणार आहे.