You are currently viewing चौकटीबाहेरची सीमोलंघने

चौकटीबाहेरची सीमोलंघने

*श्रीशब्द लालित्य समूह तथा जागतिक साकव्य विकास मंचच्या सन्मा सदस्या लेखिका कवयित्री छाया उंब्रजकर लिखित अप्रतिम ललित लेख*

 

*‘चौकटीबाहेरची’ सीमोलंघने*

 

घराच्या खिडकीतून दिसणारे आकाश रोज तेच असते. पण त्या आकाशाकडे पाहणाऱ्या डोळ्यांत नवे स्वप्न उमलले की क्षितिजाचा अर्थ बदलतो. उंबरठा तोच असतो. पायवाटही तीच असते. मात्र मनातली एखादी भीती गळून पडली की पावलांना अनोखी दिशा सापडते. आयुष्याच्या वाटेवर अशी काही वळणे येतात जिथे परिचित जगाच्या सुरक्षित कुशीत राहायचे की अज्ञाताच्या दिशेने झेप घ्यायची हा प्रश्न समोर उभा ठाकतो. त्या क्षणी घेतलेला निर्णय केवळ मार्ग बदलत नाही तर जगण्याची दृष्टीही बदलून टाकतो. हीच असतात चौकटीबाहेरची सीमोल्लंघने!

 

प्रत्येक आयुष्याभोवती काही अदृश्य चौकटी असतात. काही परंपरेने आखलेल्या. काही समाजाने ठरवलेल्या. तर काही स्वतःच्याच मनाने उभ्या केलेल्या. या चौकटींना भिंती नसतात. कुलूप नसते. तरी त्यांचा पाश घट्ट असतो. लोक काय म्हणतील, अपयश आले तर काय होईल, आजवर चालत आलेली रीत मोडली तर आपलेपण हरवेल का अशा प्रश्नांचे धुके मनाभोवती दाटलेले असते. माणूस अनेकदा आपल्या क्षमतांपेक्षा भीतीच्या सावलीतच जगत राहतो. पिंजऱ्याचे दार उघडे असूनही आकाशाची भीती वाटणाऱ्या

पक्ष्यासारखी त्याची अवस्था होते.

 

अंगणातल्या तुळशी वृंदावनाजवळ बसलेली आजी आणि तिच्या हातातला जुना चष्मा हे दृश्य किती साधे! पण त्या चष्म्याच्या काचांमधून दिसणारे जग आणि तिच्या नातीच्या डोळ्यांतून दिसणारे जग यांत किती अंतर असते! आजीच्या काळात मुलींच्या स्वप्नांना घराच्या भिंतींनी मर्यादा घातल्या होत्या. शिक्षणा पेक्षा संसार, इच्छेपेक्षा कर्तव्य आणि स्वतःच्या आनंदापेक्षा इतरांचे समाधान यांनाच अधिक महत्त्व दिले जात होते. त्याच घरातली नात जेव्हा शिक्षणासाठी दूरच्या शहरात जाण्याचा निर्णय घेते तेव्हा तिच्या पावलां सोबत एका पिढीच्या विचारांचीही वाटचाल सुरू होते. तिच्या हातातली प्रवासाची बॅग केवळ कपड्यांनी भरलेली नसते. त्यात असतात अनेक वर्षे मनात जपलेले स्वप्न, थोडी धाकधूक आणि स्वतःला सिद्ध करण्याची अनामिक ओढ.

 

अशा सीमोल्लंघनाचा अर्थ जुन्या पिढीला नाकारणे नसतो. परंपरेतले माणुसकीचे, जिव्हाळ्याचे आणि नात्यांना जोडून ठेवणारे धागे जपतानाच अन्यायकारक बंधनांना प्रश्न विचारणे ही खरी कसोटी असते. वारसा म्हणून मिळालेल्या प्रत्येक गोष्टीला डोळे मिटून स्वीकारायचे नसते. काही गोष्टी काळाच्या प्रवाहात मागे सोडाव्या लागतात. नदी उगमाशी नाते तोडत नाही. पण एका जागी थांबूनही राहत नाही. तिच्या प्रवासातच तिचे अस्तित्व खुलत जाते.

 

निसर्गही या सीमोल्लंघनाची सुंदर शिकवण देतो. जमिनीच्या कुशीत दडलेले बीज अंधार फोडून वर येते तेव्हा त्याला प्रकाशाची खात्री नसते. मातीचा घट्ट थर बाजूला सारताना त्याच्या कोवळ्या अंकुराला किती बळ एकवटावे लागत असेल! तरीही ते वर येते. कारण त्याच्या आत वाढण्याची एक अनिवार ओढ असते. कळीला फुलण्यासाठी पाकळ्या उघडाव्याच लागतात. बंद कळी सुरक्षित असते. पण सुगंधाचा अनुभव तिच्या उमलण्यातच दडलेला असतो. माणसाच्या स्वप्नांचेही असेच असते. क्षमतेची जाणीव असूनही संधीच्या दारापर्यंत न पोहोचणाऱ्या स्वप्नांना उमलण्याचा ऋतू कधीच गवसत नाही.

 

कधी ही चौकट व्यवसायाच्या निवडीत आडवी येते. आयुष्यभर एका ठरावीक क्षेत्रात काम केल्यानंतर नव्या वाटेवर पाऊल टाकण्याची इच्छा मनात डोकावते. परिचित कामाचा आधार सोडून अनोळखी क्षेत्रात उतरायचे तर वय, अनुभव आणि लोकांच्या अपेक्षा यांचे प्रश्न पुढे येतात. तरीही एखादी व्यक्ती नव्याने शिकू लागते. स्वतःच्या हातांनी नवे कौशल्य घडवते आणि पुन्हा एकदा सुरुवातीच्या टप्प्यावर उभी राहते. त्या नव्या सुरुवातीमध्ये पराभव नसतो. असते स्वतःच्या क्षमतेवर ठेवलेली विश्वासाची खूण. आयुष्याला ठरावीक वळणावर पूर्णविराम द्यायचा नसतो हे अशा प्रवासांतून उमगते.

 

काही सीमोल्लंघने बाहेरच्या जगात दिसतात. तर काही मनाच्या गाभाऱ्यात घडतात. वर्षानुवर्षे अन्याय सहन करणाऱ्या स्त्रीने एक दिवस शांतपणे त्याविरुद्ध आवाज उठवणे, चुकीच्या रूढीला नकार देणे, स्वतःच्या अस्तित्वाचा आदर मागणे किंवा अपयशानंतर पुन्हा उभे राहणे या कृतींना कदाचित मोठ्या सोहळ्याची पार्श्वभूमी लाभत नाही. टाळ्यांचा गजरही होत नाही. पण आत खोलवर एक दार उघडते. स्वतःच्या वेदनेला शब्द देण्याचे धैर्य मिळते तेव्हा मुक्या सहन- शीलतेच्या चौकटीला पहिला तडा जातो. स्वतःसाठी उभे राहणे म्हणजे दुसऱ्या विरुद्ध उभे राहणे नव्हे. स्वतःलाही जगण्याचा समान अधिकार आहे याची जाणीव होणे होय.

 

मात्र चौकटीबाहेर जाणे म्हणजे प्रत्येक मर्यादा झुगारून देणेही नव्हे. स्वैरपणा आणि स्वातंत्र्य यांतील सूक्ष्म अंतर ओळखावे लागते. दुसऱ्याच्या अस्तित्वाचा सन्मान राखून, जबाबदाऱ्यांचे भान ठेवून आणि विवेकाची सोबत घेऊन केलेले सीमोल्लंघनच जीवन समृद्ध करते. स्वतःच्या स्वप्नांना जागा देताना दुसऱ्याच्या स्वप्नांवर पाय न ठेवणे हीच त्याची खरी सुंदरता.

 

आयुष्याच्या संध्याकाळी मागे वळून पाहताना अपूर्ण राहिलेल्या स्वप्नांची खंत अधिक बोचते की प्रयत्न करूनही अपयशी ठरलेल्या वाटेची? कदाचित अपयशाची वेदना काळाबरोबर निवळते. पण भीतीपोटी कधीच न उघडलेल्या दाराची हुरहूर मनाच्या एखाद्या कोपऱ्यात कायम राहते. म्हणून प्रत्येक नव्या पावलाने जग जिंकलेच पाहिजे असे नाही. कधी स्वतःच्या मनातली एक गाठ सुटली, एखाद्या जुन्या समजुतीला प्रश्न विचारता आला किंवा स्वतःच्या अस्तित्वाची ओळख नव्याने झाली तरी ते सीमोल्लंघन पुरेसे असते.

 

शेवटी चौकट मोडताना तुकडे उडवणे महत्त्वाचे नसते. त्या चौकटी- पलीकडचे आकाश पाहण्याची दृष्टी मिळवणे महत्त्वाचे असते. उंबरठा ओलांडताना मागचे घर विसरायचे नसते. तर त्या घराच्या खिडक्या अधिक मोठ्या करायच्या असतात. कारण माणसाचे खरे क्षितिज त्याच्या पावलांच्या अंतरावर नसते तर त्याच्या मनाने स्वीकारलेल्या शक्यतांच्या विस्तारात असते. आणि ज्या दिवशी मन भीतीच्या काठावरून विश्वासाच्या दिशेने पहिले पाऊल टाकते, त्या दिवशी सीमा संपत नाहीत त्या नव्या क्षितिजांची सुरुवात होतात.

 

कु. छाया उंब्रजकर

सोलापूर

प्रतिक्रिया व्यक्त करा