सांगलीच्या बॉम्बे ब्लडग्रुप ऑर्गनायझर संस्थेकडून ‘नॅशनल अवॉर्ड २०२६’ जाहीर; रक्तदान चळवळीचा राष्ट्रीय स्तरावर गौरव
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अशी एकमेव संस्था आहे जी रक्तदान,अवयवदान व देहदान करण्यासाठी सतत जनजागृती व कार्यशाळा घेते. त्यानुसार आजपर्यंत ५०० हून अधिक रक्तदान शिबिरे मित्रसस्थांच्या सहकार्याने घेतली आहे.तसेच गोवा येथिल बांबोळी हॉस्पिटलच्या ब्लड बँकेला आतापर्यंत एक हजारहून अधिक बॅगसचा पुरवठा करणारी ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव संस्था आहे,तसेच अवयवदान व देहदाना बाबत जनजागृती करून आतापर्यंत आयुष हॉस्पिटलला (धारगळ – गोवा) देह उपलब्ध करून दिलेला आहे.तसेच थॅलेसेमिया या आजाराची या संस्थेने सद्यस्थितीत १७ हून अधिक मूले दत्तक घेतली आहे.त्यापैकी काही मुलांचा रक्तगट हा दुर्मिळ असून त्यांना वेळेवर रक्त पुरवठा करणारी ही जिल्ह्यातील एकमेव संस्था आहे. तसेच बॉम्बे ब्लड ग्रुप या अति दुर्मिळ रक्तागटाचे आपल्या देशात जवळपास २०० व्यक्ती असुन पैकी २० जण सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहेत,बॉम्बे ब्लड ग्रुपची शोधमोहिम राबविणारी ही एकमेव संस्था आहे,संस्थेच्या माध्यमातून नवीन बॉम्बे ब्लडग्रुप शोधले गेले आहेत,पैकी तीन डोनर याच संस्थेने शोधले आहेत.या डोनरनी रक्त आंध्रप्रदेश,पुणे व सिंधुदुर्गात पुरविले आहे.त्यामुळे तो ही एक जगातील एखाद्या एनजीओचा विक्रम असेल.तसेच दरवर्षी हजारो रुग्णांना तात्काळ रक्तदाते उपलब्ध करून देणे,प्लेटलेटस डोनरही सर्वाधिक याच संस्थेकडे आहेत.तसेच याच संस्थेने काही कार्यकर्ते घडविले आहेत जे नवीन संस्था काढून सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग प्रमाणे काम करण्याचा प्रयत्न करत आहेत.
तसेच रुग्णमित्र म्हणून रुग्णांना विविध सेवांच्या उपलब्धतेबद्दल शासनाच्या योजनांबद्दल,वैद्यकीय उपचारांबद्दल मार्गदर्शन केेले जाते,आरोग्य विषयक जनजागृती केली जाते.या स्तुत्य कार्याची दखल दोन महिन्यांपूर्वीच मावळ – पुणे येथे ग्राहक पंचायत महाराष्ट्रच्या अधिवेशनात ‘ग्राहक पंचप्राण पुरस्कार’ प्रदान करून घेण्यात आली होती.
या सर्व बाबींचा विचार करून ‘सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान’ च्या समाजोपयोगी कार्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव सांगली जिल्ह्यातील तासगाव येथील बॉम्बे ब्लडग्रुप ऑर्गनायझर या संस्थेच्या वतीने प्रतिष्ठानला प्रतिष्ठेचा ‘नॅशनल अवॉर्ड २०२६’ जाहीर करण्यात आला आहे.या पुरस्कारामुळे जिल्ह्यातील रक्तदान चळवळीला मोठे बळ मिळाले असून प्रतिष्ठानच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
बॉम्बे ब्लडग्रुप ऑर्गनायझरचे संस्थापक अध्यक्ष विक्रम यादव यांनी सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश तेंडोलकर यांच्याशी संपर्क साधून या पुरस्काराची घोषणा केली. यावेळी त्यांनी प्रतिष्ठानच्या कार्याचा गौरव करत पुरस्कार वितरण सोहळ्याचे निमंत्रणही दिले.
सांगली जिल्ह्यातील तासगाव येथे दी ३० ऑक्टोबर २०२६ रोजी भव्य पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे.या सोहळ्यात सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठानला राष्ट्रीय स्तरावरील पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.या गौरवामुळे प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांसह सर्व सदस्य आणि कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या पुरस्कार सोहळ्यासाठी प्रतिष्ठानचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते दी २९ ऑक्टोबर रोजी तासगावकडे रवाना होणार आहेत.कार्यक्रमाच्या नियोजनासाठी जिल्हा तसेच सर्व तालुका स्तरावरील अध्यक्ष, सचिव आणि पदाधिकाऱ्यांनी वेळेत उपस्थिती नोंदवावी,असे आवाहन संस्थापक अध्यक्ष प्रकाश तेंडोलकर यांनी केले आहे.
*रक्तदानाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या कार्याचा गौरव!*
सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठानच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गरजू रुग्णांना तातडीने रक्त उपलब्ध करून देणे,रक्तदात्यांचे जाळे निर्माण करणे आणि समाजामध्ये रक्तदानाबाबत व्यापक जनजागृती करणे,अशी विविध सामाजिक कार्ये सातत्याने केली जात आहेत.रक्ताची गरज भासणाऱ्या रुग्णांना वेळेत मदत मिळावी,यासाठी प्रतिष्ठानचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते अहोरात्र प्रयत्नशील असतात.
रक्तदान हे महान कार्य आहे,या भावनेतून प्रतिष्ठानचे कार्यकर्ते काम करीत आहेत.त्यांच्या या निःस्वार्थ सेवाभावी कार्याची दखल घेत राष्ट्रीय स्तरावर पुरस्कार जाहीर झाल्याने प्रतिष्ठानच्या कार्याला नवी ऊर्जा मिळाली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रक्तदान चळवळीला राष्ट्रीय ओळख मिळवून देणारा हा सन्मान प्रतिष्ठानच्या सर्व पदाधिकारी, सदस्य आणि रक्तदात्यांसाठी अभिमानाची बाब ठरला आहे.या पुरस्कारामुळे आगामी काळात रक्तदान चळवळ अधिक व्यापक करण्यासाठी आणि गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध करून देण्यासाठी कार्यकर्त्यांना नवी प्रेरणा मिळणार आहे.
