कणकवलीत २४ ते २८ डिसेंबरदरम्यान रंगणार ४९ वी नाथ पै एकांकिका स्पर्धा!
शालेय व खुल्या गटात स्पर्धेचे आयोजन; खुल्या गटातील विजेत्याला ३० हजारांचे प्रथम पारितोषिक, प्रवेश नोंदणीची अंतिम मुदत २ डिसेंबर
कणकवली
वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान, कणकवली आयोजित प्रतिष्ठेची ४९ वी नाथ पै एकांकिका स्पर्धा २४ ते २८ डिसेंबर २०२६ या कालावधीत कणकवली येथे रंगणार आहे. महाराष्ट्रातील हौशी रंगभूमीला व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या या स्पर्धेत राज्यभरातील शालेय, महाविद्यालयीन तसेच विविध नाट्यसंघांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.
यंदाही स्पर्धेचे आयोजन शालेय आणि खुल्या अशा दोन गटांत करण्यात आले आहे. २४ व २५ डिसेंबर रोजी शालेय गटातील, तर २६, २७ आणि २८ डिसेंबर रोजी खुल्या गटातील एकांकिका सादर होणार आहेत.
शालेय गटाला १० हजार, तर खुल्या गटाला ३० हजारांचे पारितोषिक
स्पर्धेतील पारितोषिके आकर्षक असून शालेय गटात प्रथम क्रमांकासाठी १० हजार रुपये, द्वितीय क्रमांकासाठी ७ हजार ५०० रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी ५ हजार रुपये रोख पारितोषिक व स्मृतिचिन्ह देण्यात येणार आहे.
खुल्या गटात प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या संघाला ३० हजार रुपये, द्वितीय क्रमांकासाठी १५ हजार रुपये, तर तृतीय क्रमांकासाठी १० हजार रुपये रोख पारितोषिक व स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात येणार आहे. याशिवाय दिग्दर्शन, तांत्रिक आणि अभिनय विभागांतही स्वतंत्र रोख पारितोषिके व स्मृतिचिन्हे देण्यात येणार आहेत
२ डिसेंबरपर्यंत प्रवेश नोंदणीची अंतिम मुदत
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी शालेय गटाकरिता एक हजार रुपये, तर खुल्या गटाकरिता दोन हजार रुपये प्रवेश शुल्क निश्चित करण्यात आले आहे. प्रवेश अर्ज व शुल्क भरण्याची अंतिम तारीख २ डिसेंबर २०२६ आहे. इच्छुक नाट्यसंघांनी प्रतिष्ठानच्या गुगल फॉर्मद्वारे प्रवेश नोंदणी पूर्ण करावी.
नाथ पै एकांकिका स्पर्धा ही महाराष्ट्रातील हौशी रंगभूमीला अनेक वर्षांपासून प्रोत्साहन देणारी आणि नवोदित कलाकारांना आपली कला सादर करण्याची संधी उपलब्ध करून देणारी महत्त्वपूर्ण सांस्कृतिक परंपरा आहे. सुवर्णमहोत्सवी वर्षाकडे वाटचाल करणाऱ्या या स्पर्धेचे यंदाचे वर्ष विशेष उत्साहात साजरे करण्याचा प्रतिष्ठानचा मानस आहे.
अधिक माहिती व प्रवेश नोंदणीसाठी प्रतिष्ठानचे कार्यवाह शरद सावंत यांच्याशी ९४२२५८४०५४ किंवा ८८३०१८०८८५ या मोबाईल क्रमांकांवर संपर्क साधावा.
