विटे / प्रदीप जोशी, ज्येष्ठ पत्रकार :
राज्यात लवकरच सुरु होणाऱ्या वॉटर कप अभियानाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलसंधारणविषयक कामाच्या अनुषंगाने बैठक घेतली. राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने, नियोजनबद्ध आणि गतिमान पद्धतीने काम करावे. ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या संकल्पनेला प्राधान्य देऊन पावसाच्या पाण्याचा प्रत्येक थेंब अडविण्यासाठी जलसंधारणाची कामे प्रभावीपणे राबवावीत. पानी फाउंडेशनसह विविध स्वयंसेवी संस्थांच्या कामांना प्रशासकीय यंत्रणेने सक्रिय सहकार्य करून या मोहिमेला गती देण्याचे निर्देश त्यांनी दिले.
दुष्काळाच्या आव्हानावर मात करण्यासाठी सर्व विभागांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे आवश्यक आहे. अडचणीच्या काळात समर्पित भावनेने जलसंधारणाच्या कामांसाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. या बैठकीत निश्चित झालेल्या संकल्पनांच्या आधारे एकात्मिक कार्ययोजना तयार करावी. तिच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सक्षम प्रशासकीय यंत्रणा उभारण्या बरोबरच कामांच्या प्रगतीवर लक्ष ठेवण्यासाठी तंत्रज्ञानाधारित संनियंत्रण प्रणाली विकसित करावी. विविध विभागांच्या कामांचे एकत्रीकरण करून परस्पर समन्वयातून अंमलबजावणी करावी. ही कामे केवळ कागदावरील नियोजनापुरती मर्यादित न राहता प्रत्यक्षात परिणामकारकपणे पूर्ण व्हावीत. पहिला पाऊस पडताच पाणी अडविण्यासाठी जलसंधारणाच्या संरचना सज्ज असतील आणि त्यातून भूजलपातळीत वाढ होण्यास मदत होईल, असे नियोजन व अंमलबजावणी करावी. या प्रयत्नांतून गावांना दुष्काळमुक्त करण्याच्या दिशेने ठोस पावले टाकता येतील आणि जनतेला मोठा दिलासा मिळेल असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
जानेवारी ते मे या कालावधीत शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण व जनजागृती उपक्रम राबवून पावसाळ्यापूर्वी जलसंधारणाच्या कामांना गती देण्यात येईल. यंदाचे वर्ष आव्हानात्मक असले, तरी निराशेचे रूपांतर आशेत करून जनतेमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करणे आवश्यक आहे. राज्यातील प्रत्येक गावातील प्रत्येक घराने जलसंवर्धनाच्या कार्यात सहभागी व्हावे असे आवाहन अभिनेते आमिर खान, पाणी फाउंडेशन यांनी केले.
या बैठकीस नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, ए.टी.ई. चंद्रा फाउंडेशनचे अमित चंद्रा, पानी फाउंडेशनचे सत्यजित भटकळ, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव विकासचंद्र रस्तोगी, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे अपर मुख्य सचिव पराग जैन-नैनुटीया, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव लोकेश चंद्र, प्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशी, मृद व जलसंधारण विभागाचे सचिव जितेंद्र पापळकर, जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले आदी उपस्थित होते. पशुसंवर्धन विभागाचे सचिव एन. रामास्वामी तसेच राज्यातील सर्व जिल्हाधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.
