*मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठानच्या सन्मा. सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा गर्जे लिखित अप्रतिम काव्यरचना*
*थट्टा निसर्गाची….*
विकासाच्या नावाखाली
वृक्षतोड झाली अती
मुक्या साऱ्या आज वाटा
पक्षी कुठे आज गाती?
वृक्ष देती आम्हा छाया
प्राणवायू जगायला
खाण्यासाठी गोड फळे
वने राहण्या प्राण्याला
निसर्गाचा होतो ऱ्हास
कशासाठी असा विकास?
वृक्षवल्ली ही सोयरे
त्यांच्यासवे घेतो श्वास
रोपट्याचा होण्या वृक्ष
लागे हो वर्षानुवर्ष
तेही असती सजीव
तेही करती संघर्ष
पशुपाखरांची घरे
हेचि जंगल नि वने
होई कत्तल वृक्षांची
प्राणी होती दीनवाणे
अशी थट्टा निसर्गाची
आज ठरे जीवघेणी
अखेरच्या क्षणी सुध्दा
मिळायचे नाही पाणी
@अरुणा गर्जे
सांगली
