You are currently viewing जात पडताळणीची संपूर्ण प्रक्रिया आता ऑनलाइन; अर्जदारांना कार्यालयात जाण्याची गरज नाही

जात पडताळणीची संपूर्ण प्रक्रिया आता ऑनलाइन; अर्जदारांना कार्यालयात जाण्याची गरज नाही

जात पडताळणीची संपूर्ण प्रक्रिया आता ऑनलाइन; अर्जदारांना कार्यालयात जाण्याची गरज नाही

जात वैधता प्रमाणपत्रासाठी डिजिटल प्रणाली कार्यान्वित; ६० दिवसांत निर्णय घेण्याचे शासनाचे उद्दिष्ट, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणीची सुविधा

शिवसेना कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख अ.जा. प्राजक्त चव्हाण यांची माहिती

मुंबई :

राज्यातील विद्यार्थी, नोकरीसाठी प्रयत्न करणारे उमेदवार, निवडणूक लढविणारे इच्छुक तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ घेणाऱ्या नागरिकांसाठी महत्त्वाचा निर्णय महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने घेतला आहे. आता जात प्रमाणपत्र पडताळणीची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येणार असून, यामुळे अर्जदारांचा वेळ, श्रम आणि कार्यालयीन फेऱ्या वाचण्यास मदत होणार आहे. यासंदर्भात शासनाने २५ नोव्हेंबर २०२६ रोजी शासन परिपत्रक जारी केले आहे.

जात वैधता प्रमाणपत्र मिळविण्याच्या प्रक्रियेत सुलभता आणणे, अर्जातील त्रुटी कमी करणे, अर्जाची सद्यस्थिती ऑनलाइन उपलब्ध करून देणे आणि प्रशासकीय कामकाजात पारदर्शकता वाढविणे हा या निर्णयामागील मुख्य उद्देश आहे.

बार्टी आणि टीसीएसच्या सहकार्याने आधुनिक प्रणाली विकसित

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या मार्गदर्शनाखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे यांच्या सहकार्याने तसेच टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) यांच्या तांत्रिक सहकार्याने जात प्रमाणपत्र पडताळणी माहिती प्रणाली (Caste Certificate Validity Information System – CCVIS) विकसित करण्यात आली आहे.

या प्रणालीच्या माध्यमातून अर्ज दाखल करणे, आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे, अर्जाची सद्यस्थिती तपासणे, त्रुटींची पूर्तता करणे आणि अंतिम निर्णयाची माहिती मिळविणे अशा सुविधा ऑनलाइन उपलब्ध होणार आहेत. तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित चॅटबॉटद्वारे अर्जदारांना मार्गदर्शन व प्रश्नांचे निराकरण करण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

आता केवळ ऑनलाइन अर्ज स्वीकारले जाणार

जात वैधता प्रमाणपत्रासाठी अर्जदारांना यापुढे केवळ ऑनलाइन प्रणालीद्वारेच अर्ज सादर करावा लागणार आहे. अन्य कोणत्याही मार्गाने केलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. अर्जासोबत आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे, दस्तऐवजी पुरावे आणि प्रतिज्ञापत्रे स्कॅन करून ऑनलाइन अपलोड करणे बंधनकारक राहील.

अर्जदारांनी मूळ किंवा प्रमाणित कागदपत्रांच्या प्रती स्पष्टपणे स्कॅन करून अपलोड कराव्यात. जात नोंदीबाबतचा किमान एक दस्तऐवजी पुरावा आणि मानीव दिनांकापूर्वीच्या रहिवासाबाबतचा किमान एक दस्तऐवजी पुरावा सादर करणे आवश्यक आहे. संबंधित पुरावा उपलब्ध नसल्यास स्वयंघोषणापत्र सादर करण्याची तरतूद करण्यात आली आहे. मात्र, आवश्यकतेनुसार पडताळणी समिती अतिरिक्त पुराव्यांची मागणी करू शकते.

विशेष म्हणजे, सर्व कागदपत्रे ऑनलाइन अपलोड केल्यानंतर त्यांची प्रिंट काढून पुन्हा जात पडताळणी समितीच्या कार्यालयात जमा करण्याची आवश्यकता राहणार नाही.

आधार क्रमांकाशी जोडलेली अर्ज प्रक्रिया; एकच अर्ज करता येणार

नवीन प्रणाली आधार क्रमांकाशी जोडलेली असल्यामुळे अर्जदाराला एकच अर्ज दाखल करता येणार आहे. त्यामुळे अर्ज भरताना वैयक्तिक माहिती आणि कागदपत्रे अपलोड करताना विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अर्जाची तांत्रिक तपासणी आणि त्रुटी पूर्ततेची संधी

ऑनलाइन अर्ज प्राप्त झाल्यानंतर जात पडताळणी समितीच्या कार्यालयातील लिपिकाकडून अर्जाची प्राथमिक तांत्रिक तपासणी केली जाईल. अर्जातील सर्व माहिती पूर्ण आहे का, अपलोड केलेली कागदपत्रे उघडतात का, ती स्पष्ट व वाचनीय आहेत का, तसेच मूळ कागदपत्रांच्या प्रती योग्य प्रकारे अपलोड केल्या आहेत का, याची तपासणी केली जाणार आहे.

अर्जात त्रुटी आढळल्यास त्या नमूद करून अर्ज सदस्य सचिव तथा संशोधन अधिकारी यांच्याकडे पाठविण्यात येईल. त्रुटी योग्य असल्यास अर्जदाराला दुरुस्ती व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी अर्ज परत पाठविला जाईल. अर्ज परिपूर्ण असल्यास सादर केलेल्या पुराव्यांच्या आधारे गुणवत्तेवर निर्णय घेण्याची प्रक्रिया सुरू होईल.

गरजेनुसार पुराव्यांची पडताळणी आणि दक्षता पथकाची चौकशी

अर्जदाराने सादर केलेल्या पुराव्यांच्या आधारे जात दावा व रहिवास सिद्ध होत असल्यास समितीकडून वैधतेचा निर्णय घेतला जाईल. मात्र, पुराव्यांची संबंधित आस्थापनांकडून खातरजमा करणे आवश्यक असल्यास समिती त्या संस्थांशी पत्रव्यवहार करून पडताळणी करेल.

काही प्रकरणांमध्ये जातीच्या दाव्याची किंवा पुराव्यांची अधिक चौकशी आवश्यक असल्यास प्रकरण दक्षता पथकाकडे पाठविण्यात येईल. दक्षता पथकाच्या अहवालानुसार आवश्यक ती पुढील कार्यवाही केली जाईल.

व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ऑनलाइन सुनावणी

अर्जदाराला सुनावणी देणे आवश्यक असल्यास ती ऑनलाइन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतली जाणार आहे. त्यामुळे प्रत्येक प्रकरणासाठी प्रत्यक्ष समिती कार्यालयात उपस्थित राहण्याची आवश्यकता कमी होणार आहे. विशेष व अपवादात्मक परिस्थितीत बाटीच्या महासंचालकांची खात्री झाल्यानंतर प्रत्यक्ष सुनावणीस परवानगी दिली जाऊ शकते.

दक्षता पथकाच्या अहवालानंतर अर्जदाराच्या पुराव्यांबाबत शंका असल्यास समितीकडून नमुना २५ मधील कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येईल. अर्जदाराला आपले म्हणणे मांडण्याची योग्य संधी दिल्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाईल.

पुरावे सिद्ध झाल्यास डिजिटल स्वाक्षरीने प्रमाणपत्र

अर्जदाराचा जात दावा आणि आवश्यक रहिवासाचे पुरावे योग्य असल्याचे समितीच्या अध्यक्ष व सदस्यांनी मान्य केल्यास जात दावा वैध ठरविण्यात येईल. त्यानंतर प्रणालीमध्ये जात वैधता प्रमाणपत्र तयार होऊन समितीच्या उपायुक्तांच्या डिजिटल स्वाक्षरीने ते निर्गमित केले जाईल.

तसेच अर्जदाराने रक्ताच्या नात्यातील व्यक्तीचे जात वैधता प्रमाणपत्र पुरावा म्हणून सादर केले असल्यास, संबंधित प्रमाणपत्र प्रणालीमध्ये ऑनलाइन प्रसिद्ध करण्याची तरतूदही करण्यात आली आहे.

जात दावा अवैध ठरविण्यापूर्वी संधी देणे बंधनकारक

अर्जदाराने सादर केलेल्या पुराव्यांवरून जात दावा सिद्ध होत नसल्यास किंवा दक्षता पथकाच्या अहवालानंतरही समाधानकारक खुलासा न मिळाल्यास समिती कारणांसहित आदेश पारित करून जात दावा अवैध ठरवू शकते. मात्र, अर्जदाराला योग्य संधी आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी दिल्याशिवाय जात दावा अवैध ठरविता येणार नाही, अशी स्पष्ट तरतूद शासनाने केली आहे.

६० दिवसांत निर्णय घेण्याचे उद्दिष्ट; पाचव्या महिन्यात अंतिम संधी

जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने शक्यतो अर्ज प्राप्त झाल्यापासून ६० दिवसांच्या आत वैधतेबाबत निर्णय घेणे अपेक्षित आहे. समितीचा निर्णय अर्जदाराला SMS, WhatsApp किंवा ई-मेलद्वारे कळविण्यात येईल.

अर्जात त्रुटी असल्यास त्या पूर्ण करण्यासाठी पुढील दोन महिने ऑनलाइन प्रणालीद्वारे अर्जदाराला SMS, WhatsApp किंवा ई-मेलद्वारे सूचना दिल्या जातील. त्यानंतर पाचव्या महिन्यात त्रुटींची पूर्तता करण्यासाठी अंतिम व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सुनावणीची संधी दिली जाईल. तरीही अर्जदाराने प्रतिसाद न दिल्यास किंवा आवश्यक कागदपत्रे सादर न केल्यास प्रकरण निकाली काढण्यात येईल.

जात वैधता प्रमाणपत्रासाठी सुधारित शुल्क पुढीलप्रमाणे

शासनाने नवीन ऑनलाइन प्रणालीच्या अनुषंगाने सेवा शुल्कात सुधारणा केली आहे.

१. शैक्षणिक प्रयोजनासाठी – ₹१००

२. निवडणूक प्रयोजनासाठी –

* ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद – ₹५००
* महानगरपालिका, नगरपालिका, नगर परिषद व नगरपंचायत – ₹१,०००

१. सेवाविषयक प्रयोजनासाठी – ₹१,०००

२. शासकीय योजनांचा लाभ किंवा सवलती घेण्यासाठी जात वैधता प्रमाणपत्र बंधनकारक असल्यास – ₹१,०००

अपीलीय प्राधिकरण किंवा न्यायालयाच्या आदेशानुसार अर्ज पुन्हा सुरू करता येणार

समितीने वैध किंवा अवैध ठरविलेल्या प्रकरणात अपीलीय प्राधिकरण अथवा न्यायालयाच्या आदेशानुसार संबंधित अर्ज संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव यांना बाटीच्या महासंचालकांच्या पूर्वमान्यतेने पुन्हा सुरू (Reopen) करता येणार आहे.

ऑनलाइन अर्जासाठी अधिकृत संकेतस्थळ

जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी शासनाने विकसित केलेली नवीन CCVIS प्रणाली पुढील संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

https://www.cvc.barti.in

या नव्या निर्णयामुळे राज्यातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवेश, शिष्यवृत्ती, शासकीय व निमशासकीय नोकरी, निवडणूक तसेच विविध शासकीय योजनांसाठी आवश्यक असलेले जात वैधता प्रमाणपत्र मिळविण्याची प्रक्रिया अधिक सुलभ, पारदर्शक आणि तंत्रज्ञानाधारित होण्यास मदत होणार आहे. विशेषतः ग्रामीण भागातील नागरिकांना वारंवार कार्यालयात जाण्याची गरज कमी होऊन ऑनलाइन माध्यमातून अर्जाची स्थिती जाणून घेणे आणि आवश्यक कार्यवाही करणे शक्य होणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा