*देव्या सूर्याजी यांची लेखी तक्रार ठरली आर्थिक गैरव्यवहाराचा कर्दनकाळ*
*एक हप्ता (५०,०००) दिल्यानंतर, एप्रिल पासूनचे हप्ते मिळण्यासाठी कुणी लावला तगादा?*
सावंतवाडी नगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागात झालेला लाखोंचा आर्थिक गैरव्यवहार हा केवळ अलीकडे सत्ताबदल झाल्यावरच सुरू आहे..? की, प्रशासकीय राजवटीत सुद्धा सुरू होता..? असे प्रश्न सदर प्रकरणाचा खोलात जाऊन विचार केल्यास आपोआप नजरेसमोर तरळून जातात. कारण, अलीकडेच सावंतवाडी नगरपालिकेवर प्रशासकीय राजवट संपून भाजपची सत्ता आली आणि अवघ्या काहीच दिवसात नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागात कथित आर्थिक गैरव्यवहार झाला असल्याची तक्रार करत नव्यानेच नगरसेवक म्हणून निवड झालेले दुर्गेश उर्फ देव्या सूर्याजी यांनी १५ ऑगस्ट रोजी नगरपालिकेसमोर आपल्या सहकाऱ्यांसह धरणे आंदोलन करून गैरव्यवहारातील दोषींची चौकशी करून निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी केली होती. त्यामुळे पाणीपुरवठा विभागातील आर्थिक गैरव्यवहाराला वाचा फोडण्याचे सर्वप्रथम कोणी काम केले असेल तर ते देव्या सूर्याजी यांनीच..!
युवा रक्तदाता संघटनेपासून रुग्ण कल्याण समिती आमदार सदस्य असा सामाजिक कार्याचा प्रवास करत राजकारणात प्रवेश केलेले देव्या यांनी आपल्या आजोबांचा सामाजिक आणि राजकीय कार्याचा वारसा पुढे नेत प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून आपली नवी इनिंग सुरू केली आहे याचाच प्रत्यय आज त्यांनी जनतेच्या पैशांचा अपव्यय होताना नगरपालिकेत होत असलेल्या आर्थिक गैरव्यवहाराबाबत तक्रार करून दिला आहे. देव्या यांनी गैरव्यवहाराची तक्रार दिल्यानंतर पाणीपुरवठा समितीच्या सदस्या असलेल्या शिवसेनेच्या नगरसेविका ॲड.दुभाषी आणि धारगळकर यांनी तक्रार दिली होती. त्यानंतरच पाणीपुरवठा समितीने लेखी तक्रार केली आहे. या सर्व तक्रारींकडे प्रशासनाने आणि सत्ताधाऱ्यांनी डोळेझाक केल्यामुळे देव्या आणि सहकाऱ्यांनी १५ ऑगस्ट रोजी नगरपालिकेसमोर धरणे आंदोलन केले. यावेळी २० ऑगस्ट रोजी विशेष बैठक घेऊन लेखी अहवाल आंदोलनकर्त्यांसमोर सादर करणार होते. परंतु, तत्पूर्वीच १९ ऑगस्ट रोजी पाणीपुरवठा विभागाचे रजिस्टर गहाळ झाल्याची पोलिस तक्रार केली गेली…म्हणजेच आर्थिक गैरव्यवहार झाला यावर शिक्कामोर्तब झाला. फक्त तो कोणी केला..? कधीपासून सुरू होता..? कोण कोण यामध्ये सामील आहेत…? आजपर्यंत किती लाखांचा गैरव्यवहार झाला..? याचा शोध घेणे बाकी राहिले आहे. कारण, असे प्रश्न आता उपस्थित झाले असून सावंतवाडीच्या जनतेच्या डोक्यावर वाढत चाललेल्या कराचे पैसे कुठे जातात हे सावंतवाडी वासियांना ज्ञात होणे क्रमप्राप्त आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ज्यावेळी देव्या सूर्याजी यांना या गैरव्यवहाराची भनक लागली त्यानंतर यात सामील असणाऱ्या सर्वांचेच धाबे दणाणले. प्रत्येकजण आपली चामडी बचावसाठी प्रयत्न करू लागला. पहिल्यांदाच वाच्यता होत असलेला नगरपालिकेतील हा आर्थिक गैरव्यवहार बाहेर पडू नये म्हणून काही जबाबदार लोकप्रतिनिधी आणि कर्मचारी वर्गाची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत कुणीही तोंड उघडू नये यासाठी काहीना शेलक्या २०००/- ते ५०००/- रुपयांची आमिषे दिली गेली. ज्या व्यक्तीकडे हा गैरव्यवहार दाबण्याची ताकद आणि गैरव्यवहाराच्या पेटीची चावी होती अशा एका प्रमुख व्यक्तीला तब्बल ५० हजार रुपयांचा हफ्ता सुद्धा ठरला आणि पहिला हफ्ता दिलाही गेला. परंतु, फक्त एक हफ्ता घेऊन ही व्यक्ती गप्प बसली नाही तर त्या व्यक्तीने एप्रिल महिन्यापासून आजपर्यंतच्या सर्व महिन्यांचे ५००००/- प्रमाणे हफ्ते मिळावेत म्हणून पाणीपुरवठा खात्यातील व्यक्तीवर दबाव टाकून तगादा लावला. या सर्व घडामोडी घडत असताना सामाजिक कार्याच्या मुशीतून तावून सुलाखून आलेले केसरकर यांचे खंदे समर्थक नगरसेवक देव्या सूर्याजी यांनी सदर कथित आर्थिक गैरव्यवहाराबाबत आवाज उठवला व पाणीपुरवठा विभागातील आर्थिक गैरव्यवहार, प्रभारी मुख्याधिकाऱ्यांची बदली, आयुष्य मंत्रालय भारत सरकारची मंजूर ओपीडी तात्काळ सुरू करणे आणि नळपाणी योजनेचे बोगस काम करणाऱ्या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाका अशा मागण्या करत धरणे आंदोलन केले आणि काही जणांचे पैशांचे आमिष देऊन गैरव्यवहार दाबून टाकण्याचे मनसुबे उधळले गेले असे खात्रीलायक वृत्त आहे.
सावंतवाडी नगरपालिका यापूर्वी एवढी कधीही चर्चेत आली नव्हती. पूर्वी भ्रष्टाचार असतील नसतील असेही सांगता येत नाही. परंतु, मध्यंतरी स्वायत्त संस्थांच्या निवडणुका काही वर्षे आरक्षणाच्या मुद्द्यावर स्थगित झाल्यानंतर प्रशासकीय राजवटीत निवडून आलेले लोकप्रतिनिधी सभागृहात नसल्याने कोणावरही जनतेचे अर्थात लोकप्रतिनिधींचे नियंत्रण किंवा भय राहिले नाही. त्यामुळे रान मोकळे झाल्याने १०० रुपये किमतीची वस्तू ५००/- रुपये दाखवून खर्चाचा आकडा फुगवून दाखवला गेला असेल आणि त्यातूनच अशाप्रकारचे आर्थिक गैरव्यवहार मोठ्या प्रमाणावर फोफावले आणि त्याची सवय लागून राहिली जी आता निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींच्या हजेरीत देखील सुटणे अशक्य झाले. परिणामी “मैं भी खाता हूँ, तू भी खा ले” असे म्हणत गैरव्यवहारांना रुजवात घालण्याचे प्रयत्न सुरू झाले असण्याची दाट शक्यता आहे.
देव्या सूर्याजी यांनी उठवलेला आवाज हा जनतेचा आवाज असून शिवसेनेच्या संजू परब सहित सर्वांनी तो उचलून धरला त्यामुळे आर्थिक गैरव्यवहारात एक कर्मचारी दोषी धरत त्याला अटक झाली, गुन्हा दाखल झाला. परंतु इथे प्रश्न उपस्थित होतो तो म्हणजे…हा एवढा मोठा आर्थिक गैरव्यवहार त्या एका कर्मचाऱ्याने केला आहे का? काही जणांना तोंड बंद ठेवण्यासाठी खरोखरच कोण पैसे देत होते? ५००००/- रुपयांचा मासिक हफ्ता कोणाला दिला आणि एप्रिलपासूनचे हफ्ते मिळावेत असा तगादा कोणी लावलेला? हे सर्व कथित आरोप सत्य आहेत का..? हा आर्थिक गैरव्यवहार आताच झाला की यापूर्वी देखील असेच गैरव्यवहार झाले आहेत..? याची विशेष समिती नेमून सखोल चौकशी सत्ताधारी करतील काय..? की, तेरी भी चूप मेरी भी चूप म्हणून प्रकरण दाबून टाकतील..? हे सावंतवाडीकरांनी पाहून यातून बोध घ्यावा.
