You are currently viewing देवी म्हणूनी पुजू नका हो…
Oplus_16908288

देवी म्हणूनी पुजू नका हो…

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*देवी म्हणूनी पुजू नका हो…*

 

 

देवी म्हणून पुजू नका हो सन्मानाने ठेवा मला

माणूस आहे तीच बरी हो दागिन्यांची नको “तुला”

 

महिषासुरमर्दिनी म्हणविता अपमानाचे”कढ”घरी

वाक्बाणांनी घायाळ होता कापतजाते उरी सुरी..

 

कुठेच नाही कमी हो नारी काकणभर ती सरस असे

म्हणून चेचता पायाखाली लज्जा तुम्हा मुळी नसे..

 

अनेकरूपांनी ती येते सेवा करते परोपरी

तिच्यावाचूनी पान न हलते माहित आहे घरोघरी..

 

तरी का करती कवडीमोल हो पुरुषार्थाचा फणा कसा?

जन्मापासून राबराबते टाकत नाही कधी वसा..

 

मुले घडविते घर घडविते प्रेमाची ती फक्त धनी

शोधून आणा त्रिखंडात हो मिळणार ना अशी गुणी..

 

तरी का होतच नाही कदर हो वरचष्मा तो धाक सदा

सर्वगुणसंपन्न नार हो तरी का मारती बदाबदा..

 

व्यसनी असो वा असो कसाही(ई)मूठ झाकली

तिची असे

कधी न कळली किंमत तिची हो नराधम अंतरी वसे..

 

न्याय कधी ना मिळेल माहिती,अंगी मुरल्या जुन्या रीति

ढोंगे चालती नवरात्री हो नारीची ना कुणा क्षिती..

 

तुम्ही वागा वागा कसेही सोडणार ना तिचा वसा

तिची लेकरे तिचे धन हो फास तुम्ही मग कितीही

“कसा”…

 

प्रा. सौ. सुमती पवार नाशिक

(९७६३६०५६४२)

प्रतिक्रिया व्यक्त करा