खास. नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, सौ. नीलमताई राणे, आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा उत्साहात
कणकवली / प्रतिनिधी :
सिंधुदुर्गातील नागरिकांना दर्जेदार आणि आधुनिक वैद्यकीय सुविधा स्थानिक पातळीवर उपलब्ध होण्याच्या दृष्टीने कणकवली तालुक्यातील तळेरे येथील चैतन्य नर्सिंग होम, ऑर्थोपेडिक अँड इन्फर्टिलिटी सेंटरची सुरुवात झाली. माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे, सौ. नीलमताई राणे, पालकमंत्री नितेश राणे आणि आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा उत्साहात पार पडला.
यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अपूर्वा बासूर, तहसीलदार दीक्षांत देशपांडे, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्यासह डॉ. मिलिंद कुलकर्णी, डॉ. ऋचा कुलकर्णी व वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
रुग्णाला बरे करणे हाच डॉक्टरांचा खरा धर्म!
खासदार नारायण राणे म्हणाले, रुग्णालयाची ओळख भव्य इमारत किंवा उद्घाटनाने होत नाही, तर तेथून रुग्ण ठणठणीत बरा होऊन बाहेर पडतो की नाही, यावर ठरते. डॉक्टरांनी ज्ञान, अनुभव आणि कौशल्याचा योग्य वापर करून प्रत्येक रुग्णाला न्याय द्यावा. रुग्णांचा विश्वास संपादन करणे हेच रुग्णालयाचे खरे यश आहे.
स्थानिक तरुण डॉक्टरांनी जिल्ह्यातच सेवा द्यावी!
पालकमंत्री नितेश राणे यांनी डॉ. कुलकर्णी कुटुंबीयांच्या योगदानाचे कौतुक केले. उच्च शिक्षण आणि कौशल्य संपादन केल्यानंतर तरुण डॉक्टरांनी आपल्या जिल्ह्यात परतून जनतेची सेवा करावी. कुलकर्णी कुटुंबाच्या पुढील पिढीने हा आदर्श जपला आहे, ही अभिमानाची बाब आहे, असे ते म्हणाले. सिंधुदुर्गातील रुग्णांना उपचारांसाठी गोवा किंवा कोल्हापूरला जावे लागू नये, यासाठी जिल्ह्यातच सक्षम आरोग्य सुविधा विकसित होणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी आमदार निलेश राणे यांनीही रुग्णालयाच्या माध्यमातून परिसरातील नागरिकांना उपलब्ध होणाऱ्या आरोग्य सुविधांच्या दृष्टीने शुभेच्छा व्यक्त केल्या.
या सेंटरमधून ऑर्थोपेडिक उपचारांसह वंध्यत्व निवारणासंदर्भातील सेवा उपलब्ध होणार आहेत. चैतन्य नर्सिंग होमच्या माध्यमातून जिल्ह्याच्या आरोग्यसेवेला नवी जोड मिळणार आहे.
