बोबडी वळलीच आहे… आवाज बंद व्हायला वेळ लागणार नाही,

बोबडी वळलीच आहे… आवाज बंद व्हायला वेळ लागणार नाही,

वास्तुरचनाकार अन्वय नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणात नुकतीच ‘रिपब्लिक टीव्ही’चे मालक, संपादक अर्णव गोस्वामी यांना अटक करण्यात आली होती. अर्णव यांच्या अटकेनंतर भाजपनं ठाकरे सरकारला विशेषत: शिवसेनेला लक्ष्य केलं आहे. किरीट सोमय्या यांनी ठाकरे, वायकर आणि नाईक कुटुंबामध्ये मोठ्या प्रमाणावर जमिनीचे व्यवहार झाल्याचा गौप्यस्फोट केला होता. त्यावरून राजकारण तापलं आहे. यावरून उलटसुलट चर्चा होऊ लागल्यानं नाईक कुटुंबीयांनी स्वत: याबाबत खुलासा केला आहे.

अन्वय नाईक कुटुंबीयांनी एका वृत्त वाहिनीशी बोलताना यासंबंधी खुलासा केला आहे. “किरीट सोमय्या आधी झोपले होते. पण अर्णब गोस्वामीला अटक झाल्यानंतर जागे झाले आहेत,” असा टोला आज्ञा नाईक यांनी लगावला आहे. ‘अन्वय नाईक यांना आम्ही अग्नि दिला तेव्हा किरीट सोमय्या कुठे होते? त्यांची बोबडी वळली होती का? माझ्या घरातली दोन माणसं गेली आहेत. एक आई आणि तिचा मुलगा गेलाय. त्यांच्या मृत्यूचा जमीन व्यवहाराशी संबंध जोडू नका. बोबडी वळलीच आहे. आवाज बंद व्हायला वेळ लागणार नाही,’ असा इशाराही त्यांनी सोमय्यांना दिला.

‘आम्ही आमचा भूखंड विकू शकत नाही का? हा एक व्यवहार आहे. सोमय्यांचा आक्षेप नेमका कशाला आहे,’ असा प्रश्नही आज्ञा नाईक हिनं केला. ‘किरीट सोमय्यांनी आणखी कष्ट घ्यावेत. आणखी काही माहिती असेल तर काढावी. सोमय्यांना मदत हवी असेल तर आम्ही त्यांना पूर्ण सहकार्य करू. त्यांना राजकारणच करायचं असेल तर ते काहीही काढू शकतात. पण त्यातून काही निष्पन्न होणार नाही. ते अर्णव गोस्वामींना पाठिशी घालण्यासाठी हे सगळं सुरू आहे,’ असंही त्या म्हणाल्या.

‘सोमय्या यांनी केलेल्या आरोपांबद्दल आम्हाला कळलंय. त्याचा व्हिडिओ देखील मी पाहिलाय. पण सोमय्या जे सांगत आहेत, त्यात गुपित काहीच नाही. ठाकरे कुटुंबीयांनी आमच्याकडून जमीन विकत घेतलीय आणि आम्ही ती त्यांना दिलीय. त्यात कोणाला काही आक्षेप असण्याचं कारणच नाही,’ असं आज्ञा नाईक यांनी वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितलं.

प्रतिक्रिया व्यक्त करा