जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री पल्लवी उमेश लिखित अप्रतिम लेख
*नवरात्र…दिवस चौथा…चौथी माळ..*
*या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता* ।
*नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥*
आज नवरात्रीचा चौथा दिवस…आज आपण अशा एका संत स्त्रीचा परिचय करून घेणार आहोत,ज्या खरोखर अभिमानास पात्र आहे. त्यांचे विषयी वाचले तर आपल्याला खरंच त्यांचे कौतुक वाटेल….तिचे नाव आहे….
*संत निर्मळा बाई*
संत निर्मळा बाई या १४ व्या शतकातील संत होऊन गेल्या..या संत चोखामेळा यांच्या भगिनी आणि संत सोयराबाई यांच्या नणंद होत्या..तसेच सोयराबाई यांचे बंधू संत बंका महार यांच्या पत्नी होत्या…..तसेच संत चोखामेळा यांचा मुलगा संत कर्ममेळा यांच्या त्या आत्या होत्या….या परिचयावरून त्या एका विठ्ठल भक्तीत रममाण झालेल्या कुटुंबियांच्या पैकी एक होत्या असे दिसून येते.अशा प्रकारे त्यांचे संपूर्ण कुटुंबच (चोखोबा, सोयराबाई, निर्मळा बाई ,बंका आणि कर्ममेळा) विठ्ठल भक्तीमध्ये तल्लीन झालेले होते. वारकरी संप्रदायातील महिला संतांमध्ये संत निर्मळा बाई यांचे स्थान अत्यंत आदराचे व मोलाचे मानले जाते.
संत निर्मळा बाई यांचा जन्म बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्यातील ‘मेहुणाराजा’ (मेहुणपुरी) या गावी झाला. या गावाजवळून वाहणाऱ्या ‘निर्मळा’ नदीवरूनच त्यांचे नाव ‘निर्मळा’ ठेवण्यात आले होते.
महार जातीत जन्म घेतलेल्या या संत निर्मलाबाईंनी समाजाच्या या काळया भागाचा अगदीच जवळून विलक्षण अनुभव घेतला होता. त्यांनी त्याकाळी, जेंव्हा स्त्री किती बंदिस्त वातावरणात वाढत होत्या, त्यात यांनी आवाज उठवायचा ठरवले. त्यांनी वर्णव्यवस्थेविरुद्ध आवाज उठवला, ते ही आपल्या कवितेतून . त्या काळी समाजात असणाऱ्या कठोर जातीव्यवस्था, विषमता आणि गावकुसाबाहेरील शोषित वर्गाची होणारी घुसमट त्यांनी जवळून अनुभवली होती. आणि त्याचाच त्यांनी आपल्या अभंगांमधून या सामाजिक अन्यायावर आणि विषमतेवर भाष्य केले आहे असे दिसून येते. वर्णव्यवस्थेला धडका देत असतानाच कर्मकांडांमुळे गलितगात्र झालेल्या समाजाला सोप्या नामसाधनेचा पर्याय देण्याचा जो प्रयत्न वारकरी संतांनी केला, त्यात महिला संत निर्मळा यांचा वाटा मोठा दिसतो. हे करत असतानाच त्यांनी कठीण कर्मकांडे, यज्ञ आणि अनिष्ट प्रथांमध्ये अडकलेल्या तत्कालीन समाजाला त्यांनी अगदी सोपा आणि सहज असा ‘नामस्मरणाचा’ (भगवंताचे नाव घेण्याचा) मार्ग दाखवला.
कर्मकांडांत अडकलेल्या समाजाला भगवंताच्या नामाचा सोपा पर्याय दिला. या पर्यायाच्या आघाडीच्या प्रचारक म्हणून निर्मळा यांच्याकडे पाहिले जाते. त्या स्पष्ट शब्दांत नामसाधनेचा पर्याय अधोरेखित करताना म्हणतात…..
“संसाराचे कोण कोड । नाही मज त्याची चाड ॥
एका नामेंचि विश्वास । दृढ घालोनिया कांस ॥
जेथे न चले काळसत्ता । विठोबाचे नाम गाता ॥
शास्त्रे-पुराणे वदती । नाम तारक म्हणती ॥”
या अभंगातून इतर कर्मकांडांत अडकण्यापेक्षा देवाच्या नावावर विश्वास ठेवा. त्या विठ्ठलाचे नाव घेतले की, काळाचीही सत्ता तेथे चालत नाही, असे ठामपणे सांगत असताना, त्यासाठी निर्मळाबाई शास्त्रे आणि पुराणांची साक्ष काढतात. कारण त्यांच्या मते आपल्यासारख्या गावकुसाबाहेर राहणार्याचे कोण ऐकणार?
त्यांच्या लेखनात मुख्यत्वे अभंग आहेत ज्यात … समाजात असलेल्या अन्याय आणि असमानतेचे वर्णन केले आहे.
संत निर्मलाबाई आपल्या भावाला, म्हणजेच संत चोखामेळा यांनाच आपले गुरू मानत असत. त्यांच्या रचनांमध्ये भावाप्रती असणारा आदर स्पष्टपणे दिसून येतो. किंबहुना नामसाधनेचा सोप्पा मार्ग आपल्याला चोखामेळा यांच्यापासूनच मिळाला असल्याचे सांगताना त्या म्हणतात-
” चोखा म्हणे निर्मळेशी । नाम गाय अहर्निशी ॥
तेणे संसार सुखाचा । इह परलोकी साचा ॥
साधन हेचि थोर असे । शांती क्षमा दया वसे ॥”
आपल्या अभंगाच्या शेवटी त्या आवर्जून त्यांचे नाव लिहीत असे..उदा..स्वतःला “चोखियाची बहीण” असे म्हणवून घेत असत. भावाला गुरुपद देऊन आदराचे स्थान त्यांनी आपल्या अभंगातून दिलेले दिसते.
संत निर्मळा बाईंच्या नावे सुमारे २४ अभंग प्रसिद्ध आहेत. त्यांच्या अभंगांची भाषा अत्यंत सहज, सुंदर आणि भावूक आहे.
त्यांच्या प्रसिद्ध अभंगाचे एक उदाहरण:
अनाथांचा नाथ कृपावंत देवा ।
घडो तुमची सेवा अहर्निशीं ॥१॥
अठ्ठाविस युगें विटेवरी उभा ।
वामभागीं शोभा रुक्मादेवी ॥२॥
पतित पावन गाजे ब्रीदावळी ।
पुरवावी आळी हीच माझी ॥३॥
उभा विटेवरी ठेवोनी चरण ।
म्हणतसे बहिण चोखियाची ॥४॥
आच अर्थ असा,की “हे देवा, तू अनाथांचा नाथ आणि अत्यंत कृपाळू आहेस, तुझी सेवा माझ्या हातून रात्रंदिवस घडावी. २८ युगे विटेवर उभा असलेल्या आणि डाव्या बाजूला रुक्मिणी माता शोभून दिसणाऱ्या विठ्ठला, तू पतितपावन (उद्धार करणारा) आहेस, माझी हीच एक इच्छा तू पूर्ण कर”, असे विठ्ठलाच्या चरणांवर डोके ठेवून चोख्याची बहीण (निर्मळा) म्हणत आहे.
इतर कर्मठ आणि कठीण साधनाकडे वळण्याऐवजी लोकांना नामसाधनेकडे आकर्षित करण्यासाठी हे साधन किती श्रेष्ठ आणि केवळ आपले संचित भक्कम असेल तरच कसे साध्य होते, हे सांगताना निर्मळा म्हणतात-
“अनंत जन्माचे सुकृत पदरी ।
तोची उच्चारी ओठी हरिनाम ॥
अनंत जन्माचे पुण्य जया गाठी ।
तोची उच्चारी ओठी हरिनाम ॥”
म्हणजे ज्याच्याकडे पुण्यसंचय आहे, तोच हरिनाम घेऊ शकतो,असा विश्वास देत असतानाच अनंत जन्माचे पाप घालवायचे असेल तर, त्यासाठी सुद्धा भगवंताचे नाम हाच उपाय असल्याचा विश्वास देताना त्या सांगतात….
“संत निर्मळा म्हणे अनंता जन्माचे । उच्चारिता वाचे पाप जाय ॥”
पापाची भीती आणि पुण्याची लालूच दाखवून समाजातील भोळ्या-भाबड्या लोकांचे शोषण केले जात होते. त्या शोषणातून मुक्ती द्यायची असेल, तर भक्तीची सोपी पायवाट निर्माण करावी लागेल, हे गमक वारकरी संतांनी ओळखले होते.
म्हणूनच यज्ञ-याग, जप-तप, तीर्थयात्रा या परंपरागत पुण्य मिळविण्याची आणि पाप घालविण्याची साधने बाजूला सारून मोफत आणि आपले नित्य कर्म पार पाडीत भगवंताचे नाम घेण्याचा सोपा पर्याय दिला.
त्या सोप्प्या भक्तिपंथाच्या एकनिष्ठ प्रचारक म्हणून संत निर्मळा यांच्याकडे पाहिले जाते.
आजही या विचारांचा जागर होण्याची गरज आहे.
संत चोखामेळा यांच्या अपघाती निधनानंतर संत निर्मलाबाई आणि त्यांचे पती संत बंका हे पुन्हा आपल्या मूळ गावी म्हणजे मेहुणाराजा (बुलढाणा) येथे परत आले. तेथेच निर्मळा नदीच्या तीरावर संत निर्मलाबाईंची समाधी बांधली आहे.
अशा थोर संत निर्मळा बाई यांना माझा भावपूर्ण प्रणाम🙏
……………………………………………………….
© *पल्लवी उमेश*
(कॉपी राईट आहे)
“चिन्मय”,शाहूनगर,
जयसिंगपूर
मोबा.9823735570
