मदत नव्हे, सामाजिक कर्तव्य समजून कातकरी बांधवांची दिवाळी केली गोड!
मानवी हक्क संरक्षण आणि जागृती संस्थेचा स्तुत्य उपक्रम; ६५ कातकरी कुटुंबांसह शहरातील गरजू महिलांना साडी, जीवनावश्यक वस्तूंचे किट आणि फराळाचे वाटप
मावळ :
आपण आपली दिवाळी कुटुंबासमवेत आनंदात साजरी करत असताना समाजातील वंचित आणि गरजू घटकांनाही सणाचा आनंद घेता यावा, या सामाजिक भावनेतून मानवी हक्क संरक्षण आणि जागृती संस्थेच्या वतीने कातकरी व आदिवासी समाजातील गोरगरीब कुटुंबांची दिवाळी गोड करण्यात आली.
मावळमधील राऊतवाडी येथील कातकरी वस्ती आणि शिवलीतील खडकवाडी कातकरी वस्ती येथे राहणाऱ्या ६५ कातकरी कुटुंबांना तसेच शहरातील पालांमध्ये राहणाऱ्या गरजू महिलांना प्रत्येकी दोन नवीन साड्या, १५ वस्तूंचे किट आणि दिवाळीचा फराळ देण्यात आला.
यावेळी संस्थेचे शहराध्यक्ष अण्णा जोगदंड म्हणाले की, अनेक अदृश्य दानशूर व्यक्तींनी संस्थेला ५५० नवीन साड्या उपलब्ध करून दिल्या. पोटाची खळगी भरण्यासाठी गावोगावी फिरून उदरनिर्वाह करणाऱ्या अशिक्षित आणि गोरगरीब कुटुंबांपर्यंत दिवाळीचा आनंद पोहोचवता आला, याचे समाधान आहे. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून आमचीच दिवाळी साजरी झाल्याची भावना निर्माण झाली. समाजाचे आपल्यावर काहीतरी ऋण आहे आणि ते फेडले पाहिजे, या भावनेतून संस्थेच्या वतीने गेल्या १४ वर्षांपासून हा सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहे.
महिला शहराध्यक्षा मीनाताई करंजावणे यांनी सांगितले की, संस्थेने यापूर्वी देशावर आणि राज्यावर आलेल्या विविध अस्मानी संकटांच्या वेळी मदतीचा हात पुढे केला आहे. यापुढे मराठवाड्यातील दुष्काळग्रस्तांनाही मदत करण्यात येणार आहे.
स्थानिक सामाजिक कार्यकर्ते शंकर लगड आणि संतोष जाधव यांनी गरजू कातकरी कुटुंबांची त्यांच्या घरी जाऊन माहिती संकलित केली. दुर्गम वस्त्यांपर्यंत पोहोचून लाभार्थ्यांची माहिती उपलब्ध करून देण्याचे महत्त्वपूर्ण काम त्यांनी केल्याचे संस्थेचे कार्याध्यक्ष मुरलीधर दळवी यांनी सांगितले.
या उपक्रमावेळी शहराध्यक्ष अण्णा जोगदंड, महिला शहराध्यक्षा मीना करंजावणे, पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा संगीता जोगदंड, सचिन युवा मंचचे अध्यक्ष ॲड. सचिन काळे, संस्थेचे खेड अध्यक्ष शंकर नाणेकर, कार्याध्यक्ष मुरलीधर दळवी, वैशाली आवताडे, सामाजिक कार्यकर्ते शंकर लगड, संतोष जाधव, श्रेयश जोगदंड, ऋतिक घोडके, खडकवाडीचे प्रगतशील शेतकरी अंकुश वाघमारे, गुणवंत कामगार काळूराम लांडगे, सतीश हंचाटे, अनंत जांभुळकर तसेच रमाई प्रतिष्ठानचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
