*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ लेखक कवी श्रीनिवास गडकरी लिखित अप्रतिम काव्यरचना*
*तुझ्या संगती*
वृत्त : वनहरिणी
तुला पाहता भल्या पहाटे ऋतू केव्हढे भरास येती
दंवात ओल्या भिजून सारे गंधासोबत घरास येती
घमघम करतो उजाडताना अंगणामधे सोनकेवडा
वेलीवरती इवला इवला फुलून आला मत्त कागडा
फुले वेचता तुझी पैंजणे छुमछुमताना धुक्यात न्हाती
दंवात ओल्या भिजून सारे गंधासोबत घरास येती
क्षितिजावरती जमून आला रंगांचा हा खेळ अनोखा
नव्या दिसाचे स्वागत करते दिवाकराची तेजस रेखा
लगबग सारी तुझी पाहता चैतन्याने सारे फुलती
दंवात ओल्या भिजून सारे गंधासोबत घरास येती
अंगणामध्ये दंगा करती चिमण्या पोपट, बुलबुल मैना
सुस्नाताच्या तुझ्या दर्शने मनात माझी झाली दैना
तुला पाहता आनंदाने खगगण सारे हाका देती
दंवात ओल्या भिजून सारे गंधासोबत घरास येती
श्रीनिवास गडकरी
पुणे
