*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा.सदस्य तथा लालित्य नक्षत्रवेल समूह प्रशासक लेखक कवी दीपक पटेकर लिखित अप्रतिम वृत्तबद्ध कविता*
*(लवंगलता वृत्त)*
*साठी तरणीताठी*
वय साठीचे होउन सुद्धा खुशीत जीवन जगतो
गालावरची लाली पाहुन हळूच आम्ही हसतो
डोक्यावरच्या केसांनाही तरणेताठे करतो
नाटकातल्या नटासारखे नटसम्राटच बनतो
ढोपरे जरी कुरबुर करती दुर्लक्ष तिकडे असतो
म्हातारा जर म्हणतील कुणी सर्व काळजी घेतो
तेल तुपाचे खाउन आम्ही तंदरुस्त मग होतो
सांज सकाळी फिरुनी चपला रोज झिजवुनी येतो
योगा आणिक व्यायामाच्या वर्गात नव्या जातो
नवे सोबती नित्य जोडुनी गीत खुशीचे गातो
जाता नाही जात वेळ मग बागेमध्ये रमतो
झाडांसम ना मित्र कुणीही गुंतवून मन घेतो
मांडीवरती नात नि नातू लाडे येउन बसती
कुणी अशी मज देईल खुशी स्वर्गामध्ये वरती..?
© दीपक पटेकर {दीपी}
सावंतवाडी
८४४६७४३१९६