You are currently viewing वाढदिवसाच्या खर्चाऐवजी दुष्काळग्रस्तांना मदत करा

वाढदिवसाच्या खर्चाऐवजी दुष्काळग्रस्तांना मदत करा

फ्लेक्स आणि कार्यक्रम टाळण्याचे आमदार सुहास बाबर यांचे आवाहन वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय

विटे / प्रदीप जोशी, ज्येष्ठ पत्रकार :

खानापूर विधानसभा मतदारसंघात दुष्काळाचे सावट गडद होत असताना वाढदिवसानिमित्त होणारा अनावश्यक खर्च टाळून त्या पैशांतून गरजू कुटुंबांना मदत करा, असे आवाहन आमदार सुहास बाबर यांनी केले आहे. दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर यंदा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट करत त्यांनी वाढदिवसाचे, फ्लेक्स आणि विविध कार्यक्रमांऐवजी सामाजिक बांधिलकी जपण्याचे आवाहन सहकारी आणि मतदारसंघातील नागरिकांना केले.

आमदार सुहास बाबर म्हणाले की, मतदारसंघातील जनतेचे प्रेम, आशीर्वाद आणि शुभेच्छा कायमच आपल्या पाठीशी आहेत. मात्र, सध्याची दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता वाढदिवस साजरा करणे योग्य वाटत नाही. त्यामुळे वाढदिवसानिमित्त डिजिटल बोर्ड लावणे, फ्लेक्स उभारणे किंवा विविध कार्यक्रम आयोजित करण्याऐवजी हा खर्च गरजू नागरिकांच्या मदतीसाठी वापरावा.

आपल्याला मिळणाऱ्या मानधनातून वैद्यकीय उपचारांसाठी आर्थिक मदत, विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी सहकार्य तसेच सिव्हिल हॉस्पिटलमध्ये रुग्णांच्या नातेवाइकांना भोजन उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आपण करत असतो. समाजातील गरजू घटकांना मदत करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेतल्यास अनेक कुटुंबांना दिलासा मिळू शकतो, असेही त्यांनी नमूद केले.

वाढदिवसाच्या खर्चातून गरजूंच्या घरांना आधार मिळावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारणे, अपघातात कुटुंबातील सदस्य गमावलेल्या कुटुंबांना मदत करणे तसेच औषधोपचारांचा खर्च भागवता न येणाऱ्या रुग्णांना आर्थिक सहकार्य करणे, अशा उपक्रमांना प्राधान्य द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणाऱ्या प्रत्येकाने आपल्या गावातील गरजू व्यक्ती किंवा कुटुंबांना मदत करावी, फ्लेक्स आणि कार्यक्रमांवर होणारा खर्च वाचवून तो सामाजिक कार्यासाठी वापरल्यास प्रत्येक गावात मदतीची मोठी चळवळ उभी राहू शकते. यातून समाजापुढे एक नवा आदर्श निर्माण होईल, असा विश्वास आमदार सुहास बाबर यांनी व्यक्त केला.

“माझ्यावर असलेले तुमचे प्रेम, आशीर्वाद आणि शुभेच्छा कायम माझ्यासोबत आहेत. मात्र, वाढदिवसाच्या जाहिराती देऊ नका, फ्लेक्स लावू नका आणि कार्यक्रम आयोजित करण्याऐवजी आपल्या गावातील गरजूंना मदत करा,” असे भावनिक आवाहन त्यांनी केले.

गरजू व्यक्तींना मदत करण्याची इच्छा असणाऱ्यांनी संबंधितांची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवावी. अशा लोकांना मदत करण्यासाठी आपण प्रयत्न करू, अशी ग्वाहीही आमदार सुहास बाबर यांनी दिली.

वाढदिवसाच्या निमित्ताने होणारा अनावश्यक खर्च टाळून तो सामाजिक कार्यासाठी वापरण्याचा संदेश आमदार बाबर यांनी दिला असून, या आवाहनामुळे वाढदिवस साजरा करण्याच्या पद्धतीत सामाजिक बांधिलकीला प्राधान्य देण्याचा मुद्दा चर्चेत आला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा