You are currently viewing सोनुर्ली माऊलीच्या जत्रोत्सवाला हजारो भाविकांची मांदियाळी!

सोनुर्ली माऊलीच्या जत्रोत्सवाला हजारो भाविकांची मांदियाळी!

सोनुर्ली माऊलीच्या जत्रोत्सवाला हजारो भाविकांची मांदियाळी!

आई माऊलीचा उदो उदो’च्या जयघोषाने सोनुर्ली नगरी दुमदुमली; गोवा, कर्नाटकसह महाराष्ट्रातील भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी

सावंतवाडी : प्रतिनिधी

दक्षिण कोकणचे प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोनुर्ली येथील श्री देवी माऊलीच्या वार्षिक जत्रोत्सवाला हजारो भाविकांच्या उपस्थितीत भक्तिमय आणि उत्साही वातावरणात प्रारंभ झाला. ‘आई माऊलीचा उदो उदो’च्या जयघोषाने संपूर्ण सोनुर्ली नगरी दुमदुमून गेली असून, महाराष्ट्रासह गोवा आणि कर्नाटक राज्यांतूनही भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी दाखल झाले आहेत.

दोन दिवस चालणाऱ्या या जत्रोत्सवाची सुरुवात बुधवारी पहाटे धार्मिक विधींनी झाली. उत्सवमूर्तीवर दुग्धाभिषेक, शास्त्रोक्त पूजन करून महानैवेद्य अर्पण करण्यात आला. त्यानंतर भाविकांसाठी देवीचे दर्शन खुले करण्यात आले. पहाटेपासूनच मंदिर परिसरात दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या. देवीची ओटी भरण्यासह केळी अर्पण करण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती.

दुपारनंतर भाविकांची गर्दी आणखी वाढली. सायंकाळी आणि रात्री लोटांगणापूर्वी संपूर्ण मंदिर परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. भाविकांना उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी देवस्थान कमिटीने मंडपाची व्यवस्था केली होती. पोलीस प्रशासन, देवस्थान कमिटी आणि स्थानिक स्वयंसेवकांच्या नियोजनामुळे दर्शन व्यवस्था शिस्तबद्ध पद्धतीने पार पडली.

भाविकांच्या प्रवासासाठी सावंतवाडी एसटी आगारातून जादा बसेस सोडण्यात आल्या होत्या. त्यामुळे एसटी बसेसमधून भाविक मोठ्या संख्येने सोनुर्लीत दाखल होत होते. जत्रोत्सवानिमित्त मंदिर परिसरात विविध व्यावसायिकांनी दुकाने थाटली आहेत. केळी, फुले, पूजेचे साहित्य, सुप्रसिद्ध मालवणी खाजे यांसह खेळणी, गृहोपयोगी वस्तू, आइस्क्रीम आणि ज्वेलरीच्या स्टॉल्सवर खरेदीसाठी भाविकांची गर्दी होत आहे.

जत्रोत्सवानिमित्त मंदिरात आकर्षक फुलांची सजावट आणि नेत्रदीपक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. रात्रीच्या वेळी विद्युत रोषणाईने उजळलेले माऊलीचे मंदिर अधिकच मनमोहक दिसत आहे. गावातील घरांवरही रोषणाई करण्यात आल्याने संपूर्ण सोनुर्ली नगरीत उत्सवी चैतन्य निर्माण झाले आहे.

सोनुर्ली माऊलीच्या जत्रोत्सवानिमित्त राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील सर्वपक्षीय मान्यवरांनी उपस्थिती लावत देवीचे दर्शन घेतले. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर यांनी सकाळी देवीचे दर्शन घेतले. यावेळी देवस्थान कमिटीच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. माजी राज्यमंत्री प्रवीणभाई भोसले यांनी सहकुटुंब उपस्थित राहून माऊलीची मानाची ओटी भरली.

भाजपचे युवा नेतृत्व विशाल परब, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोकण विभागीय महिला अध्यक्ष अर्चना घारे-परब, माजगाव विभागाचे जिल्हा परिषद सदस्य विक्रांत सावंत, जिल्हा परिषदेच्या माजी महिला व बालकल्याण सभापती शर्वाणी गावकर, पंचायत समिती सदस्य जितेंद्र गावकर, माजी उपसभापती संदीप नेमळेकर यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी माऊलीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी उपस्थित भाविकांना जत्रोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा