You are currently viewing प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा 24 वा हप्ता 30 ऑक्टोबर रोजी वितरित होणार

प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा 24 वा हप्ता 30 ऑक्टोबर रोजी वितरित होणार

राज्यातील 91.13 लाख शेतकरी कुटुंबांना सुमारे 1835 कोटी रुपयांचा लाभ

सिंधुदुर्ग : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम-किसान) योजनेचा ऑगस्ट ते नोव्हेंबर 2026 या कालावधीतील 24 वा हप्ता शुक्रवार दिनांक 30 ऑक्टोबर 2026 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुजरातमधील बनासकांठा येथून वितरित करण्यात येणार आहे. या निमित्ताने देशभरात 30 ऑक्टोबर रोजी ‘पीएम-किसान उत्सव दिवस’ साजरा करण्यात येणार आहे.

केंद्र शासनाने शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्नाचा आधार देण्यासाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना प्रतिवर्षी सहा हजार रुपये तीन समान हप्त्यांत, प्रत्येकी दोन हजार रुपये याप्रमाणे त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट जमा केले जातात. राज्यातील पात्र शेतकरी कुटुंबांना यापूर्वी 23 हप्त्यांद्वारे सुमारे 42 हजार 935 कोटी रुपयांचा लाभ वितरित करण्यात आला आहे.

योजनेचा लाभ मिळण्यासाठी लाभार्थ्यांनी भूमी अभिलेखातील नोंदी अद्ययावत करणे, बँक खाते आधारशी संलग्न करणे आणि ई-केवायसी प्रमाणीकरण पूर्ण करणे आवश्यक आहे. या तिन्ही बाबींची पूर्तता केलेल्या राज्यातील सुमारे 91.13 लाख शेतकरी कुटुंबांना 24 व्या हप्त्यापोटी अंदाजे 1 हजार 835 कोटी रुपयांचा लाभ 30 ऑक्टोबर रोजी थेट लाभ हस्तांतरणाद्वारे त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यांत जमा होणार आहे.

पीएम-किसान योजनेच्या लाभासाठी फार्मर आयडी असणेही केंद्र शासनाने आवश्यक केले आहे. शेतकऱ्यांमध्ये योजनेविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि लाभार्थ्यांना आवश्यक माहिती उपलब्ध करून देण्यासाठी राज्यात कृषी विभाग, महसूल व वन विभाग आणि ग्रामविकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

राज्यातील कृषी विज्ञान केंद्रे, जिल्हा, तालुका व ग्रामपंचायत स्तरावरील कार्यालये, कृषी उत्पन्न बाजार समित्या, संशोधन केंद्रे, शेतकरी उत्पादक कंपन्या (FPCs), शेतकरी उत्पादक संघटना (FPOs) आणि प्राथमिक कृषी पतसंस्था (PACS) येथे हे कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत.

या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण केंद्र शासनाच्या https://pmindiawebcast.nic.in या संकेतस्थळावरून करण्यात येणार आहे. शेतकरी बांधवांनी या संकेतस्थळाद्वारे कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा