You are currently viewing क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी सागरेश्वर येथे दुसरे साहित्य संमेलन : १ डिसेंबरला आयोजन
Oplus_16908288

क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी सागरेश्वर येथे दुसरे साहित्य संमेलन : १ डिसेंबरला आयोजन

विटा / प्रदीप जोशी :

स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात क्रांतिकारी पर्व निर्माण करणाऱ्या क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या देदीप्यमान कार्याचे स्मरण आणि त्यांच्या विचारांचा जागर करण्यासाठी सागरेश्वर मंदिर परिसरात दुसऱ्या क्रांतिसिंह नाना पाटील साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार, दि. १ डिसेंबर २०२६ रोजी सकाळी ११.३० वाजता या संमेलनाचा प्रारंभ होणार आहे.

भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील प्रतिसरकारच्या ऐतिहासिक पर्वाशी सागरेश्वर मंदिर आणि परिसराचे अतूट नाते आहे. क्रांतिसिंह नाना पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांना या डोंगररांगांनी आणि परिसराने आश्रय दिला. ब्रिटिश सत्तेविरुद्धच्या संघर्षात प्रतिसरकारच्या स्वातंत्र्यसैनिकांना या भूमीने संरक्षण दिले. याच परिसरातून क्रांतिसिंह नाना पाटील यांनी ब्रिटिश सत्तेला आव्हान देत स्वातंत्र्यलढ्याची मशाल धगधगती ठेवली. अशा ऐतिहासिक भूमीवर साहित्य संमेलनाच्या माध्यमातून क्रांतिसिंहांच्या स्मृती जागविण्याचा आणि त्यांच्या विचारांचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा स्तुत्य उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

या संमेलनाचे अध्यक्षस्थान क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या कार्याचे अभ्यासक आणि चरित्रलेखक प्राचार्य डॉ. दिनकरराव पाटील भूषविणार आहेत. ज्येष्ठ साहित्यिक रघुराज मेटकरी हे संमेलनाचे स्वागताध्यक्ष असून, व्ही. वाय. पाटील (आबा) यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार आहे.

सकाळी ११.३० वाजता संमेलनाचे पहिले सत्र सुरू होणार असून, त्यानंतर दुपारी १.३० वाजता निमंत्रितांचे कविसंमेलन आयोजित करण्यात आले आहे. या कविसंमेलनातून परिसरातील कवी आपल्या कवितांच्या माध्यमातून सामाजिक, ऐतिहासिक आणि समकालीन वास्तवाचे दर्शन घडविणार आहेत.

क्रांतिसिंह नाना पाटील यांचे कार्य म्हणजे केवळ स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास नाही, तर अन्यायाविरुद्ध उभे राहण्याची प्रेरणा देणारा विचार आहे. त्यांच्या क्रांतिकारी कार्याचे स्मरण साहित्याच्या माध्यमातून करणे, ही या संमेलनामागील महत्त्वपूर्ण भूमिका आहे. इतिहासाच्या पाऊलखुणा जपताना साहित्याच्या माध्यमातून नव्या पिढीला स्वातंत्र्यलढ्याची प्रेरणा देण्याचे काम या संमेलनातून होणार आहे.

प्रा. विश्वनाथ गायकवाड, कवी एम. बी. जमादार, ॲड. सुभाष पाटील आणि सागरेश्वर उत्कर्ष मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने या साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

या ऐतिहासिक आणि साहित्यिक सोहळ्यास परिसरातील साहित्यिक, कवी, लेखक, वाचक आणि साहित्यप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा