*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री शोभा वागळे लिखित पुस्तक परीक्षण*
*समाज परिवर्तनासाठी हे ‘जागरण’ महत्वाचे!*
*जागरण*
✒️भारत सातपुते….
स्वतःच्या तत्त्वनिष्ठेवर ठाम राहून, अविरत संघर्षांचा सामना करून आणि प्रामाणिकपणा जपून जीवन जगणे म्हणजेच खऱ्या अर्थाने ‘जागृत’ आयुष्य जगणे. आज मराठी साहित्य क्षेत्रात अतिशय उच्च प्रतिचा आणि वाचकांमध्ये बहुचर्चित असलेला ग्रंथ, म्हणजेच भारत सातपुते यांचे आत्मचरित्र ‘जागरण’ होय.
मी बऱ्याच मान्यवरांची आत्मचरित्रे वाचलीत, पण सातपुते सरांचे ‘जागरण’ हे नुसते आत्मकथन नसून अतिशय हालाखीच्या परिस्थितीवर मात करत, स्वतःची तत्वे सांभाळून, जीवन जगणाऱ्या एका सामान्य माणसाच्या संघर्षाचे एक जिवंत ज्वलंत उदाहरण आहे.
चित्रकार सरदार जाधव ह्यांनी रेखाटलेले जागरणचे मुखपृष्ठ खूपच बोलके आहे. संबळ आणि तुणतुणं खांद्याला लावून केलेल्या संघर्षाचा वास्तव दर्शविणारे, अतिशय प्रभावी रेखाटन आहे. महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीत, ग्रामीण भागात, गोंधळाच्या वेळी वाजवण्याचे एक वाद्य, जे क्रांती व ऊर्जा व्यक्त करते तेच भारत सातपुते यांचा अन्यायाविरुद्धचा लढा व त्यांच्या विद्रोही विचारांचे प्रतीक आहे.
सातपुते सरांनी आपल्या मनोगतातून सांगितले आहे की त्यांचा स्वभाव खरे बोलणारा असल्याने व नोकरी करत असताना दररोज रात्री रोजनिशी लिहायची सवय असल्याने हे ”जागरण’ आत्मकथन स्वरूपात लिहायला ते प्रेरीत झाले.
लेखकाच्या बालपणी घरची अतिशय हालाखीची परिस्थिती असल्याने मूलभूत गरजाही नीट पूर्ण करता येत नव्हत्या. पण एवढ्या वाईट परिस्थितीत सुध्दा त्यांच्या आई बाबांनी मुलांवर संस्काराचे बीज मात्र सुंदर पेरले होते.
नेहमी अनवाणी चालत असल्यामुळे एकदा लेखकाला चप्पलेचा मोह झाला. रात्री एका लग्न समारंभात देवळाच्या बाहेर असलेल्यापैकी एक चप्पल घालून ते घरी आले. हे वडिलांना जेव्हा कळले तेव्हा ते मुलाला ओरडले, “चोरलेली चप्पल! चल जा. जिथून आणली तिथे ठेऊन ये. इज्जतीला बट्टा लावून घेऊ नकोस” वडिलांच्या सक्त आदेशाचे पालन करून पुन्हा त्या वाटेला न जाणारे सातपुते संस्काराचे पाईक बनले.
आई वडिलांचे बेताचेच शिक्षण असल्याने आपल्या मुलांनी तरी चांगले शिकावे म्हणून ते प्रयत्न करत होते. सातपुते आणि त्यांच्या भावंडांनी सुद्धा आई वडिलांची इच्छा पूर्ण केली.
लेखकाचे बालमन परिस्थिती जाणत होते. त्या परिस्थितीमुळेच त्यांच्यावर बरेच संस्कार झाले. चोरी करू नये, खोटे बोलू नये, अंगी प्रामाणिकपणा बाळगावा, सत्य बोलावे, अन्यायाविरुद्ध लढावे, चुकीला माफ करू नये, दिलेला शब्द पाळावा, असे संस्कार सातपुतेंवर झाले. परिस्थितीनेच त्यांना ‘जागरण’ कादंबरीचा नायक बनवला.
जागरण हे आत्मचरित्र समाजातील सर्व व्यवस्थेवर भाष्य करणारे आहे. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून जवळ जवळ ऐंशी वर्षे झाली तरी आपले सुराज्य झालेले नाही. देशाची प्रगती होत आहे, आनंद आहे. सध्याची देशाची स्थिती पाहताना मला वाटते सर्व स्थरातील लोकांनी भारत सातपुते ह्यांचे ‘जागरण’ वाचून, अनुबोधन घेऊन, प्रत्येकाने आपल्या कामात निष्ठा, प्रामाणिकपणा, जिद्द ,चिकाटी, तत्परता आणि नि:स्वार्थपण व सदैव चांगले कार्य करण्याची वृत्ती नि कृती बाळगली तर, स्वराज्याचे सुराज्य व्हायला वेळ लागणार नाही!
आज देशाला लागलेली कीड म्हणजे भ्रष्टाचार, फसवा फसवी, चोरी-मारी सगळे करणाऱ्यास, शिक्षा कमीच उलट अशा अन्यायाला कठोर शिक्षा न करता माफ केले जाते.हे सामान्य माणसाला पटण्यासारखे नाही.
हे सगळे नाहीसे करणे एकट्या सातपुतेंना शक्य नाही. मंगल पांडेनी जशी क्रांतीची सुरूवात केली होती तशीच सातपुतेंनी एका क्रांतीची सुरूवात केली आहे. त्यांनी समाज प्रबोधनाचे कार्य केले आहे. आपण वाचकांनी ‘जागरण’ नुसतेच वाचून चालणार नाही तर ध्येय पूर्तीसाठी, आप आपल्या कार्यक्षेत्रात सातपुतेंच्या संदेशानुसार वागायला हवे. मग सातपूतेंची मांदियाळी तयार व्हायला वेळ लागणार नाही आणि सुराज्य नक्कीच निर्माण होईल असे मला वाटते.
थोडक्यात सांगायचे तर ‘जागरण’ हे पुस्तक वाचकाला स्वतःच्या जीवनाचा विचार करायला लावणारे, खडतर परिस्थितीतही माणुसकी आणि इमान जपण्याची शिकवण देणारे, एक अत्यंत हृदयस्पर्शी साहित्य आहे.
स्वतःच्या तत्वांवर ठाम राहून समाजासाठी अविरत काम करत जीवन जगणारे सातपुते आणि त्यांचे ‘जागरण’ हे समाज परिवर्तनासाठी अत्यंत उपयुक्त असे पुस्तक आहे.
सहसा आत्मचरित्र लिहिणारा आपल्या जीवनातील वेगवेगळ्या टप्प्यावरच्या घडामोडी, अनुभव, सुख-दु:खांच्या आठवणी, काही कारणास्तव जीवनात आलेली कलाटणी, तेव्हा मी असा होतो-आता असा झालो, आत्म-स्तुती, कौतुक, उपकारक वृत्ती इत्यादी आपल्या आत्मचरित्रात लिहितात. काही लेखक स्वतःच्या हातून घडलेल्या चुका सांगतात, पण हातचे राखूनच. म्हणजे स्वतःची प्रतिमा राखूनच आत्मचरित्रे लिहिलेली असतात. ‘जागरण’ ह्या बाबतीत अपवाद आहे. संपूर्ण जागरण मध्ये बडेजाव नावाला सुद्धा नाही.
माझा एक अनुभव सांगते की,
“वर्षभरात मी फक्त तीनच रजा घेतल्यात. तुम्हाला जमेल का माझ्यासारखे करायला?” असे जोमात सागणारे मुख्याध्यापक महाशयाचा अनुभव मी अनुभवला आहे.
जागरण मधल्या मुख्याध्यापक सातपुतेची साडेतीनशे दिवस रजा शिल्लक असताना साडेतीन दिवस सुद्धा त्यांनी रजा घेतली नव्हती. सातपुते सरांची आत्मस्तुती कुठेच आढळत नाही. एक आदर्श शिक्षक कसा असावा याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे सातपुते सर आहेत.
अनेक अडचणींवर मात करून त्यांनी डी. एड. पूर्ण केले आणि शिक्षकी पेशात आल्यावर त्यांना असंख्य प्रकारच्या संघर्षांचा सामना करावा लागला, पण ते डगमगले नाहीत. आपल्या कामात कर्तव्यनिष्ठ व प्रामाणिक राहून एक शिस्तप्रिय, तरीही कोमल हळव्या मनाचे ते शिक्षक बनले. शिक्षकांनी मुलांच्या बाबतीत शिस्तप्रिय असणे सहाजिकच आहे, पण सातपुतेना त्यांच्या शाळेचे सहकारी, मुख्याध्यापक, गट विकास अधिकारी, सी.ई.ओ. ह्या सर्वांना शिस्तीत आणण्यासाठी झटावे लागले. त्यामुळे त्यांच्या वेगवेगळ्या ठिकाणी बदल्या झाल्या व त्यांना तक्रारींचा खूप सामना करावा लागला.
शाळेचा निधी शाळेकरीताच उपयोगात आणावा ह्या वर ते ठाम राहिले. त्यांच्या सहकाऱ्यांना ते न पटल्याने जिव्हारी लागायचे. शाळेच्या मुलांचे जेवण, खिचडी, लायब्ररी इत्यादींमधला सावळा गोंधळ त्यांनी संपवला.
शिक्षकांनी वेळेवर शाळेत येणे, मुलांसारख्याच शिक्षकांच्याही परिक्षा असणे, वह्या तपासणीतला हलगर्जीपणा, ह्या अशा गोष्टीत सातपुतेंनी स्वतः लक्ष घालून शिक्षकांना सुधारण्याची संधी दिली. परीक्षेत मुलांनी कॉपी करून पास होणे कुणाच्या उपयोगाचे! जिथे शिक्षकच कॉपीला प्रोत्साहन देतात तिथे मुलांचे भविष्य कसे उज्ज्वल होणार! अशा विचारांना ठाम विरोध करणारे आदर्श शिक्षक सातपुते.
स्वतःचे पैसे खर्चून विद्यार्थ्यांच्या अडचणी दूर करणारे व मुलांच्या भवितव्यासाठी स्वतःच्या संसाराकडे दुर्लक्ष करणारे शिक्षक म्हणजे सातपुते.
सातपुतेंबद्दल अन् जागरणवर लिहावे तितके कमीच वाटते. एक मात्र सांगू इच्छिते, माझ्या पाहण्यात किंवा वाचण्यात सातपुतेंसारखे आदर्श व्यक्तिमत्व आलेले नाही. सेवानिवृत्त झाल्यावरही शाळाबाह्य मुलांसाठी आणि समाजातील वंचित घटकांसाठी काम करण्याचे व्रत सातपुतेनी सुरू ठेवले आहे. स्वतः जागे राहून समाजाला जागे करण्याचे त्यांचे हे कार्य खऱ्या अर्थाने ‘जागरण’ ठरत आहे.
सर्वांनी आवर्जून जागरण वाचून, अनुबोध घेऊन आपल्या कर्तव्यावर ठाम राहून अविरत कार्य करावे, तेच जागरण!
–शोभा वागळे
पुणे.
8850466717
*************
(जागरण: पाचवी आवृत्ती/लेखक: श्री भारत सातपुते /प्रकाशन: मांजरा प्रकाशन, लातूर/किंमत: ₹ २५०)
