You are currently viewing सहाव्या माळेत उमटला प्रशासकीय क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांच्या यशाचा ठसा

सहाव्या माळेत उमटला प्रशासकीय क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांच्या यशाचा ठसा

मुंबई : सेवा मंडळ एज्युकेशन सोसायटी संचालित श्रीमती मणिबेन एम. पी. शाह कला आणि वाणिज्य स्वायत्त महिला महाविद्यालय, माटुंगा येथील मराठी विभागाच्या वतीने ‘वंदे मातरम् १५०’ अंतर्गत ‘वंदे मातरम् महिला अपूर्वम्’ या उपक्रमांतर्गत आयोजित ‘शारदोत्सव व्याख्यानमाला २०२६’ या सहाव्या पर्वातील सहावी माळ शुक्रवार, १६ ऑक्टोबर रोजी पार पडली.

यावेळी सेंट अँड्र्यूज महाविद्यालयाच्या प्रा.चैताली धनू या प्रमुख वक्त्या म्हणून कार्यक्रमासाठी लाभल्या होत्या.‘प्रशासकीय क्षेत्रातील महिलांचे योगदान’ या विषयावर मार्गदर्शन केले.

प्रशासकीय क्षेत्रात महिलांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवत विविध आव्हानांवर मात करून यशाची शिखरे गाठणाऱ्या महिलांचा प्रेरणादायी प्रवास विद्यार्थिनींसमोर मांडताना प्रा. धनू यांनी अ‍ॅना मल्होत्रा, किरण बेदी, गौरी कुमार, निरुपमा राव,रजनी सेखरी आणि टीना डाबी यांसारख्या कर्तृत्ववान महिलांच्या कार्याची माहिती दिली.

महिलांचे योगदान केवळ घरापुरते किंवा एखाद्या विशिष्ट क्षेत्रापुरते मर्यादित नसून, प्रशासन, शिक्षण आणि समाजसेवा अशा विविध क्षेत्रांत महिला महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत. महिलांमधील नेतृत्वगुण, निर्णयक्षमता, संवेदनशीलता आणि कार्यतत्परता यांमुळे त्या समाजाच्या विकासात मोलाचे योगदान देऊ शकतात, हा विचार या व्याख्यानातून अधोरेखित झाला.

विद्यार्थिनींनी स्वतःमधील क्षमता ओळखून मोठी स्वप्ने पाहावीत, ध्येय निश्चित करावे आणि ते साध्य करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावेत. यशस्वी होण्यासाठी केवळ संधी मिळणे पुरेसे नसून, त्या संधीचे सोने करण्यासाठी मेहनत, आत्मविश्वास आणि चिकाटी आवश्यक आहे, असा प्रेरणादायी आशय या व्याख्यानातून विद्यार्थिनींपर्यंत पोहोचला.

महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव करून त्यांना नव्या संधींची जाणीव करून देणे आणि विद्यार्थिनींमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे, हा या व्याख्यानमालेचा महत्त्वपूर्ण उद्देश आहे. ‘नवदुर्गा : नवविचार’ या संकल्पनेतून महिलांच्या विविध क्षेत्रांतील योगदानाचा वेध घेणारी ही व्याख्यानमाला विद्यार्थिनींसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. अर्चना पत्की यांच्या मार्गदर्शनाखाली या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. तसेच या उपक्रमासाठी विश्वभान प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.जगदीश संसारे यांचे सौजन्य लाभले.

महाविद्यालयाच्यावतीने सर्वांचे स्वागत करत सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.रश्मी शेट्ये तुपे केले तर सहाय्यक प्रा.माधवी पवार यांनी उपस्थित आमचे आभार मानले. सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक, व्याख्यानमालेतील विविध विषयांवरील व्याख्यात्या, विद्यार्थिनी तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा