कट्टा दशक्रोशी सकल मराठा समाजाच्यावतीने गुणवंत दहावी, बारावी विद्यार्थ्यांचा सत्कार
मालवण
मराठा समाजाने शिक्षणासाठी आर्थिक दुर्बल घटकचा फायदा घ्यावा. शिक्षणासाठी १० टक्के आरक्षण आहे. जिल्ह्यातील मुलांना या आरक्षणाचा फायदा घ्यावा. विद्यार्थी व पालकांनी सामाजिक घटना व बदल याकडे लक्ष ठेवावा. विद्यार्थ्यांनी सारथी योजनेचा लाभ घ्यावा. तसेच १० टक्के आर्थिक दुर्बल घटक योजना आणि अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ यांच्या योजनांचा फायदा घेवून शैक्षणिक प्रगती साधावी, असे आवाहन सकल मराठा समाजाचे जिल्हा समन्वयक ऍड सुहास सावंत यांनी कट्टा येथे बोलताना केले.
सकल मराठा समाज कट्टा दशक्रोशी यांच्यावतीने दहावी, बारावी परीक्षेत ८० टक्के गुण मिळविलेल्या समाजातील मुलांचा सत्कार रविवारी हडपीवाडी येथील नम्रता सभागृहात संपन्न झाला. यावेळी ६५ मुलांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ऍड सावंत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पेंडुर शासकीय रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ संजय पोळ यांच्यासह जिल्हा बँक संचालक बाबा परब, उद्योजक आशिष परब, डॉ सोमनाथ परब, डॉ रोहित डगरे, डॉ सिद्धार्थ परब, मंडळ अध्यक्ष डॉ जी आर सावंत, संतोष गावडे, वैष्णवी लाड, गौरी माळकर, वराड सरपंच सौ शलाका रावले, तिरवडे उपसरपंच सुशील गावडे, राकेश डगरे, कुडाळ मराठा यंग ब्रिगेडचे वैभव जाधव, उपाध्यक्ष विष्णू लाड, जयंद्रथ परब, खजिनदार भाई राणे, सुमित सावंत, समीर रावले, स्वप्नील गावडे, नारायण चिंदरकर, ग्रामपंचायत सदस्य ऋतुजा माळकर, हेमंत माळकर, आभाळ माया ग्रुप संस्थापक राकेश डगरे, भाई परब, श्रीकृष्ण गावडे, वेंगुर्लेकर सुभाष गावडे, भानजी गावडे, अमित सावंत यांच्यासह असंख्य मराठा बांधव उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना ऍड सावंत, २०१६ मधील मराठा समाजाची एकी आज दिसत नाही. कारण मिळालेले आरक्षण गेले. त्यामुळे समाजात संभ्रम निर्माण झाला आहे. पण एक ना एक दिवस आरक्षण मिळणार आहे. समाजाला ५० टक्केच्या आतील आरक्षण मिळावा यासाठी आमचा आग्रह आहे. मराठा समाजाच्या मुलांच्या माध्यमातून आम्हाला हे आरक्षण मिळवायचे आहे. मुलांनी एकत्रित येवून भविष्यासाठी आवाज उठविला पाहिजे. सामाजिक बदलांचे भान मराठा मुलांनी ठेवले पाहिजे. समाजासाठी सुरू केलेल्या सर्व योजनांचा लाभ मराठा विद्यार्थ्यांनी घ्यावा. आजूबाजूला पहा. जागृत राहिल्यास उदय होईल. निद्रिस्त राहिल्यास आपण मागे राहू, असे सांगितले.
यावेळी डॉ सोमनाथ परब यांनी आयुष्यात यशस्वी होण्यासाठी एक ध्येय्य ठेवा. त्यासाठी कठोर परिश्रम घ्या. स्पर्धात्मक परिस्थिती आहे. त्याची जाणीव ठेवा. दहावी पेक्षा बारावीतील गुणवत्ता वाढली पाहिजे, असे आवाहन केले. बाबा परब यांनी समाजातील मुलांच्या शिक्षणासाठी अडचण आल्यास सदैव पाठीशी राहणार असल्याचे सांगितले. यावेळी सरपंच शलाका रावले यांनी विचार मांडले. सूत्रसंचालन जयंद्रथ परब यांनी केले. प्रास्ताविक वैष्णवी लाड यांनी केले.
युपीएससीत तीन मुलांनी मिळविलेले यश जिल्ह्यासाठी सकारात्मक:- डॉ पोळ
यावेळी बोलताना वैद्यकीय अधीक्षक डॉ पोळ यांनी, दहावी आणि बारावी होण्याचे वय हे १६, १८ असते. या वयामध्ये जगाचा अनुभव खूप कमी असतो. त्यांना आई, वडील, शिक्षक आदर्श वाटत असतात. यानंतर आपण बाहेर पडणार असतो. ते जग वेगळे असते. पालकांनी आपली अपेक्षा मुलांवर लादू नये. मुलांना आपले आवडीचे क्षेत्र निवडण्याची लवचिकता द्या. मुलांनी सुद्धा अंतर्मनापासून क्षेत्र ठरवा. अन्य सांगतात म्हणून क्षेत्र निवडू नका. तुम्ही स्वतः ठरवून त्यादृष्टीने प्रयत्न करा. १६, १८ वय काळजीपूर्वक घ्या. या वयात चुकीचे घडण्याची शक्यता असते. परंतु याच वयात “लाथ मारीन तेथे पाणी काढेन” अशी स्थिती असते. सकारात्मक गोष्टींसाठी या शक्तीचा वापर करा. जिल्ह्यातील तीन मुलांनी यावर्षी युपीएससी परीक्षेत मिळविलेले यश हे जिल्ह्याच्या दृष्टीने सकारात्मक बदल आहे.