You are currently viewing तरुणाई अमली पदार्थांच्या विळख्यात – परशुराम उपरकर

तरुणाई अमली पदार्थांच्या विळख्यात – परशुराम उपरकर

अधिक्षक धडक मोहीम राबवून अमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करतील का?

कणकवली

सिधुदुर्ग जिल्ह्यातील तरुणाई अमली पदार्थाच्या विळख्यात फसत चालली आहे. त्यामुळे पोलिस प्रशासनाने अमलीपदार्थ विरोधी जनजागृती सप्ताह नुसता साजरा करू नये. एक वार्षिक कार्यक्रम पार पाडण्याची भूमिका न घेता जिल्हा पोलिस अधिक्षक धडक मोहीम राबवून अमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करतील का? असा सवाल मनसे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केला आहे.

कणकवली येथील मनसे संपर्क कार्यालयात सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. परशुराम उपरकर म्हणाले, सिंधुदुर्गात मुंबई, गोवा, कर्नाटक आदी भागातून गांजा, हकीम, चरस असे अमलीपदार्थ विक्रीसाठी येतात. हे पदार्थ विक्री करणारे मोठे रॅकेट आहे. महाविद्यालयाच्या बाहेर तसेच जिल्ह्यातील समुद्र किनारपट्टीवर तरुणासह पर्यटकांना राजरोसपणे हे अमलीपदार्थ विक्री केले जातात. त्यामूळे तरुणाईचे आयुष्य उध्वस्त होत आहे. व्यसनाच्या आहारी जाऊन तरुण चोरी तसेच अन्य गुन्हे करीत आहेत, अमलीपदार्थ मिळाला नाही म्हणून काहीजणानी आत्महत्या केली आहे. पर्यटन जिल्हा असलेला सिंधुदुर्ग अमलीपदार्थ मुक्त झाला पाहिजे. पोलिसांना सजग नागरिकांनी अमलीपदार्थ विक्री विषयी माहिती दिली तर अनेक पोलिस संबंधित अमलीपदार्थ विक्री करणाऱ्याना त्याबाबत सूचना देऊन सावध करीत असतात. त्या पोलिसांनी लक्षात घेतले पाहिजे की आपणही या जिल्ह्याचे रहिवासी आहोत. अमलीपदार्थांमुळे आयुष्य बरबाद होण्यामध्ये आपल्या कुटुंबातील किंवा नात्यातील तरुणही असू शकतात. त्यामुळे गैरकृत्य करणाऱ्यांवर कडक कारवाई होणे आवश्यक आहे.

यापूर्वी जिल्ह्यात जुगार अड्ड्यावर धाड पडली असताना पळून जाताना जुगार खेळणाऱ्या व्यक्तीचा विहिरीत पडून मृत्यू झाला आहे. तर कॅसिनो खेळण्यासाठी पैसे मिळावेत म्हणून सुशिक्षित तरुणांनी घरफोडी सारखे कृत्य केल्याचे समोर आले आहे.. आपली मुले कोठे जातात? नेमके काय करतात? एखादे गैरकृत्य तर करत नाहीत ना?याकडे पालकांनी लक्ष देणे गरजेचे आहे. त्याबाबत आवश्यकता भासल्यास पोलिसांना तसेच मनसेच्या कार्यकर्त्यांना माहिती द्यावी त्यांना निश्चितच सहकार्य मिळू शकेल. अमलीपदार्थ कोठून येतात? कोण विक्री करतो? याच्या मुळापर्यंत पोलिस गेल्यास जिल्ह्यातून अमली पदार्थांचे उच्चाटन करता येईल. त्यासाठी नागरिक, पोलिस, सर्वपक्षीय नेते यांनी एकत्रितपणे प्रयत्न केल्यास जिल्हा अमलीपदार्थ मुक्त होईल. जिल्ह्यातील अमलीपदार्थ विक्री करणारे एजेंट तरुणांना आपल्या जाळ्यात ओढत आहेत, त्यांना दुचाकी तसेच एक हजार रुपये देऊन अमलीपदार्थ विक्रीसाठी तयार करत आहेत. मात्र, स्थानिक पोलिस याबाबत माहिती असूनही त्यांच्यावर कारवाई करीत नाहीत. संबंधितांबरोबर आर्थिक मांडवली करून गैरकृत्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. असा आरोप देखील परशुराम उपरकर यांनी यावेळी केला…

प्रतिक्रिया व्यक्त करा

20 − sixteen =