पाण्याअभावी उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर – किरण तारळेकर
विटे / प्रदीप जोशी, ज्येष्ठ पत्रकार :
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या विटा-कार्वे येथील विकास केंद्रातील उद्योगांना अगोदरच बाजारातील मंदी व इतर अनेक कारणांनी घरघर लागली असतानाच गेले दहा/बारा दिवस पाणी नसल्याने हे सर्व उद्योग कमालीच्या अडचणीत सापडले आहेत. अशी माहिती न्यु इंडिया टेक्स्टाईल पार्क लि. विटा चे अध्यक्ष किरण तारळेकर यांनी दिली.
त्यांनी दिलेली माहिती अशी : विटा कार्वे एमआयडीसीतील औद्योगीक पाण्याची गरज पुर्ण करण्यासाठी २००६ मध्ये पलुस येथील यंशवंत सहकारी पाणी पुरवठा योजनेतून पाईपलाईन द्वारे पाणीपुरवठा योजना करण्यात आली आहे.सदर मुळ यशवंत पाणी योजना शेती पाण्यासाठी असुन त्या योजनेस वीस वर्षांपेक्षा जास्त काळ झाला असल्याने योजनेतील पाईप्स वारंवार फुटण्याचे प्रकार गेल्या दोन तीन वर्षापासून खुप वाढले आहेत.
सद्यस्थितीत गेल्या दहा बारा दिवसांपूर्वी पाईप लाईन फुटल्याने गेल्या दहा बारा दिवसांपासुन कार्वे औद्योगीक क्षेत्राची पाणी पुरवठा बंद झालेला आहे.यामुळे या विकास केंद्रातील जे काही थोडेफार उद्योग सुरु आहेत त्यांना फार मोठे नुकसान सोसावे लागले आहे.टॅंकरचे पाणी विकत घेऊन उद्योग चालविणे या मंदीच्या काळात कमालीचे कठिण व नुकसानीचे ठरत आहे.हे कमी की काय म्हणुन पाईप लाईन दुरुस्ती झाली अन् आता शासनआदेशाने पाणी उपसा बंदी आदेश लागू करण्यात आल्याने पुन्हा पाणी बंद आहे.या सर्व परिस्थितीमुळे येथील उद्योजक हतबल झालेले असुन अशा परिस्थितीत येणारे वर्षभर उद्योग कसे चालवायचे हा मोठा यक्षप्रश्न उद्योजकांसमोर निर्माण झाला आहे.
एमआयडीसी व्यवस्थापनाच्या मनमानी धोरणांचा व कारभाराचाही फटका उद्योजकांना बसत आहे.एखाद्या उद्योजकाचा पाणी मिटर बंद पडला व त्या उद्योजकांने ते मीटर एमआयडीसीला कळवुन त्वरीत बदलुन घेतले तरी त्या उद्योजकांस गेल्या काही महिण्याचा पाणी वापर पाहुन सरासरी बिल भरायला भाग पाडले जाते. मात्र १०/१५ दिवस पाणी बंद असताना उद्योजकांच्या नुकसानीची कसलीच दाद घेतली जात नसल्याने उद्योजकांना आपण एमआयडीसी परीसरात आपले उद्योग घातल्याचा पश्चाताप करण्याची वेळ येत आहे .
सबब या सर्व परिस्थितीचा विचार करता एमआयडीसी व्यवस्थापनाने वीस वर्षे जुन्या झालेल्या योजनेचे नुतनीकरण करावे तसेच कार्वे औद्योगीक क्षेत्रासाठी स्वतंत्र पाणी योजना करुन भविष्यातील वाढत्या औद्योगीकरणाची पाणी मागणी पुर्ण करण्याचे नियोजन करावे अशी मागणी कार्वे विकास केंद्रातील उद्योजकांनी केली आहे.
