माणगाव येथे श्रमदानातून वनराई बंधारा; भूजल संवर्धनाचा संदेश
सिंधुदुर्ग :
भूजल संवर्धन, पाणीटंचाई निवारण आणि जलसंधारणाबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, सिंधुदुर्ग कार्यालयाच्या वतीने दिनांक 29 ऑक्टोबर 2026 रोजी कुडाळ तालुक्यातील माणगाव येथील ढोलकरवाडी परिसरातील ओढ्यावर श्रमदानातून वनराई बंधारा बांधण्यात आला. या उपक्रमात शासकीय अधिकारी, ग्रामपंचायत पदाधिकारी, कर्मचारी तसेच सेंट झेव्हियर्स महाविद्यालय, मुंबई येथील भूशास्त्र विभागाचे प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
या उपक्रमात भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे वरिष्ठ भूवैज्ञानिक राहुल खंदारे, सहाय्यक भूवैज्ञानिक शिवलिंग चव्हाण, कनिष्ठ भूवैज्ञानिक चेतन रुपवते व शहाजी माडभगत, तसेच यांत्रिकी विभागाचे शाखा अभियंता मजहर शेख आणि कार्यालयातील कर्मचारी यांनी श्रमदान केले. माणगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच मनीषा भोसले, ग्रामपंचायत अधिकारी चेतना म्हाडगूत, ग्रामपंचायत लिपिक विलास भोई व इतर कर्मचाऱ्यांनी बंधारा उभारणीच्या कामात मोलाचे सहकार्य केले.
सेंट झेव्हियर्स महाविद्यालय, मुंबई येथील भूशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. अश्विन पुंडलिक, डॉ. श्वेता पाटील आणि विद्यार्थ्यांनीही या उपक्रमात श्रमदान करून जलसंवर्धनाच्या कार्यात सहभाग घेतला. यावेळी वरिष्ठ भूवैज्ञानिक राहुल खंदारे यांनी विद्यार्थ्यांना दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी वनराई बंधाऱ्यांचे महत्त्व, पावसाचे पाणी अडविणे व भूजल पुनर्भरणासाठी अशा उपाययोजनांची उपयुक्तता याबाबत मार्गदर्शन केले. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याची भूशास्त्रीय रचना आणि भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध भूजल सर्वेक्षण, संवर्धन व विकासविषयक कामांची माहिती दिली.
त्यानंतर महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या ओरोस येथील जिल्हा पाणी गुणवत्ता तपासणी प्रयोगशाळेला भेट दिली. प्रयोगशाळेतील रसायनी पूजा दिवाडकर आणि अनुजैविक तज्ञ समाधान ताटे यांनी विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेचे महत्त्व, प्रयोगशाळेत पाण्याच्या नमुन्यांची करण्यात येणारी तपासणी तसेच पाण्यातील विविध रासायनिक व अनुजैविक घटकांचे परीक्षण करण्याच्या प्रक्रियेची माहिती दिली.
