You are currently viewing सावंतवाडीत महिला बचत गटाच्या पुढाकारातून आरोग्य व नेत्र तपासणी शिबिर उत्साहात

सावंतवाडीत महिला बचत गटाच्या पुढाकारातून आरोग्य व नेत्र तपासणी शिबिर उत्साहात

सावंतवाडीत महिला बचत गटाच्या पुढाकारातून आरोग्य व नेत्र तपासणी शिबिर उत्साहात

वैश्यवाडा महिला उद्योग केंद्रात महिलांसह नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; उदबत्ती निर्मिती मशीनचा शुभारंभ, आरोग्यविषयक मार्गदर्शन

सावंतवाडी :

सुंदरवाडी शहर स्तर संघ व महिला उद्योग केंद्र, वैश्यवाडा यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, २८ नोव्हेंबर रोजी महिलांसाठी आरोग्य व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत झालेल्या या शिबिराला महिला बचत गटांच्या सदस्यांसह नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

या शिबिराचे नियोजन सुंदरवाडी शहर स्तर संघाच्या अध्यक्षा सुनीला गुंडू केळजी, उपाध्यक्षा यास्मिन शेख, सचिव मनीषा बांदेकर तसेच सदस्य सुषमा मेस्री, पूजा नाईक आणि स्नेहा नाईक यांनी केले होते.

शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी सावंतवाडी नगरपरिषदेचे सभापती मोतीराम चंद्रकांत नेवगी, सभापती दिपाली भालेकर, मोहिनी मडगावकर, नगरसेविका शर्वरी धारगळकर, दुलारी रांगणेकर, सुकन्या टोपले, स्नेहा सुनील नाईक, नगरसेवक दुर्गेश रमेश सूर्याजी तसेच जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र मसुरकर उपस्थित होते.

शिबिरासाठी वैद्यकीय अधिकारी डॉ. चिन्मय, डॉ. दुर्गा सावंत, डॉ. तेजश्री आडारकर, नेत्र चिकित्सा अधिकारी शुभजीत धुरी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ गायत्री वारंग, कक्षसेवक तुषार कोबळे आणि प्रयोगशाळा तज्ज्ञ ओमकार ठाकूर यांनी सेवा दिली. सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील जनरल सर्जन व पोटविकार तज्ज्ञ डॉ. रुपेश कुमार झा यांचीही उपस्थिती होती.

यावेळी नगरसेविका स्नेहा नाईक यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, सावंतवाडी शहरातील विविध प्रभागांमध्ये नगरपालिकेच्या माध्यमातून आरोग्य शिबिरे आयोजित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. नागरिक आणि महिला बचत गटांच्या सदस्यांसह त्यांच्या कुटुंबीयांचे आरोग्य चांगले राहावे, तसेच त्यांना आवश्यक आरोग्य सुविधा मिळाव्यात, हा या उपक्रमामागील उद्देश आहे. अशा उपक्रमांसाठी सर्वांनी सहकार्य करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

महिलांनी स्वावलंबी होण्याचे आवाहन
महिला उद्योग केंद्राच्या माध्यमातून वैश्यवाडा महिला बचत गटाच्या कक्षात उदबत्ती निर्मितीसाठी प्रथमच मशीनरीचा शुभारंभ सभापती मोतीराम तथा आनंद नेवगी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी अहिल्यादेवी होळकर यांना आदरांजली अर्पण करण्यात आली.

नगरसेवक देव्या सूर्याजी यांनी युव रक्तदाता संघटनेच्या माध्यमातून अनेक वर्षांपासून गरजू रुग्णांना मदत केली जात असल्याचे सांगितले. सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाच्या रुग्ण कल्याण समितीचा सदस्य म्हणून आरोग्य क्षेत्रातील गंभीर प्रश्न सोडविण्यासाठी आमदार दीपक केसरकर यांच्या माध्यमातून प्रयत्न केले जात असल्याचे त्यांनी नमूद केले. तज्ज्ञ डॉक्टरांच्या सहकार्याने सर्वसामान्य रुग्णांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले.

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचे जनरल सर्जन व पोटविकार तज्ज्ञ डॉ. रुपेश कुमार झा यांनी महिलांना आरोग्यविषयक मार्गदर्शन केले. वयाच्या चाळिशीनंतर स्तनात कोणत्याही प्रकारची गाठ जाणवल्यास तातडीने तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करून घेणे आवश्यक आहे. प्रत्येक गाठ कर्करोगाचीच असेल असे नाही; मात्र योग्य निदान आणि वेळेवर उपचार महत्त्वाचे आहेत, असे त्यांनी सांगितले.

तसेच हर्निया, अपेंडिक्स यांसह विविध आजारांवरील शस्त्रक्रियांबाबत त्यांनी माहिती दिली. सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात सकाळी ९.३० ते दुपारी १२.३० या वेळेत रुग्णांनी तपासणीसाठी यावे, असे आवाहन त्यांनी केले.

उपजिल्हा रुग्णालयाला लॅप्रोस्कोपी यंत्रसामग्री उपलब्ध झाल्यानंतर हर्निया, अपेंडिक्स आणि पित्ताशयाच्या पिशवीवरील शस्त्रक्रिया रुग्णालयातच करणे शक्य होणार असल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी नगरसेवक तथा रुग्ण कल्याण समितीचे सदस्य देव्या सूर्याजी यांनी यंत्रसामग्री मंजूर करून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिल्याचेही त्यांनी नमूद केले.

योजनांविषयी अधिक माहितीसाठी १८०० २३३ २२०० या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे त्यांनी सांगितले. तसेच मोतीबिंदू होण्याची कारणे, त्याची लक्षणे आणि उपचारपद्धती याबाबतही त्यांनी सविस्तर माहिती दिली. वयानुसार डोळ्यांच्या नैसर्गिक भिंगाची पारदर्शकता कमी होणे, मधुमेह, डोळ्यांना झालेली दुखापत, दीर्घकाळ स्टेरॉईडचा वापर आदी कारणांमुळे मोतीबिंदू होऊ शकतो. अंधुक दिसणे, प्रकाशाचा त्रास होणे, रंग फिकट दिसणे अशी लक्षणे जाणवल्यास नेत्ररोग तज्ज्ञांकडून तपासणी करून घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांचे महिला बचत गटाच्या वतीने पुष्पगुच्छ व फुलझाडे देऊन स्वागत करण्यात आले. आरोग्य तपासणी, नेत्र तपासणी आणि महिलांसाठी स्वयंरोजगाराची संधी अशा विविध उपक्रमांमुळे या कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले. शेवटी बचत गटाच्या महिला सदस्यांनी आभार प्रदर्शन केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा