विशाल परब यांच्या पुढाकारातून सावंतवाडीत भव्य नरकासुर स्पर्धेला हजारोंची गर्दी!
विनोद राऊळ, ॲड. अनिल निरवडेकर, विशाल परब यांच्या उपस्थितीने रंगत वाढली; सावंतवाडीत भव्य महोत्सव आयोजित करण्याची विशाल परब यांची घोषणा
सावंतवाडी
दिवाळीच्या उत्साहाला नरकासुर स्पर्धेची रंगतदार जोड मिळाल्याने सावंतवाडी शहरात मध्यरात्री उत्साहाला उधाण आले. भाजप युवा मोर्चाच्या वतीने आयोजित भव्य नरकासुर स्पर्धेला हजारो नागरिकांनी गर्दी करत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विविध मंडळांनी साकारलेल्या अक्राळ-विक्राळ आणि आकर्षक नरकासुरांच्या प्रतिमांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. तलावाकाठी रंगलेल्या या सोहळ्यात भाजपचे ज्येष्ठ नेते विनोद राऊळ, उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर आणि युवा नेते विशाल परब यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाची रंगत आणखी वाढली.
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली युवा नेते विशाल परब यांच्या पुढाकारातून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचे उद्घाटन ज्येष्ठ भाजप नेते विनोद राऊळ यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्पर्धेत सहभागी झालेल्या विविध मंडळांच्या नरकासुर प्रतिमा भव्य आकारमान, आकर्षक सजावट आणि कल्पकतेमुळे चर्चेचा विषय ठरल्या. मध्यरात्रीपर्यंत तलाव परिसरात नागरिकांची मोठी गर्दी कायम होती. या सोहळ्यामुळे सावंतवाडीच्या दिवाळी उत्सवात विशेष रंग भरला.
यावेळी उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांनी सावंतवाडीचा पर्यटन महोत्सव याच ठिकाणी पुन्हा एकदा नव्या जोमाने सुरू करण्यात येणार असल्याचा पुनरुच्चार केला. उपसभापती गौरव मुळीक यांनीही मनोगत व्यक्त करून उपस्थितांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
युवा नेते विशाल परब यांनी सावंतवाडीकरांच्या सेवेसाठी भाजप सदैव कटिबद्ध असल्याचे सांगितले. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आशीर्वाद, पालकमंत्री नितेश राणे यांचे मार्गदर्शन, तसेच ज्येष्ठ नेते विनोद राऊळ आणि उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांची साथ यामुळे शहरात यापुढेही भव्य सामाजिक, सांस्कृतिक आणि लोकाभिमुख उपक्रम राबविण्यात येतील, असे त्यांनी स्पष्ट केले. आगामी काळात भाजपच्या वतीने सावंतवाडीत भव्य-दिव्य ‘सावंतवाडी महोत्सव’ आयोजित करण्याची घोषणाही त्यांनी केली.
दरम्यान, आज सायंकाळी सावंतवाडी तलावाकाठी भव्य फटाक्यांची आतषबाजी करण्यात येणार असल्याची माहिती विशाल परब यांनी दिली. त्यामुळे दिवाळी उत्सवाची रंगत आणखी वाढणार आहे.
यावेळी शहराध्यक्ष सुधीर आडीवरेकर, युवा मोर्चा अध्यक्ष हितेन नाईक, मोहिनी मडगावकर, दिपाली भालेकर, दिलीप भालेकर, ॲड. सिद्धार्थ भांबुरे, जितेंद्र गांवकर, सुकन्या टोपले, सुनीता पेडणेकर, विनेश तावडे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्पर्धेचे परीक्षण राजेश आजगावकर आणि उदय राऊत यांनी केले. सूत्रसंचालन बादल चौधरी यांनी केले, तर आभार ॲड. सिद्धार्थ भांबुरे यांनी मानले.
