सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचे सांडपाणी रस्त्यावर; व्यापारी, नागरिक हैराण!
ड्रेनेज टाक्यांच्या देखभालीकडे दुर्लक्ष; आयसीयूतील एसीचाही प्रश्न कायम, रूपा मुद्राळे यांचा इशारा
सावंतवाडी :
येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या ड्रेनेज टाक्या ओव्हरफ्लो झाल्याने गेल्या कित्येक दिवसांपासून सांडपाणी रस्त्यावरून वाहत आहे. त्यामुळे रहदारीच्या रस्त्यावर दुर्गंधी पसरली असून, परिसरातील व्यापारी, नागरिक आणि रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या गंभीर समस्येकडे संबंधित बांधकाम विभागाने तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या रूपा मुद्राळे यांनी केली आहे.
मागील वर्षीही ड्रेनेजच्या समस्येमुळे रुग्णालयातील संडास आणि बाथरूमच्या भांड्यांमधून सांडपाणी ओव्हरफ्लो झाले होते. त्यामुळे रुग्णांना शौचालयाचा वापर करताना प्रचंड त्रास सहन करावा लागला होता. या परिस्थितीची गंभीर दखल घेत रूपा मुद्राळे यांनी माणुसकीच्या दृष्टिकोनातून स्वखर्चाने ड्रेनेजच्या सर्व टाक्या साफ करून घेतल्या होत्या. त्यानंतर या टाक्यांची दुरुस्ती आणि नियमित साफसफाई करण्याची जबाबदारी बांधकाम विभागाची होती. मात्र, वारंवार तक्रारी करूनही या समस्येचे गांभीर्य संबंधित विभागाच्या लक्षात आले नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
शहरातील लोकप्रतिनिधींनी या गंभीर समस्येकडे लक्ष देऊन तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी मुद्राळे यांनी केली आहे. रुग्णांचे हाल होऊ नयेत म्हणून शासन आणि लोकप्रतिनिधींनी करावयाची कामे आम्हाला नाइलाजाने स्वखर्चाने करावी लागतात, हे दुर्दैवी आहे. सामाजिक बांधिलकीतून खर्च करण्यास आमची हरकत नाही; मात्र, हे काम वारंवार किती वेळा करायचे, यालाही काही मर्यादा आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.
आयसीयूतील एसीचा प्रश्न अद्याप कायम
उपजिल्हा रुग्णालयातील आयसीयूतील एसी गेल्या दोन महिन्यांपासून बंद असल्याने रुग्णांना त्रास सहन करावा लागत होता. याबाबत पंधरा दिवसांपूर्वी निवेदन देण्यात आले होते. उपोषणाचे निवेदन दिल्यानंतर चार दिवसांत आयसीयूतील एसी सुरू करण्यात आले. मात्र, खालच्या आयसीयूतील एसी अद्यापही सुरू झालेल्या नाहीत, असे रूपा मुद्राळे यांनी सांगितले.
ड्रेनेजच्या सांडपाण्याची समस्या आणि आयसीयूतील एसीचा प्रलंबित प्रश्न यांची संबंधित प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी. अन्यथा सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या माध्यमातून या समस्यांबाबत गंभीर भूमिका घेतली जाईल, असा इशारा रूपा मुद्राळे यांनी दिला आहे.
