कुडाळच्या गोधडवाडीत नगरसेवक अभिषेक गावडे यांच्याकडून स्वखर्चातून वनराई बंधारा
पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जलसंधारणाचा उपक्रम; पावसाचे पाणी अडवून साठवण्यास मिळणार मदत
कुडाळ, प्रतिनिधी :
कुडाळ शहरातील गोधडवाडी येथे भविष्यात उद्भवणाऱ्या संभाव्य पाणीटंचाईवर उपाययोजना करण्यासाठी शिवसेना (शिंदे) शहरप्रमुख तथा नगरसेवक अभिषेक गावडे यांनी स्वखर्चातून वनराई बंधारा उभारला आहे. जेसीबीच्या साहाय्याने या बंधाऱ्याचे काम करण्यात आले.
अल निनोच्या प्रभावामुळे पावसाचे प्रमाण कमी होण्याची शक्यता आणि भविष्यातील दुष्काळसदृश परिस्थिती लक्षात घेऊन हा उपक्रम राबविण्यात आला. पावसाचे वाहून जाणारे पाणी अडवून त्याचा साठा वाढविण्यास या बंधाऱ्यामुळे मदत होणार आहे. परिणामी, परिसरातील संभाव्य पाणीटंचाईच्या समस्येवर काही प्रमाणात मात करता येईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
स्थानिक नागरिकांच्या पाणीसमस्येची दखल घेत नगरसेवक अभिषेक गावडे यांनी स्वखर्चातून हे काम केल्याने त्यांच्या उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित होत आहे. जलसंधारणाला चालना देणे आणि उपलब्ध पाण्याचा योग्य वापर करणे, या दृष्टीने हा उपक्रम उपयुक्त ठरणार आहे.
यावेळी शिवसेना उपशहरप्रमुख प्रथमेश केळबाईकर, शाखाप्रमुख संदेश सावंत तसेच स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.
