मतदारांना ओळख पटविण्यासाठी मतदार ओळखपत्र व्यतिरिक्त 10 पुरावे ग्राह्य
सांगली / प्रदीप जोशी, ज्येष्ठ पत्रकार : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघ द्विवार्षिक निवडणूकीकरीता 23 ऑक्टोबर 2026 रोजी मतदान होत आहे. मतदान करताना मतदान केंद्रावर मतदारांची ओळख पटविण्यासाठी जे मतदार ओळखपत्र (EPIC) सादर करु शकत नाहीत, अशा मतदारांना त्यांची ओळख पटविण्यासाठी मतदार ओळखपत्राच्या (EPIC) व्यतिरिक्त पुढील 10 नमूद पर्यायी कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य धरण्याबाबत भारत निवडणूक आयोगाने आदेश दिले आहेत.
मतदार ओळखपत्राव्यतिरिक्त ओळख पटविण्यासाठी पर्यायी 10 कागदपत्रे पुढीलप्रमाणे – (1) आधार कार्ड, (2) ड्रायव्हींग लायसन्स, (3) पॅन कार्ड, (4) भारतीय पासपोर्ट, (5) राज्य / केंद्र सरकार, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, स्थानिक स्वराज्य संस्था किंवा इतर खाजगी औद्योगिक संस्थांद्वारे त्यांच्या कर्मचाऱ्यांना दिलेले सेवा ओळखपत्र, (6) खासदार / आमदार / विधान परिषद सदस्य यांना दिलेली अधिकृत ओळखपत्रे, (7) संबंधित शिक्षक / पदवीधर मतदारसंघातील मतदार ज्या शैक्षणिक संस्थांमध्ये कार्यरत आहेत, त्या शैक्षणिक संस्थांनी जारी केलेले सेवा ओळखपत्र, (8) विद्यापीठाद्वारा वितरीत मुळ पदवी / पदविका प्रमाणपत्र, (9) सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले शारीरिक दिव्यांगत्याचे मूळ प्रमाणपत्र, (10) भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयाने जारी केलेले युनिक डिसॅबिलीटी ओळखपत्र (UDID).
