You are currently viewing सिंधुदुर्गात दुष्काळ निवारणासाठी दोन कृती गटांची स्थापना

सिंधुदुर्गात दुष्काळ निवारणासाठी दोन कृती गटांची स्थापना

चारा व्यवस्थापन आणि रोजगार हमी अभियानाच्या कामांसाठी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे आदेश

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांचे नियोजन आणि प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने चारा व्यवस्थापन तसेच ‘विकसित भारत रोजगार आणि उपजीविका हमी अभियान (ग्रामीण)’ (VB-G RAM G) अंतर्गत कामांसाठी स्वतंत्र टास्क फोर्स (कृती गटांची)ची नियुक्ती केली आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अध्यक्षा तृप्ती धोडमिसे यांनी याबाबतचे आदेश निर्गमित केले आहेत.

पशुधनासाठी चारा उपलब्धता सुनिश्चित करणे, चारा व्यवस्थापनाच्या उपाययोजनांचे नियोजन करणे, तसेच विकसित भारत रोजगार आणि उपजीविका हमी अभियान (ग्रामीण) अंतर्गत दुष्काळ निवारणाशी संबंधित कामांचे नियोजन व अंमलबजावणी करणे, हा या कृती गटांच्या नियुक्तीमागील प्रमुख उद्देश आहे.

*चारा व्यवस्थापनासाठी स्वतंत्र कृती गट*

जिल्ह्यातील दुष्काळसदृश परिस्थितीवर मात करण्यासाठी चारा व्यवस्थापन कृती गटाची स्थापना करण्यात आली आहे. या गटाच्या अध्यक्षपदी जिल्हा उपआयुक्त पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय, सिंधुदुर्ग यांची नियुक्ती करण्यात आली असून, सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय यांच्याकडे सदस्य सचिवपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

या कृती गटात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, गटविकास अधिकारी, जिल्हा कृषी विकास अधिकारी, जिल्हा पणन अधिकारी तसेच वन विभाग आणि सामाजिक वनीकरण विभागाच्या प्रतिनिधींचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे. विविध विभागांमधील समन्वयातून पशुधनासाठी चारा उपलब्धता आणि चारा व्यवस्थापनाच्या उपाययोजनांचे नियोजन करण्याची जबाबदारी या गटावर असेल.

*VB-G RAM G अभियानांतर्गत कामांसाठी स्वतंत्र कृती गट*

‘विकसित भारत रोजगार आणि उपजीविका हमी अभियान (ग्रामीण)’ (VB-G RAM G) अंतर्गत कामांच्या नियोजनासाठी स्वतंत्र कृती गटाची स्थापना करण्यात आली आहे. या गटाच्या अध्यक्षपदी उपजिल्हाधिकारी (रोहयो) यांची नियुक्ती करण्यात आली असून, जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग येथील उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) यांच्याकडे सदस्य सचिवपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

या कृती गटात मृद व जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता, सामाजिक वनीकरण विभागाचे सहाय्यक वनसंरक्षक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जिल्हा कृषी विकास अधिकारी आणि जिल्हा जलसंधारण अधिकारी यांचा सदस्य म्हणून समावेश आहे.

या गटाच्या माध्यमातून VB-G RAM G अभियानांतर्गत करावयाच्या कामांचे नियोजन, संबंधित विभागांमध्ये समन्वय आणि दुष्काळ निवारणाच्या दृष्टीने आवश्यक कामांच्या अंमलबजावणीवर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील दुष्काळसदृश परिस्थितीचा सामना करण्यासाठी विविध विभागांनी समन्वयाने काम करणे आणि उपलब्ध संसाधनांचा प्रभावी वापर करणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर स्थापन करण्यात आलेल्या दोन्ही कृती गटांच्या माध्यमातून चारा व्यवस्थापन आणि VB-G RAM G अभियानांतर्गत कामांना नियोजनबद्ध दिशा मिळण्यास मदत होणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा