विटे / प्रदीप जोशी, ज्येष्ठ पत्रकार :
सांगली जिल्ह्यात साखर कारखानदार, शेतकरी आणि संघटना यांच्यात समन्वय घडवून मं आणता संघर्ष करणाऱ्या कार्यकर्त्यांना खलनायक ठरवले जात असल्याची टीका शेतकरी कामगार पक्षाचे नेते सुभाष पाटील यांनी केली आहे.
त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, की सांगली जिल्हाधिकारी आणि पालकमंत्री यांनी जिल्ह्यातील ऊस पिकविणाऱ्या शेतकय्रांना वार्यावर सोडून दिल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
चालू वर्षीचा साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू होऊन महिना होत आला आहे. हंगाम सुरू होण्याच्या अगोदर पासून शेतकरी आणि शेतकरी संघटना ऊसाला योग्य भाव मिळावा म्हणून तीव्र संघर्ष करत आहेत. हा संघर्ष ऊसाने भरलेले ट्रॅक्टर पेटवून देणे पर्यंत पोहोचला आहे. तरीही कारखानदार ऊसदराच्या संदर्भात चकार शब्द काढायला तयार नाहीत. हा संघर्ष कमी व्हावा आणि प्रश्न सामंजस्याने सुटावा यासाठी शेजारच्या कोल्हापूर जिल्ह्यातील पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांनी कारखानदार, शेतकरी, आणि शेतकरी संघटना यांच्या संयुक्त बैठका दोन वेळा घेऊन प्रश्न न चिघळता सुटावा म्हणून प्रयत्न केले. प्रशासकिय पातळीवर हा प्रश्न लवकरात लवकर सुटावा म्हणून प्रयत्न चालू आहेत. या उलट सांगली जिल्ह्यातील प्रशासन या प्रश्नावर काहीच हालचाल करताना दिसत नाही. वास्तविक या जिल्ह्यातील आंदोलनातील तिव्रता वाढू नये. प्रश्न चर्चेतून सुटावा म्हणून जिल्हाधिकारी व पालकमंत्री यांनी पुढे येऊन , साखर कारखानदार व शेतकरी व संघटना यांच्या मधे चर्चा घडवून आणून जिल्ह्यातील तणाव कमी करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. परंतु प्रशासन साखर कारखानदार यांना संरक्षण देऊन कारखाने निर्विघ्नपणे चालू रहावैत या साठी प्रयत्न करीत आहेत. यामधे शेतकरी मात्र भरडला जात आहे. संघर्ष करणारे संघटना कार्यकर्ते हे खलनायक ठरवले जात आहेत. हे चित्र बरोबर नाही.
सांगली जिल्हाधिकारी यांनी या प्रश्नात गांभीर्याने लक्ष देऊन चर्चा लवकरच घडवून आणावी व हा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत अशी अपेक्षा ऊस उत्पादक शेतकरी करत आहेत.
