You are currently viewing सेवा संकल्प अभियानांतर्गत मुळदे येथे मधपाळ प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन

सेवा संकल्प अभियानांतर्गत मुळदे येथे मधपाळ प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन

मधमाशीपालनातून शेतीपूरक व्यवसाय व ग्रामीण रोजगाराला चालना देण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग  : महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि उद्यानविद्या महाविद्यालय, मुळदे-कुडाळ यांच्या संयुक्त विद्यमाने खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या मधकेंद्र योजनेंतर्गत सातेरी मधमाशीपालन लाभार्थ्यांसाठी आयोजित मधपाळ प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन सेवा संकल्प अभियानांतर्गत उत्साहात संपन्न झाले. मधमाशीपालन व्यवसायाला प्रोत्साहन देणे, शेतकऱ्यांना शेतीपूरक उत्पन्नाचे साधन उपलब्ध करून देणे आणि ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी निर्माण करणे हा या प्रशिक्षणाचा प्रमुख उद्देश आहे.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी टी. डी. गावडे यांनी प्रशिक्षणाच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. मधमाशीपालन व्यवसायाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी अशा प्रशिक्षणांचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.

उद्यानविद्या महाविद्यालय, मुळदे येथील कीटकशास्त्र विषयाच्या प्राध्यापकांनी कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे होणारे दुष्परिणाम आणि मधमाश्यांची घटती संख्या याविषयी मार्गदर्शन केले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मधमाशीपालनासाठी अनुकूल संधी असून, तरुणांनी या व्यवसायाकडे रोजगाराचे साधन म्हणून पाहावे, असे आवाहन त्यांनी केले.

कुडाळचे तालुका कृषी अधिकारी भास्कर चौगुले यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती देऊन शेतकऱ्यांनी एकत्रित प्रयत्नांतून उत्पादनवाढीसाठी मधमाशीपालनाचा अवलंब करावा, असे सांगितले. प्रगतशील मधपाळ नारायण चेंदवणकर यांनीही प्रशिक्षणार्थींना मधमाशीपालन व्यवसायाबाबत मार्गदर्शन केले.

मुळदे उद्यानविद्या महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. विजय दळवी यांनी प्रशिक्षणासाठी महाविद्यालयाची निवड केल्याबद्दल आयोजकांचे आभार मानले. मुळदे परिसर मधमाशीपालनासाठी अनुकूल असून, या प्रशिक्षणामुळे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनाही मधमाश्यांच्या वसाहतींचे प्रत्यक्ष व्यवस्थापन व हाताळणी शिकण्याची संधी मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.

शेतकऱ्यांनी आपल्या फळबागांमध्ये मधमाश्यांच्या पेट्या ठेवल्यास परागीभवन प्रक्रियेला चालना मिळून पीक उत्पादन व उत्पादकता वाढण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे मधमाशीपालन हा शेतीला पूरक आणि उत्पन्नवाढीसाठी उपयुक्त व्यवसाय ठरू शकतो. प्रशिक्षणार्थींनी या प्रशिक्षणाचा लाभ घेऊन मधमाशीपालनाकडे उत्पन्नवाढीचे साधन म्हणून पाहावे, असे आवाहन डॉ. दळवी यांनी केले.

कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी श्री. गावडे यांनी उपस्थित मान्यवर, प्रशिक्षक व प्रशिक्षणार्थी यांचे आभार मानले. सातेरी मधमाशीपालनाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शेतकरी व लाभार्थ्यांसाठी रोजगार आणि उत्पन्नवाढीच्या नव्या संधी निर्माण होतील, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.

प्रतिक्रिया व्यक्त करा