You are currently viewing सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील फार्मसी विभागात कर्मचाऱ्यांची कमतरता

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील फार्मसी विभागात कर्मचाऱ्यांची कमतरता

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील फार्मसी विभागात कर्मचाऱ्यांची कमतरता;

अतिरिक्त कर्मचारी नियुक्त करण्याची राजेंद्र मसुरकर यांची मागणी

सावंतवाडी : प्रतिनिधी

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील फार्मसी विभागात केवळ एकच कर्मचारी कार्यरत असल्याने त्यांच्यावर कामाचा मोठा ताण पडत आहे. दररोज सुमारे साडेचारशे रुग्ण उपचारासाठी रुग्णालयात येत असताना औषध वितरणासाठी रुग्णांना मोठ्या गर्दीचा सामना करावा लागत आहे. विशेषतः वयोवृद्ध महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना या गर्दीमुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

या गंभीर समस्येकडे लक्ष वेधत जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र मसुरकर यांनी कोल्हापूर विभागाचे उपसंचालक डॉ. दिलीप माने तसेच जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांच्याकडे अतिरिक्त कर्मचारी नियुक्त करण्याची मागणी केली आहे.

शुक्रवारीही औषधे घेण्यासाठी रुग्णांची मोठी गर्दी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. एकाच कर्मचाऱ्याला एवढ्या मोठ्या संख्येने येणाऱ्या रुग्णांना औषधे देण्याची जबाबदारी पार पाडावी लागत असल्याने कामाचा ताण वाढत आहे. परिणामी रुग्णांनाही बराच वेळ प्रतीक्षा करावी लागत आहे.

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील दररोजची रुग्णसंख्या लक्षात घेता फार्मसी विभागात किमान आणखी एका कर्मचाऱ्याची नियुक्ती करणे आवश्यक आहे. त्यामुळे डॉ. दिलीप माने यांनी या प्रश्नात लक्ष घालून जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांना अतिरिक्त कर्मचारी उपलब्ध करून देण्याबाबत योग्य ते आदेश द्यावेत, अशी मागणी राजेंद्र मसुरकर यांनी केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा