विटा / प्रदीप जोशी, ज्येष्ठ पत्रकार :
पत्री सरकार 1942 हा चित्रपट आजपासून चित्रपटगृहात दाखल झाला आहे. क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रति सरकार वरील हा चित्रपट असल्याची माहिती क्रांतिसिंह यांचे नातू सुभाष पाटील यानी दिली.
त्यांनी दिलेली माहिती अशी : पत्री सरकार किंवा प्रतिसरकार हे ब्रिटिश सरकारच्या विरोधात झालेल्या स्वातंत्र्य लढ्यातील धगधगते पर्व होते. या पर्वाचे महानायक होते, क्रांतीसिंह नाना पाटील! १९४२ साली स्थापन झालेल्या आणि देशातील सर्वाधिक काळ टिकलेल्या सशस्त्र भूमिगत लढ्याचे नायक होते क्रांतिसिंह नाना पाटील! छत्रपती शिवाजी महाराज,महात्मा ज्योतिबा फुले, शहीद भगतसिंग आणि महात्मा गांधी या महामानवांच्या विचारांनी प्रेरित होऊन तत्कालीन सातारा जिल्ह्यातील जवळजवळ ८० ते १०० कार्यकर्त्यांनी घरदार सोडून भूमिगत लढा सुरू केला. हा प्रतिसरकारचा पायाभूत संच होता. सावकार आणि खबऱ्यांना पत्र्या ठोकणे, शेतकरी शेतमजुरांना न्यायदान करणे, आणि ब्रिटिश विरोधी संघर्ष तेवत ठेवणे हे कार्य त्यांनी केले.या लढ्याने ब्रिटिशांना सळो की पळो करून सोडले. जुलमी ब्रिटिश सत्तेच्या , सावकारशाहीच्या, आणि जातीय सरंजामशाहीच्या विरोधात या तरुणांनी युद्ध पुकारले. एक अंधश्रद्धा मुक्त, जातीपाती विहीन,समाजवादी स्वराज्य स्थापन करण्याचा करण्याचे स्वप्न त्यांनी पाहिले. या स्वप्नाचे प्रणेते होते अखंड क्रांतिकारक क्रांतिसिंह कॉम्रेड नाना पाटील!
प्रतिसरकारच्या सर्व चळवळीच्या नेतृत्वाची जबाबदारी नाना पाटील यांच्यावर होती.भूमिगत अवस्थेत ते मीटिंगांना फारसे येत नसले तरी पोलिसांच्या हाती सापडलेल्या भूमिगताने अगदी शेवटचा इलाज म्हणून हे पत्र अथवा रिवाल्वर तुला कोणी दिले? या प्रश्नांवर मला नाना पाटलांनी गावाच्या बाहेर झाडाखाली दिले हेच उत्तर असायचे.त्यामुळे नाना पाटील म्हणजे फार भयंकर प्रकरण आहे असे सरकारला लक्षात आले. सरकारच्या पोलीस खात्याने त्यांना पकडण्याचा खूप प्रयत्न केला पण लोकांच्या पाठिंब्या मुळे स्वातंत्र्य मिळेपर्यंत नाना पाटील पोलिसांच्या हाती लागले नाहीत. बेळगावच्या सीमेपासून सातारा, पुण्यापर्यंत एकाच वेळी अनेक ठिकाणाहून ब्रिटिशांकडे संदेश येत ‘नाना पाटील आले होते आणि त्यांनी खबरी व सावकारांचा बंदोबस्त केला आहे’ ब्रिटिशांना नाना पाटील एकाच वेळी किती ठिकाणी उपस्थित असतात हे कळणेच अशक्य झाले होते. (संदर्भ जयसिंगराव पवार संपादित क्रांतिसिंह ग्रंथ.) स्वातंत्र्यानंतरही गोवा मुक्ती, मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र, मराठवाडा मुक्ती, दुष्काळविरोधी लढा,एक गाव एक पाणवठा,जाती व्यवस्थाविरोधी संघर्ष, शेतीमालाचा रास्त भाव, मराठी भाषा अशा अनेक लढ्यात क्रांतीसिंह नाना पाटील अग्रभागी राहिले.
या अखंड सत्यशोधक क्रांतिसिंह कॉ.नाना पाटील यांच्यावर मराठी मध्ये एक चित्रपट येत आहे. स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासातील धगधगते क्रांती पर्व आता पडद्यावर येत आहे! पत्री सरकार १९४२ या चित्रपटाचे निर्माते विशाल गोविंदराव जाधव हे असून गीत, संगीत,लेखन आणि दिग्दर्शन मनीष अनसुरकर यांचे आहे. अशी माहिती क्रांतिसिंह नाना पाटील यांचे नातू व सांगली जिल्ह्यातील शेतकरी नेते भाई सुभाष बापू पाटील यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली. यावेळी प्रतिसरकार चळवळीचे अभ्यासक संपत मोरे,विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या अध्यक्ष प्रा.प्रतिमा परदेशी, सत्यशोधक शेतकरी सभेचे राज्य सचिव किशोर ढमाले, इंद्रजीत पाटील हे उपस्थित होते.
पत्री सरकार १९४२ चित्रपटाचा प्रीमियर शो , गुरुवार दि.१९नोव्हेम्बर रोजी सायंकाळी ६ वा.कोथरूड, सिटी प्राईड थिएटर, पुणे येथे आयोजित करण्यात आलेला होता. आणि २० नोव्हेंबरला आज महाराष्ट्रातील सर्व चित्रपटगृहात हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.तरी आपण आपल्या परिवारासह, मित्र मैत्रिणीसह, नातेवाईक, आप्तेष्ट या सर्वासर्वांना घेऊन अगत्याने हा चित्रपट पहावा. असे आवाहन भाई सुभाष बापू पाटील व सहकाऱ्यांनी यावेळी केले.
भागीरथी मोशन पिक्चर्स चा पत्री सरकार १९४२ हा चित्रपट २० नोव्हेम्बर पासून चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे, बुक माय शो वर तिकिटे उपलब्ध असतील. तरी महाराष्ट्राचा तेजस्वी इतिहास पाहण्यासाठी आपण जरूर यावे. असे आवाहन भाई सुभाष पाटील (क्रांतिसिंहांचे नातू व शेतकरी नेते), प्रा. प्रतिमा परदेशी (अध्यक्ष विद्रोही सांस्कृतिक चळवळ), संपत मोरे (प्रतिसरकारचे अभ्यासक), किशोर ढमाले (सत्यशोधक शेतकरी सभा राज्यसचिव)
इंद्रजीत पाटील (क्रांतिसिंहांचे पणतू),
दमयंती पाटील , प्राची दुधाने (सामाजिक कार्यकर्त्या)यांनी केले आहे.
