पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रयत्नांना यश; सभापती अनुराधा नारकर यांच्या शुभहस्ते भूमिपूजन सोहळा संपन्न
देवगड / वेळगिवे : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मत्स्यव्यवसाय व बंदरमंत्री ना. नितेश राणे यांच्या प्रयत्नातून वाघीवरे-वेळगिवे गावांसाठी बीएसएनएल टॉवर उभारणीच्या कामाचा शुभारंभ वेळगिवे येथे करण्यात आला. महिला व बालकल्याण सभापती सौ. अनुराधा नारकर यांच्या शुभहस्ते या टॉवरचे भूमिपूजन करण्यात आले.
या भूमिपूजन सोहळ्याला पंचायत समिती सदस्या कु. समृद्धी संतोष चव्हाण, वेळगिवे गावचे सरपंच राजन लाड, उपसरपंच सहदेव लाड, ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष तसेच वाघीवरे आणि वेळगिवे या दोन्ही गावांतील मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी पंचायत समिती सदस्या कु. समृद्धी संतोष चव्हाण यांनी वाघीवरे-वेळगिवे गावांच्या विकासासाठी पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी सातत्याने सहकार्य केल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. आपल्या गावांच्या विकासासाठी साहेबांनी नेहमीच झुकते माप दिले असून, त्याबद्दल आपण सदैव ऋणी राहू, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
बीएसएनएल टॉवरच्या उभारणीमुळे वाघीवरे-वेळगिवे परिसरातील दूरसंचार सुविधांना चालना मिळण्याची अपेक्षा असून, या कामामुळे स्थानिक नागरिकांना अधिक चांगली संपर्क सुविधा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
