पिंगुळी पाझर तलाव अतिक्रमणप्रकरणी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे मौन का?
पालकमंत्री नितेश राणे आणि आमदार नीलेश राणे यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी; मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांची मागणी
कुडाळ :
सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुष्काळजन्य परिस्थिती असताना ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ उपक्रमाचा गाजावाजा करणाऱ्या जिल्हा प्रशासनाकडून पिंगुळी पाझर तलावाच्या अतिक्रमणप्रश्नी मात्र दुर्लक्ष का केले जात आहे? असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी उपस्थित केला आहे. या प्रकरणी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी मौन सोडावे, तर पालकमंत्री नितेश राणे आणि कुडाळ-मालवणचे आमदार नीलेश राणे यांनी आपली भूमिका प्रामाणिकपणे जाहीर करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
महाराष्ट्र राज्यात दुष्काळी परिस्थिती जाहीर करण्यात आली असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आठही तालुके दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आले आहेत. अशा परिस्थितीत निसर्गाचा अमूल्य ठेवा असलेल्या पिंगुळी पाझर तलावावर परप्रांतीय विकासकाकडून अतिक्रमण होत असल्याचा आरोप किनळेकर यांनी केला आहे. स्थानिक ग्रामस्थांनी वारंवार आवाज उठवूनही जिल्हाधिकारी, तहसीलदार आणि लघुपाटबंधारे विभागाकडून ठोस कारवाई होत नसल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
तलावाच्या अतिक्रमणाबाबत तक्रार केल्यानंतर लघुपाटबंधारे विभागाने वर्षभर केवळ पत्रव्यवहार केल्याचे सांगितले जात आहे. संबंधित तलावातून अनधिकृत बांधकामासाठी मोठ्या प्रमाणात विनापरवाना पाणी उपसा केल्याचे अधिकाऱ्यांच्या प्रत्यक्ष पाहणीदरम्यान निदर्शनास आले होते. तरीही संबंधित विकासकावर अद्याप नियमानुसार फौजदारी कारवाई का करण्यात आली नाही, असा सवालही किनळेकर यांनी उपस्थित केला आहे.
जिल्ह्यात पाच हजार वनराई बंधारे उभारल्याचे जाहीर करून सत्ताधारी लोकप्रतिनिधी स्वतःची पाठ थोपटून घेत आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाकडूनही वनराई बंधाऱ्यांच्या कामाचा मोठा गाजावाजा केला जात आहे. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून पिंगुळी पाझर तलाव वाचवण्यासाठी संघर्ष करणाऱ्या स्थानिक नागरिकांच्या प्रश्नाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप त्यांनी केला.
पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्ह्यातील आठही तालुके दुष्काळग्रस्त घोषित झाल्याचे श्रेय घेण्यापेक्षा जिल्ह्यात नैसर्गिकरीत्या उपलब्ध असलेल्या जलस्रोतांचे संवर्धन करण्यासाठी पुढाकार घ्यावा. पिंगुळी पाझर तलावाच्या अतिक्रमणप्रश्नी कोणताही स्वार्थ न ठेवता स्थानिक जनतेच्या पाठीशी उभे राहावे, असे आवाहन मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी केले आहे.
