You are currently viewing सांगली जिल्ह्यात 39 टँकरव्दारे 41 गावे, 286 वाड्यातील 80 हजाराहून अधिक बाधित लोकसंख्येला पाणीपुरवठा

सांगली जिल्ह्यात 39 टँकरव्दारे 41 गावे, 286 वाड्यातील 80 हजाराहून अधिक बाधित लोकसंख्येला पाणीपुरवठा

विटे / प्रदीप जोशी, ज्येष्ठ पत्रकार :

जिल्ह्यात पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद सांगलीच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत पिण्याच्या पाण्याची टंचाई निवारणासाठी टँकर व विहीर अधिग्रहणाद्वारे प्रशासनाकडून उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. बाधित गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठा करणे तसेच स्थानिक पातळीवर खाजगी विहिरी व बोअरचे अधिग्रहण करून पाणी पुरवठा सुरळीत ठेवण्यावर भर दिला जात आहे. जिल्हा परिषदेच्या 9 ऑक्टोबर अखेरच्या अहवालानुसार 32 खाजगी व 7 शासकीय अशा एकूण 39 टँकरव्दारे 41 गावे व 286 वाड्यातील 80 हजार 799 बाधित लोकसंख्येला व 8 हजार 301 पशुधनासाठी पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. पाणी टंचाईवर मात करण्यासाठी 25 खाजगी विहिरी/बोअर अधिग्रहित केल्या आहेत.

जत तालुक्यातील टंचाईग्रस्त ३३ गावे व २३१ वाड्यांमधील सुमारे ६७,७९२ लोकसंख्येला ३२ टँकरद्वारे (२६ खाजगी व ६ शासकीय) पाणी पुरवले जात आहे. टंचाईवर मात करण्यासाठी तालुक्यात १४ खाजगी विहिरी/बोअर अधिग्रहित करण्यात आल्या असून २ डिझेल इंजिन भाड्याने घेण्यात आले आहेत.

कवठेमहांकाळ तालुक्यातील टंचाईग्रस्त 1 गाव व 8 वाड्यांमधील 1834 लोकसंख्येसाठी 1 शासकीय टँकर सुरू आहे. नळ पाणी पुरवठा योजनेच्या विहिरीतील पाणीसाठा अत्यंत कमी झाल्यामुळे गावात पाणीटंचाई भासू नये यासाठी २ खाजगी विहिरी/बोअरचे अधिग्रहण करण्यात आले आहे.

तासगाव तालुक्यातील टंचाईग्रस्त 1 गाव व ६ वाड्यांमधील ८५५ लोकसंख्येला १ खाजगी टँकरद्वारे पाणी पुरवले जात आहे. तालुक्यात ३ खाजगी विहिरी/बोअर अधिग्रहित करण्यात आल्या आहेत.

आटपाडी तालुक्यातील टंचाईग्रस्त 6 गावे व 41 वाड्यांमधील 10318 नागरिकांना आणि 8301 पशुधनाला 5 खाजगी टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे. या तालुक्यात 3 विहिरी/बोअर अधिग्रहित करण्यात आले आहेत.

खानापूर तालुक्यात 2 गावे टंचाईग्रस्त असून 3 खाजगी विहिरी/बोअर अधिग्रहित करण्यात आले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा