जातीवाचक वस्त्या व रस्त्यांची नावे बदलण्याच्या निर्णयाचे राजपत्र प्रसिद्ध
राज्यात या निर्णयाची अंमलबजावणी करणारा सिंधुदुर्ग पहिला जिल्हा
सिंधुदुर्ग, दि. १२ (जिमाका) :
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जातीवाचक नावांच्या १९२ वस्त्या आणि २५ रस्त्यांची नावे बदलण्याच्या निर्णयाचे महाराष्ट्र शासन राजपत्र (गॅझेट) प्रसिद्ध झाले आहे. पालकमंत्री नितेश राणे आणि जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे या निर्णयाची अंमलबजावणी करणारा सिंधुदुर्ग हा राज्यातील पहिला जिल्हा ठरला असल्याचे समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त संतोष चिकणे यांनी कळविले आहे.
राज्यातील ग्रामीण भागातील गावांमधील वस्त्या व रस्त्यांना असलेली जातीवाचक नावे बदलून त्याऐवजी महापुरुषांची नावे तसेच लोकशाही मूल्यांशी निगडित नावे देण्याबाबत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने शासन निर्णय निर्गमित केला होता. या निर्णयाच्या अनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण भागातील १९२ वस्त्या आणि २५ रस्त्यांची नावे बदलण्यासाठी संबंधित ग्रामसभांचे ठराव मंजूर करण्यात आले होते. त्यानुसार गटविकास अधिकाऱ्यांमार्फत मुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामपंचायत विभाग यांच्याकडे प्रस्ताव प्राप्त झाले होते. हे प्रस्ताव पुढील कार्यवाहीसाठी वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात आले होते.
दरम्यान, ग्रामविकास विभागाच्या ९ ऑक्टोबर २०२५ रोजीच्या शासन निर्णयानुसार जातीवाचक नावे बदलून नवीन नावे देण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना प्रदान करण्यात आले. त्यानुसार जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या १३ ऑक्टोबर २०२५ रोजीच्या आदेशाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण भागातील १९२ जातीवाचक वस्त्या आणि २५ रस्त्यांची नावे बदलण्यास मान्यता देण्यात आली होती.
या निर्णयाच्या अंमलबजावणीसंदर्भातील महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक – कोकण विभागीय पुरवणी, दि. ८ ते १४ ऑक्टोबर २०२६ या कालावधीतील अंकात, पृष्ठ क्रमांक ७ वर आदेश क्रमांक ८६९/२०२६ अन्वये प्रसिद्ध करण्यात आले आहे. सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, सिंधुदुर्ग यांच्यामार्फत हे राजपत्र प्रसिद्ध करण्यात आले आहे.
राजपत्र प्रसिद्ध झाल्यामुळे नव्या नावांना अधिकृत मान्यता मिळाली असून, सर्व ग्रामपंचायती, शासकीय कार्यालये आणि नागरिकांनी यापुढे दप्तरी नोंदी, नामफलक व दैनंदिन व्यवहारांमध्ये नवीन नावांचाच वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
सदर राजपत्रातील नवीन नावांची सविस्तर यादी सामान्य प्रशासन विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, सिंधुदुर्ग तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामपंचायत विभाग आणि सर्व गटविकास अधिकारी कार्यालयांत उपलब्ध आहे. राजपत्राची प्रत महाराष्ट्र शासनाच्या https://egazzete.mahaonline.
