*जागतिक साकव्य विकास मंच सदस्य तथा साहित्यरत्न लेखणीसम्राट विचारमंच महाराष्ट्रचे प्रशासक लेखक कवी प्रभाकर भामरे लिखित अप्रतिम लेख*
✍️सेवानिवृत्ती नव्हे, स्व-प्रवृत्ती – नवा वानप्रस्थ.
सेवा संपते, पण जीवन संपत नाही. खाकी वर्दी उतरते, टेबलावरील नेमप्लेट निघते, पण कपाळावरचे अनुभवाचे गंध अजूनही दरवळत असतात.
आजचे चित्र वेगळे आहे. आपण सेवानिवृत्त होतो, पण घरातून निवृत्त होत नाही. काळजीपोटी केलेली चौकशी – “कुठे चाललास? का उशीर? हे असं नको, तसं कर” – ही पुढच्या पिढीला लुडबूड वाटू लागते. त्यांची घाई, त्यांचे वेग, त्यांचे निर्णय – त्यात आपली चिंता त्यांना शृंखला वाटते. आणि मग नकळत दुरावा वाढतो.
म्हणूनच आमच्या ऋषींनी वानप्रस्थ सांगितला होता. वन म्हणजे जंगल नव्हे, वन म्हणजे अलिप्तता. देहाने घरात राहूनही, मनाने मोकळे होणे.
प्रभाकर भामरे उर्फ इंदुमाय यांची हीच आर्त विनंती आहे –
हे सेवानिवृत्त मान्यवरांनो, तुम्ही संपलेले नाहीत, तुम्ही शिंपलेले आहात. तुमच्याकडे जो अनुभवाचा मोती आहे, तो घराच्या चार भिंतीत कोंडू नका.
स्वेच्छानिवृत्त व्हा. मुलांना चुकू द्या, धडपडू द्या, त्यांनाही संसाराचा पोत कळू द्या. सल्ला मागितलाच तर ओंजळभर द्या, पण “आमच्या वेळी”ची पालुपद लावून त्यांच्या पंखांना टोचू नका.
तुमचा हा मोकळा वेळ हीच तुमची नवी शेती आहे. चला, एकत्र येऊया. ज्या समाजाने तुम्हाला घडवले, त्या समाजाचे देणे फेडूया. एखाद्या होरपळलेल्या पोराला मार्ग दाखवूया, एखाद्या अनाथाच्या पाठीवर हात ठेवूया, देशहिताच्या एखाद्या छोट्या कार्यात आपल्या अनुभवाची समिधा टाकूया.
सेवानिवृत्तीनंतरची खरी जबाबदारी आता सुरू होते. नोकरीने पोट भरले, आता या कार्याने आत्मा भरा.
हाच खरा वानप्रस्थ, हाच खरा आनंद, आणि हाच सेवानिवृत्तीचा सन्मान.
*- इंदुमाय*
९४२०३७३२६१
