मतदान केंद्राच्या ठिकाणी मनाई आदेश जारी
सांगली / प्रदीप जोशी, ज्येष्ठ पत्रकार : महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणूक-२०२६ साठी सांगली जिल्ह्यामध्ये 23 ऑक्टोबर 2026 रोजी मतदान होणार आहे. सांगली जिल्ह्यामध्ये निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पडावी, जिल्ह्यात शांतता राहावी, कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती अबाधित राहावी, याकरिता प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून जिल्हादंडाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी मतदान केंद्राच्या ठिकाणी दिनांक 23 ऑक्टेाबर 2026 रोजीचे सकाळी 6 वाजल्यापासून ते संबंधित मतदान केंद्रावरील मतदान प्रक्रिया संपेपर्यंत मनाई आदेश जारी केला आहे.
या आदेशानुसार जिल्हादंडाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार, सांगली जिल्ह्यातील पुणे विभाग शिक्षक विधानपरिषद मतदारसंघ आणि पुणे विभाग पदवीधर विधानपरिषद मतदारसंघाच्या निश्चित केलेल्या मतदान केंद्रांच्या इमारतीपासून १०० मीटर सभोवतालच्या परिसरात पुढील कृत्ये करण्यास मनाई केली आहे.
आदेशात म्हटले आहे की, पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोकांना एकत्र जमण्यास, गटागटाने फिरण्यास अथवा बेकायदेशीर जमाव करण्यास, मतदान केंद्राच्या १०० मीटर परिसरात कोणत्याही प्रकारचा प्रचार करण्यास, घोषणा देण्यास अथवा मतदारांवर प्रभाव पाडण्यास मनाई केली आहे. झेरॉक्स मशीन, टेलिफोन बूथ, फॅक्स मशीन, ध्वनिक्षेपक (लाऊडस्पीकर) यांचा व्यावसायिक किंवा खाजगी वापर करण्यास, मतदान केंद्राच्या आत व परिसरात (अधिकृत व्यक्तींव्यतिरिक्त) मोबाईल फोन, पेजर किंवा इतर इलेक्ट्रॉनिक संप्रेषण साधने वापरण्यास मनाई करण्यात आली आहे.
हा आदेश निवडणूक कर्तव्य बजावीत असणाऱ्या शासकीय कर्मचारी /अधिकारी / पोलीस अधिकारी यांना लागू असणार नाही. हा आदेश दि. 23 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी ०६:०० वाजल्यापासून ते संबंधित मतदान केंद्रावरील मतदान प्रक्रिया पूर्णपणे संपेपर्यत अंमलात राहील. या आदेशाचे उल्लंघन करणारी कोणतीही व्यक्ती भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ च्या कलम २२३ अन्वये कायदेशीर कारवाईस पात्र राहील, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
