You are currently viewing २९ फिल्ड एम्युनिशन डेपोमध्ये जवानांसमवेत दिवाळी स्नेहमिलन उत्साहात संपन्न

२९ फिल्ड एम्युनिशन डेपोमध्ये जवानांसमवेत दिवाळी स्नेहमिलन उत्साहात संपन्न

२९ फिल्ड एम्युनिशन डेपोमध्ये जवानांसमवेत दिवाळी स्नेहमिलन उत्साहात संपन्न*

निगडी

देहूरोड येथील २९ फिल्ड एम्युनिशन डेपोमध्ये भारतीय सैन्यदलातील अधिकारी व जवानांसमवेत दिवाळीनिमित्त स्नेहमिलन व फराळ कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. यावेळी नागरिक आणि जवानांनी एकत्र येत दिवाळीचा आनंद साजरा केला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी भास्कर रिकामे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. रमेश बन्सल यांनी प्रास्ताविक करताना या उपक्रमामागील भावना विशद केली. ते म्हणाले, “आपल्या जिवलग कुटुंबीयांपासून दूर राहून मातृभूमीच्या रक्षणासाठी अहोरात्र तत्पर असणाऱ्या भारतीय सैन्यदलातील शूर जवानांसमवेत दिवाळी साजरी करताना आम्हा नागरिकांचा ऊर अभिमानाने भरून येतो. ऊन, वारा, थंडी आणि पावसाची तमा न बाळगता लाखो सैनिक व अधिकारी देशाच्या सीमांचे रक्षण करतात. तसेच आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या मदतीसाठीही धावून येतात. त्यांच्या या अमूल्य योगदानाची परतफेड करणे कदापि शक्य नाही. त्यांच्या ऋणांची जाणीव ठेवून कृतज्ञतेची भावना व्यक्त करण्यासाठी दरवर्षी हा छोटेखानी स्नेहमिलन उपक्रम आयोजित केला जातो.”
लायन्स क्लब ऑफ आकुर्डी-अग्रसेनचे अध्यक्ष श्री. पवन अगरवाल यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, “देशाच्या रक्षणासाठी सदैव तत्पर असणाऱ्या जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची माझी अनेक वर्षांपासून इच्छा होती. आज दिवाळीनिमित्त आयोजित या स्नेहमिलन कार्यक्रमात सहभागी होताना मला आणि माझ्या सहकारी सभासदांना अतिशय आनंद होत आहे. प्रत्यक्ष देशसेवेत कार्यरत असलेल्या सैनिकांसोबत दिवाळी साजरी करण्याचा हा अनुभव आयुष्यभर प्रेरणा देणारा ठरेल.”
यावेळी सुभेदार मेजर सदाशिव यांनी आपल्या मनोगतात एम्युनेशन डेपो तसेच चिंचोली परिसरात विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून वृक्षारोपण, जलसंधारण आणि आरोग्य शिबिरांसारखे उपक्रम राबविले जात असल्याबद्दल समाधान व्यक्त केले.
या प्रसंगी प्रशासन अधिकारी सुभेदार मेजर दिनेश व्यंकट, लायन्स क्लबचे कोषाध्यक्ष गजानंद अगरवाल, निसर्ग मित्र श्रीकांत मापारी, सेवाभारतीचे पदाधिकारी लक्ष्मीकांत देशपांडे तसेच मोठ्या संख्येने सैन्याधिकारी व जवान उपस्थित होते.
यावर्षी पाणीटंचाईची परिस्थिती लक्षात घेऊन डेपोमधील बोअरवेलवर लायन्स क्लब ऑफ आकुर्डी-अग्रसेनच्या वतीने इलेक्ट्रिक पंप बसवून देण्यात येईल, अशी घोषणा अध्यक्ष पवन अगरवाल यांनी केली. तसेच उपस्थित जवानांना लायन्स क्लबच्या वतीने मिठाईचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी लेफ्टनंट कर्नल अपेक्षा उत्पल व त्यांच्या सहकाऱ्यांचे विशेष सहकार्य लाभले. लायन्स क्लबच्या सचिव आकांक्षा गुप्ता यांनी उपस्थितांचे आभार मानले.

भास्कर रिकामे, ९०२८५४६४१५

प्रतिक्रिया व्यक्त करा