सावंतवाडी :
मळगाव येथील कैलासवासी प्रा. उदय रमाकांत खानोलकर वाचन मंदिरात वाचन प्रेरणा दिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला.
वाचन संस्कृती दृढ व्हावी या हेतूने वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून वाचन मंदिराच्या उत्कृष्ट वाचकांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये आजीव सभासद वाचक माजी मुख्याध्यापिका सौ. श्रद्धा सावंत आणि आजीव सभासद वाचक सौ. मानसी गवंडे यांचा उत्कृष्ट वाचक म्हणून शाल, श्रीफळ, गुलाबपुष्प, प्रमाणपत्र व ग्रंथभेट देऊन सत्कार करण्यात आला. तर सर्वसाधारण वाचक सभासद श्री. ज्ञानेश्वर राणे, सौ. अनिशा जाधव आणि बालवाचक कुमार आदित्य बांदिवडेकर व कु. खुशी लातये यांना गुलाबपुष्प व ग्रंथभेट देऊन गौरविण्यात आले.
सदर कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध नाट्यकर्मी व दिग्दर्शक माननीय श्री. सचिन धोपेश्वरकर उपस्थित होते, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाचन मंदिराचे अध्यक्ष श्री. महेश खानोलकर होते.
या कार्यक्रमात मळगाव हायस्कूलच्या इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला. कुमार शशांक गावकर (आयझॅक न्यूटन), कु. स्वरा परब (सी. व्ही. रमण), कु. सिद्धी शिरोडकर (ए. पी. जे. अब्दुल कलाम), कु. शिवाजी नाईक (विक्रम साराभाई) आणि कु. ईश्वरी साठेलकर (न्यूटन कथा) यांनी थोर शास्त्रज्ञांच्या विचारांचे सादरीकरण करून आपले विचार व्यक्त केले.
यावेळी प्रमुख अतिथी श्री. सचिन धोपेश्वरकर म्हणाले, “वाचाल तर वाचाल. सोशल मीडियावरील आयती माहिती विचार करण्याची गती कमी करते. पुस्तकांचे वाचन हीच खरी समृद्धी असून संदर्भासाठी प्रिंट मीडिया शाश्वत आहे. विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त पुस्तके वाचून वैचारिक प्रगल्भता वाढवावी.”
या कार्यक्रमास वाचन मंदिराचे उपाध्यक्ष श्री. बाबली उर्फ आबा नार्वेकर, संचालक श्री. शांताराम गवंडे, श्री. चंद्रकांत जाधव, माजी मुख्याध्यापक श्री. वैजनाथ देवन, श्री. बाळकृष्ण मुळीक, सौ. आनंदी मोर्ये यांसह वाचन मंदिराचे सभासद, हितचिंतक व देणगीदार उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन व आभार संस्थेच्या कार्यवाह सौ. स्नेहा महेश खानोलकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रंथपाल श्री. आनंद देऊळी, लिपिक सौ. देवयानी मळगावकर आणि कर्मचारी श्री. सुभाष तोरस्कर यांनी परिश्रम घेतले.
