You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयाला बॉम्बस्फोटाची धमकी; पोलिसांकडून कसून तपासणी
Oplus_16908288

सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयाला बॉम्बस्फोटाची धमकी; पोलिसांकडून कसून तपासणी

न्यायालयासह जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाची इमारत रिकामी करून तपासणी

संशयास्पद वस्तू न आढळल्याने सर्वांनी सोडला सुटकेचा निःश्वास

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयात आयईडी बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी देणारा ई-मेल प्राप्त झाल्याने सोमवारी (ता. २) न्यायालय परिसरात एकच खळबळ उडाली. या धमकीची गंभीर दखल घेत पोलिसांनी तातडीने संपूर्ण न्यायालय परिसर रिकामा करून तपासणी मोहीम हाती घेतली. खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा न्यायालयासह जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाची इमारतही रिकामी करण्यात आली. बॉम्ब शोधक व नाशक पथक आणि श्वान पथकाच्या मदतीने संपूर्ण परिसराची कसून तपासणी करण्यात आली. मात्र, या तपासणीत कोणतीही संशयास्पद वस्तू अथवा स्फोटक आढळून आले नाही.

धमकीचा ई-मेल प्राप्त होताच पोलीस यंत्रणा सतर्क झाली. अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांनी पोलीस पथकासह जिल्हा न्यायालय परिसरात धाव घेत परिस्थितीची पाहणी केली. खबरदारीचा उपाय म्हणून न्यायालयातील न्यायाधीश, वकील, अधिकारी, कर्मचारी आणि पक्षकारांना इमारतीबाहेर काढण्यात आले. तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाची इमारतही रिकामी करण्यात आली. संपूर्ण परिसरातील प्रवेश रोखून पोलिसांनी तपासणी मोहीम सुरू केली.

बॉम्ब शोधक व नाशक पथक आणि श्वान पथकाने न्यायालयाच्या मोकळ्या आवारासह इमारतीचा तळमजला, पहिला मजला, स्वच्छतागृहे आणि इतर भागांची बारकाईने तपासणी केली. यावेळी कोणतीही संशयास्पद वस्तू अथवा स्फोटक आढळून आले नाही. पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना तपासणीचा अहवाल दिल्यानंतर न्यायालय परिसरातील तणाव काहीसा निवळला.

धमकीच्या ई-मेलमध्ये जिल्हा न्यायालयासह मेट्रो स्थानकांवर रात्री ९ वाजल्यापासून ११ मिनिटांच्या कालावधीत बॉम्बस्फोट घडविण्याचा उल्लेख करण्यात आला होता. तसेच १९८४ मधील रक्तपाताचा बदला रक्ताने घेण्याचा इशाराही देण्यात आला होता. एवढेच नव्हे, तर २७ नोव्हेंबर रोजी मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्स येथे होणाऱ्या गायक दिलजीत दोसांझ यांच्या कार्यक्रमातही बॉम्बस्फोट घडविण्याची धमकी देण्यात आली आहे. यासाठी आयफोनमध्ये आयईडी ठेवण्यात येणार असल्याचा दावा ई-मेलमध्ये करण्यात आल्याचे समोर आले आहे.

या धमकीच्या पार्श्वभूमीवर न्यायालय परिसरात काही काळ चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, पोलिसांनी तातडीने केलेल्या तपासणीमुळे उपस्थितांनी सुटकेचा निःश्वास सोडला. तपासणी पूर्ण झाल्यानंतर न्यायाधीश, वकील, अधिकारी, कर्मचारी आणि पक्षकारांना पुन्हा न्यायालयात प्रवेश देण्यात आला. त्यानंतर न्यायालयाचे दैनंदिन कामकाज पूर्ववत सुरू झाले.

धमकीच्या ई-मेलची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांनी तातडीने न्यायालय परिसरात धाव घेतली. त्यांच्या उपस्थितीत पोलीस यंत्रणेने संपूर्ण परिसर रिकामा करून सुरक्षिततेच्या दृष्टीने तपासणी केली. बॉम्ब शोधक व नाशक पथकाने इमारतीच्या कानाकोपऱ्याची तपासणी केली. कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून न आल्याने न्यायालय परिसरातील तणाव कमी झाला.

प्रतिक्रिया व्यक्त करा