*ज्येष्ठ लेखिका कवयित्री पत्रकार मेघा कुलकर्णी कोल्हटकर “मेघनुश्री” लिखित सामाजिक लेख*
*औटघटकेची मजा आणि आयुष्यभराची सजा*
हा विषयच गंभीर आहे, पण सामाजिक कार्य करताना हाताबाहेर जाणारी परिस्थिती लेखनातून मांडावीशी वाटली. सर्वत्रच ही समस्या दिसून येते. सध्या कोणाताही छोटासा विजय असेल तरी पार्टी हा शब्द लगेच येतो. कोणत्याही वयोगटांतील व्यक्ती असू दे त्यांचा हा बेरंग पाहूनच कीव करावीशी वाटते. तरुण वर्गाला तर रात्री, बेरात्री हिंडण्याची फार हौस आहे. शहरापासून कुठेतरी लांब असलेल्या डोंगरावर, गड-किल्ल्यांवर बसायचं, नको तो गोंधळ घालायचा, मुख्य म्हणजे जागोजागी ढीगभर कचरा करायचा. समुद्रकिनारेही यांतून सुटलेले नाहीत, “साफसफाई करणारे कणभर आणि कचरा करणारे मणभर” अशी परिस्थिती उद्भवली आहे. औटघटकेची मजा काही जणांना नंतर आयुष्यांतून उठवते याचे भानच आजकाल राहिलेले नाही. शिकणाऱ्या मुलांकडे दारूच्या बाटल्यांसाठी पैसे येतात कुठून? हाच मुख्य प्रश्न आहे. जीवन व्यसनाधीन होताना खूप सोपे झाले आहे, परंतु कॉलेजमध्ये लेक्चर्सला हजेरी लावणे शक्य होत नाही, बरीच कारणेही दिली जातात. पालकांनाही बऱ्याच वेळा पत्ता नसतो या कशाचाही.
पैसे काही कष्ट केल्याशिवाय मिळत नाहीत, मग ही चैनी चालते ती एकमेकांच्या सहाय्याने. चार-दोन मुलं-मुली एकत्र येतात, पैसा उडवण्याचे काम सुरू असते. सोशल मीडिया ही अत्यंत उपयुक्त सोय आहे, पण त्याचा अनावश्यक वापर करून अनेक समस्या उद्भवत आहेत. कोणताही गैरप्रकार करताना लक्षांत घेतले जात नाही. परंतु सापडल्यावर तोंडे लपवणे, आणि “यावेळी फक्त सोडा” अशी मागणी करणे कितपत योग्य आहे? अनेक चांगले उपक्रम करणाऱ्या संस्थांशी जोडून घेऊन कार्य करत राहिली ही नवीन पिढी, तर निदान नांव तरी चांगले राहील. इथे एक सांगावेसे वाटते कि, मनुष्यजन्म एकदाच मिळतो आणि अपघात झाल्यावर तो टिकवून ठेवण्याची गरज क्षणोक्षणी वाटते. नशा असावी ती कर्तुत्वाची, ध्येयाची, महत्वकांक्षेची. एकीकडे शिक्षणासाठी, नोकरीसाठी आंदोलने करावी लागतायत तर, दुसऱ्या बाजूस कष्ट करण्याची तयारी नसल्यामुळे म्हणून मग पार्टी, गावभर फिरणे, वादावादी, मारामाऱ्या हे उद्योग सुचतात. मुलांच्या शिक्षण, करिअरसाठी महागाईमुळे पालक अक्षरश: त्यांचे जीवन गहाण टाकतायत हे तरी लक्षांत घेतले पाहिजे.
घरांतल्या स्वच्छतेइतकीच गावाची / शहराची स्वच्छता महत्वाची आहे. सध्या ही एक परिस्थितीही अशी आहे की घर आणि गाडी आजच्या पिढीस जन्मापासून मिळत आहे. संसारिक स्थैर्यासाठी आणि सामाजिक राहणीमानांतील उंची वाढवण्यासाठी पालक अथक परिश्रम करत याची पूर्तता करत आहेत, त्यामुळे तरुण पिढीतील काहीजण चैनीच्या वेगवेगळ्या वाटांवर जात आहे. त्याशिवाय सर्वच गोष्टींचे सोशल मीडियावर प्रदर्शन हे सुद्धा फार महत्वाचे काम होऊन बसले आहे. एखाद्या समूहांतील कोणी एक विद्यार्थी परिस्थितीने गरीब असेल तर तो चैनीसाठी घरांतल्या पैशांची चोरी करायला मागे-पुढे पहात नाही. त्यानंतरही अशा चुका त्याला किंवा तिला पुन:पुन्हा कराव्याशा वाटतात. शरीराचे, मनाचे नुकसान करणाऱ्या गोष्टींकडे कितीही आकर्षण वाटलं तरी परिवारासाठी यांतून पुढे काय साध्य होणार हे विचारांत घेतले पाहिजे.
विषय खूप मोठा आणि महत्वाचा आहे, वाईट कृत्यातून झालेली मानहानी कधीच भरून निघत नाही. रुजलेली मानसिकता बदलणे सोपे काम नाही. स्पर्धायुगांत संघर्ष अटळच आहे, चांगला मार्ग जरी खडतर असला तरी त्यांमुळे गालबोट कुठेच लागत नाही.
© मेघनुश्री [लेखिका,पत्रकार]
