You are currently viewing वर्दे येथील तरुणीच्या हत्येने सिंधुदुर्गात खळबळ
Oplus_16908288

वर्दे येथील तरुणीच्या हत्येने सिंधुदुर्गात खळबळ

हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेणाऱ्या दामिनी पालवची हत्या; हल्ल्यामागील कारण अद्याप अस्पष्ट

आरोपी फरार; जिल्हाभर नाकाबंदी, सहा पोलीस पथके तैनात

कुडाळ: कुडाळ तालुक्यातील वर्दे येथे आज सायंकाळी एका २३ वर्षीय महाविद्यालयीन तरुणीची चाकूने वार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. दामिनी किरण पालव (वय २३, रा. वर्दे – खालची पालववाडी) असे मृत तरुणीचे नाव आहे. संबंधित तरुणी हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेत होती. या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून, आरोपी घटनास्थळावरून फरार झाला आहे.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहिकर आणि अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह तातडीने घटनास्थळी धाव घेतली. आरोपीला तात्काळ जेरबंद करण्यासाठी जिल्हाभरात कडक नाकाबंदी करण्यात आली आहे. ओरोस जिजामाता सर्कलसह प्रमुख नाक्यांवर वाहनांची कसून तपासणी सुरू आहे. आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची सहा पथके तैनात करण्यात आली आहेत.

भरवस्तीत घडलेल्या या खुनामुळे सिंधुदुर्ग पोलिसांसमोर आरोपीला शोधण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. या हल्ल्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली विविध पथकांकडून सर्व बाजूंनी तपास युद्धपातळीवर सुरू आहे.

दरम्यान, संबंधित तरुणी नेहमीप्रमाणे महाविद्यालयातून घरी जात होती. आज तिचे वडील बाहेर असल्यामुळे तिला नेण्यासाठी आले नव्हते. याच संधीचा फायदा घेत अज्ञाताने तिच्यावर चाकूने वार केल्याचे सांगण्यात येत आहे. हल्ल्यानंतर तिचा मृतदेह रस्त्याच्या बाजूला असलेल्या ओहोळात फेकून दिल्याची माहिती समोर आली आहे.

या घटनेमुळे वर्दे आणि परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. हत्येमागील कारण आणि आरोपीची ओळख तपासातून स्पष्ट होणार आहे.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा