You are currently viewing सिंधुदुर्गात उभारणार देशातील पहिले बहुप्रजातीय मत्स्यबीज केंद्र
Oplus_16908288

सिंधुदुर्गात उभारणार देशातील पहिले बहुप्रजातीय मत्स्यबीज केंद्र

पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते भूमिपूजन; मत्स्यशेती, महिला बचत गट आणि तरुणांसाठी नव्या संधी

२२.२४ कोटींच्या प्रकल्पातून रोजगार आणि आर्थिक समृद्धीला चालना

सिंधुदुर्ग : वेंगुर्ला तालुक्यातील उभादांडा येथे देशातील पहिल्या बहुप्रजातीय मत्स्यबीज उत्पादन केंद्राचे भूमिपूजन राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. तब्बल २२.२४ कोटी रुपये खर्चाच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे कोकण आणि सिंधुदुर्गच्या अर्थव्यवस्थेला नवी दिशा मिळणार असून, स्थानिकांच्या आर्थिक समृद्धीचा मार्ग खुला होईल, असा विश्वास मंत्री नितेश राणे यांनी यावेळी व्यक्त केला.

सध्या देशातील मत्स्य उत्पादनात आंध्र प्रदेश राज्य अव्वल स्थानी आहे. या राज्यात वार्षिक ५५ लाख ३९ हजार टन मत्स्य उत्पादन होते आणि मत्स्य व्यवसायातून ७७ हजार ८५ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळते. त्या तुलनेत महाराष्ट्रात सध्या ७ लाख ४३ हजार टन मत्स्य उत्पादन होत असून, राज्याचे उत्पन्न १२ हजार ७७५ कोटी रुपये आहे. आंध्र प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रातील मच्छिमारांनाही जागतिक स्पर्धेत उतरवून त्यांच्या व्यवसायाला बळ देण्यासाठी राज्य सरकारने मत्स्य व्यवसायाला ‘कृषीचा दर्जा’ दिला आहे. यामुळे जिल्हा बँक आणि इतर वित्तीय संस्थांमार्फत शेतकऱ्यांप्रमाणेच मच्छिमारांनाही सुलभपणे कर्ज व आर्थिक मदत उपलब्ध होणार आहे. याशिवाय, केंद्राच्या प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेच्या धर्तीवर राज्यात ‘मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजना’ लागू करण्यात आली आहे.

या प्रकल्पाच्या माध्यमातून केवळ मत्स्यबीज उत्पादनालाच नव्हे, तर मत्स्य टाकाऊ पदार्थांपासून मूल्यवर्धित उत्पादने तयार करण्यालाही चालना दिली जाणार आहे. मासे आणि कोळंबी सोलताना निघणाऱ्या टाकाऊ पदार्थांपासून सौंदर्यप्रसाधन उद्योगात वापरले जाणारे अत्यंत मूल्यवान ‘कोलाजेन’ तयार करता येते. यासाठी प्रक्रिया उद्योग उभारण्याची मोठी संधी उपलब्ध आहे.

आंध्र प्रदेशातील एका प्रकल्पाचे उदाहरण देताना मंत्री नितेश राणे यांनी सांगितले की, ३० कोटी रुपयांची गुंतवणूक करणाऱ्या एका कारखान्याला अमेरिकन कंपनीकडून तब्बल साडेचारशे कोटी रुपयांची ऑफर मिळाली होती. याच धर्तीवर सिंधुदुर्गातील मत्स्य टाकाऊ पदार्थांचा योग्य वापर करून मूल्यवर्धनाचे उद्योग उभारले जातील. त्यामुळे स्थानिकांना आर्थिक लाभ मिळण्यासोबतच नव्या रोजगारनिर्मितीलाही चालना मिळेल.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तरुणांना रोजगारासाठी जिल्ह्याबाहेर जाण्याची वेळ येऊ नये, यासाठी मत्स्यव्यवसाय, पर्यटन आणि कृषी या क्षेत्रांच्या माध्यमातून स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मिती आणि दरडोई उत्पन्न वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. उभादांडा येथील मत्स्यबीज उत्पादन केंद्रामुळे मत्स्य उत्पादक, महिला बचत गट आणि तरुणांना व्यवसायाच्या नव्या संधी उपलब्ध होतील.

या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे काम पुढील वर्षी १५ ऑक्टोबरपर्यंत, म्हणजेच १२ महिन्यांच्या आत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री आणि इतर वरिष्ठ मंत्री उपस्थित राहतील, असेही मंत्री राणे यांनी सांगितले. या केंद्रामुळे उभादांड्यासह संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या आर्थिक विकासाला चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांनी आपल्या मनोगतात पालकमंत्र्यांच्या पुढाकारामुळे जिल्ह्यात अनेक नाविन्यपूर्ण प्रकल्प येत असून, हा प्रकल्प जिल्ह्याचे नावलौकिक वाढवणारा, रोजगारनिर्मिती करणारा आणि आर्थिक सुबत्ता आणणारा ठरेल, असे सांगितले.

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी देशातील पहिले बहुप्रजातीय मत्स्यबीज उत्पादन केंद्र सिंधुदुर्ग जिल्ह्यात उभारले जात असल्याबद्दल आनंद व्यक्त केला. या प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील, असे त्यांनी नमूद केले. प्रकल्पाचे काम उत्तम दर्जाचे आणि निर्धारित वेळेत पूर्ण केले जाईल, अशी ग्वाही मत्स्यव्यवसाय आयुक्त भानुदास पालवे यांनी दिली.

अतिरिक्त मत्स्यव्यवसाय आयुक्त महेश देवरे यांनी शास्त्रोक्त पद्धतीने जिताडा प्रकारातील एक कोटी मत्स्यबीज तयार करण्याचे उद्दिष्ट असलेला हा प्रकल्प आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना समृद्धीच्या दिशेने नेणारा ठरेल, असे सांगितले. जैवसुरक्षेचे नियम पाळून स्थानिकांना मोठा आर्थिक फायदा मिळवून दिला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

शास्त्रज्ञ पंकज पाटील यांनी पिंजरा आणि नैसर्गिक प्रक्रियेद्वारे मत्स्यबीज संवर्धन करण्यात येणार असल्याची माहिती दिली. मत्स्य उत्पादक आणि बचत गटांची साखळी तयार करून मत्स्यशेतीसाठी दर्जेदार बीज उपलब्ध करून दिले जाईल, असे त्यांनी सांगितले. विभागीय वन अधिकारी कांचन पवार यांनी कोकणातील मच्छिमारांना या प्रकल्पाचा लाभ मिळावा, यासाठी कांदळवन आणि मत्स्य विभाग पर्यावरण संवर्धनाचे रक्षण करत एकत्रितपणे काम करतील, असे नमूद केले.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय सागर कुवसेकर यांनी या प्रकल्पाची माहिती दिली. सागरी मत्स्यव्यवसायाच्या इतिहासातील महत्त्वाचा टप्पा ठरणाऱ्या या २२.२४ कोटी रुपयांच्या प्रकल्पामुळे शाश्वत मत्स्यव्यवसायाला चालना मिळून युवकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होतील, असे त्यांनी सांगितले.

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, मत्स्यव्यवसाय आयुक्त भानुदास पालवे, वेंगुर्ला पंचायत समितीचे सभापती शंकर घारे, सरपंच नीलेश चमणकर, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, अतिरिक्त मत्स्यव्यवसाय आयुक्त महेश देवरे, दक्षिण कोकण विभागाच्या विभागीय वन अधिकारी कांचन पवार, शास्त्रज्ञ पंकज पाटील, सहआयुक्त नागनाथ भादुले, सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय सागर कुवसेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा